दिग्रस शहरातील तो रस्ता कोणाकडे..?

- रस्त्याची अवस्था दयनीय

    दिनांक :16-Jan-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा 
दिग्रस, 
Digras city येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग व नगर परिषदेने अंग काढून तो रस्ता आमच्या हद्दीत नसल्याने आम्ही रस्ता बांधणार कसा, असे म्हटल्यावर मग तो रस्ता कोणाकडून व कोणी बांधून द्यायचा असा प्रश्न आहे. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सौंदर्यीकरण झाले, नव्याने नामकरण करूनसुद्धा झाले. परंतु या चौकातून पुढे मानोरा चौक व मागे तहसील कार्यालयापर्यंत जाणार्‍या जवळपास 1 किलोमीटरच्या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने या रस्त्याचा लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
 
Digras city
 
Digras city नगर परिषद कार्यालयाने तो रस्ता आमचा नाही म्हणत सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडे बोट दाखवले. तर या विभागाने तो रस्ता आमचा नव्हताच असे म्हणत रस्त्यावर पडलेले साधे खड्डे बुजवणे नाकारले. गेल्या चार वर्षांपासून या रस्त्याचे बांधकाम रखडले ते रखडलेच. विशेष म्हणजे शहरातील या रस्त्यावर सर्व महत्वाच्या बँका, नगर परिषद कार्यालय, पोलिस ठाणे, सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे कार्यालय, विश्रामगृह, शाळा व महाविद्यालय असल्याने रस्त्यावर सतत वर्दळ असते. धड चालता येत नसलेल्या या रस्त्यावरून वाहन चालविणे आता कठीण झाले असा हा त्रासदायक रस्ता दोन्ही जबाबदार विभागांनी नाकारत आर्णी कारंजा महामार्ग बांधकाम विभागाची ती जबाबदारी असल्याचे सांगितले आहे. परंतु त्यांनीसुद्धा हा तितकाच रस्ता का सोडून दिला असा प्रश्न दिग्रसकरांना पडला आहे.
 
 
आर्णी ते कारंजा अशा महामार्गाचे बांधकाम सुरू आहे. आर्णी ते दिग्रस (Digras city) मार्ग पूर्ण झाला असून पुढे दिग्रस ते मानोरा मार्गाचे कार्य प्रगतीपथावर आहे. आर्णी कारंजा मार्ग हा शहरातील त्याच रस्त्यावरून जात असताना त्यांनीसुद्धा बरोबर इतकाच रस्ता सोडून पुढे बांधकाम केल्याने आता हा रस्ता नेमका कोणाकडे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. महामार्ग बांधकाम विभागाने तोच रस्ता सोडून दिला, यामागचे नेमके कारण कोणी विचारायचे व याचे उत्तर कोणी द्यायचे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. रस्ता जर सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा नगर परिषदेचा नसेल तर, आहे तरी कोणाचा याचे उत्तर मिळणे गरजेचे आहे. संबधित आर्णी कारंजा महामार्ग बांधकाम करणार्‍या कंपनीने ती जबाबदारी घेणे गरजेचे होते किंबहुना आर्णी ते दिग्रस हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर दिग्रस शहरातून पुढे मानोरा रस्ता असा करायला हवा होता. परंतु त्याचा पूर्ण विसर त्यांना पडल्याने आणखी किती दिवस लोकांनी त्या रस्त्याचा त्रास सहन करावा असा प्रश्न दिग्रसच्या लोकांना पडला आहे.