भ्रमणध्वनी बनला जीवनाचा अविभाज्य घटक

    दिनांक :13-Jan-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा 
मारेगाव, 
सध्या भ्रमणध्वनीचे (Mobile phone) वाढते महत्व लक्षात घेता भ्रमणध्वनी हा जीवनाचा सर्वात महत्वाचा घटक बनलेला आहे. एकवेळ जेवण नाही मिळाले तरी चालते. परंतु भ्रमणध्वनी मात्र शरीराच्या दूर जाता कामा नये अशी अनेकांची धारणा बनलेली आहे.
 
 
 
पूर्वी देशात एकच नेटवर्क कंपनी होती. तिच्याच नेटवर्कवर सर्वांना अवलंबून राहावे लागत होते. परंतु या आता मात्र परिस्थिती बदललेली आहे. ग्राहकांसमोर अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. भ्रमणध्वनी (Mobile phone) फोन हा मनुष्याच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत भ्रमणध्वनी हा मानवाच्या दूर जात नाही. सगळे आर्थिक व्यवहार, देवाणघेवाण आता भ्रमणध्वनीवरूनच होत आहेत. आपण कोठेही गेलो तरी भ्रमणध्वनी हा जवळ हवाच.
 
 
या भ्रमणध्वनीमुळे जग जवळ येत असून अनेक असाध्य कामेही साध्य होत आहे. खिशामध्ये पैसे नसले तरी भ्रमणध्वनीच्या माध्यमातून अनेक मोठमोठे व्यवहार शक्य झाले आहेत. या भ्रमणध्वनीमुळे छायाचित्रकारांच्या व्यवसायावर मोठ्या प्रमाणत गंडांतर आले आहे. आधी कोणताही छोटा कार्यक्रम असला की घरी छायाचित्रकार यायचा. परंतु आता या छायाचित्रकाराची जागा या भ्रमणध्वनीने घेतली आहे. भ्रमणध्वनी आता नित्यनेमाचा बनला असून तो नसला तर अनेकांना उपवास असल्यासारखे वाटत असते.