तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
सिनेदिग्दर्शक व अभिनेता महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी बॅन्ड कलाकारांना जाणीवपूर्वक हातचाळे करून अपमानास्पद वागणूक देऊन व जातीय शिवीगाळ केली. या घटनेचा निषेध नोंदवीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आले. लहू टायगर सेनेचे सागर कळणे, अरविंद वानखडे, नवनीत महाजन, विशाल तेलंगे, देविदास महाले, अंकुश महाले, निघल कळणे, कुणाल मुंगले, गोकुळ चंदणे, महादेव बावणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, महेश वामन मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी झी या वाहिनीवर ‘काळे धंदे’ या वेबसिरीजद्वारे अनुसूचित जाती, मांग-मातंग पिढीजात वाद्य कलाकार कामगारांच्या जातीय व्यवसायाची माहिती असताना जाणीवपूर्वक हीन, नीच समाजाचे समजून खालच्या दर्जाचे समजून जातीय द्वेषातून विचित्र हातवारे करून हावभाव केले. यातून मांजरेकर यांनी जाहीरपणे अश्लील, गलिच्छ, तिरस्कारयुक्त संभाषण केल्याचा व कृतीतून घडवून आणलेल्या चित्रवाहिनीमधून अपमानास्पद व जातीय द्वेषापोटी हा प्रकार केल्याचा आरोप करण्यात आला. यावर योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा हे आंदोलन तीव्र करण्यात येईल, अशा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.