नागपूर,
Nag Nadi नागपुरातून वाहणारी एकमेव नदी म्हणजे नाग नदी. या नदीला एक ऐतिहासिक संदर्भ लांभलेला आहे. नागवंशीय काळात नाग नदीवर यात्रा भरत. वेगवेगळ्या प्रांतातून येथे वेगवेगळे व्यापारी वर्ग येत. तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन येथे होत असे. यशवंत स्टेडियम जवळील संगम प्रसिद्ध होता. पण आज ही नदी दूषित झाली आहे. सांडपाण्याच्या नाल्या हिच्या प्रवाहाला जोडण्यात आलेल्या आहेत. भारत सरकारतर्फे नाग नदी स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले आहे. या निमित्त नागपूर आर्ट सोसायटीच्या रंग मल्हार चित्रकारांनी नाग नदी 2047 मध्य कशी दिसावी, या उद्देशाने 3×16 फूट कॅनव्हासवर चित्रण केले आहे. यात नाग नदीच्या उगम स्थानापासून तर भांडेवाडी पर्यंतच्या भागाचे चित्रण केले असून, त्यात नाग नदीत बोटिंग, स्विमिंग, सी प्लेन दर्शविले आहे.

नदीच्या पाण्यावर वीज निर्मिती करून ती शहराला मिळावी, इतकेच नाही तर पर्यटकांनाही सौंदर्याची अनुभूती व्हावी व युवकांना रोजगार मिळण्याच्या उद्देशाने कॅनव्हासवर रंगयोजना करण्यात आली आहे. नागपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेत रंग भरून चित्रकारांनी हा प्रयोग साकार केला आहे. Nag Nadi या चित्रकारांमध्ये श्रीकांत गडकरी, किशोर सोनटक्के, दीपक सातपुते, राजकुमार कावळे, आशिष पलेरिया, हरिश ढोबळे यांचा समावेश आहे. ही भव्य कलाकृती नितीन गडकरी यांना भेट देण्यात आली असून, ती कविवर्य सुरेश भट सभागृह येथे लावण्यात येणार आहे. या कार्यक्रमात भाजपा शहर मंत्री ईश्वर धिरडे, गोपाल लांजेवार, चित्रकार श्रीकांत गडकरी, किशोर सोनटक्के, दीपक सातपुते, राजकुमार कावळे, प्रकाश जिल्हारे, हरीश ढोबळे, श्रीश सोनटक्के, गौरव सुरदसे व आशिष पलोरिया आदी उपस्थित होते.