तृणधान्यांच्या समावेशाने पोषणमूल्य वाढतील

    दिनांक :17-Jan-2023
Total Views |
गडचिरोली, 
हेमलकसा प्रकल्पात मागील (hemalkasa project)  दोन-तीन वर्षापासून पौष्टिक तृणधान्याचा वापर आदिवासी कुटुंबातील शालेय मुलांच्या आहारामध्ये लोकबिरादरी प्रकल्पामार्फत करण्यात येत आहे. प्रकल्पामार्फत परिसरामध्ये नाचणी, राळा, कोडो इत्यादी पिकांची लागवड करण्यात येत असून नाचणी आंबील मुलांना दिल्याने त्यांच्या पोषणामध्ये अत्यंत चांगले बदल बघायला मिळत आहे. सद्यस्थितीत पौष्टिक तृणधान्यांच्या समावेशामुळे पोषणमूल्य वाढतील. सर्व उपस्थितांना या आहारातील वापरावर भर द्यावा, असे आवाहन लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा येथील शालेय विभागाच्या प्रमुख समीक्षा आमटे यांनी केले.
 

uiuiuiu 
 
16 जानेवारी रोजी भामरागड (hemalkasa project)  येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन तहसील कार्यालयातील सभागृहामध्ये कृषी विभागामार्फत करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी आनंद गंजेवार, नायब तहसीलदार पप्पुलवार, गटविकास अधिकारी स्वप्निल मगदूम, सहाय्यक प्रकल्प अधिकारी चव्हाण, गटशिक्षणाधिकारी वडलाकोंडा, तंत्र अधिकारी भाऊसाहेब लावंड, तालुका कृषी अधिकारी अमोल नेटके उपस्थित होते. यावेळी विविध पौष्टिक तृणधान्याचे नमुने सर्व उपस्थितांसाठी उपलब्ध करून छोटेखाणी प्रदर्शनी ठेवण्यात आली होती. मानवी आहारामध्ये पूर्वीच्या काळी स्थानिक स्तरावर येणारे वेगवेगळी तृणधान्य जसे ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, कोसरी, कोडो, वरई या तृणधान्याचा दैनंदिन आहारात समावेश होता. त्यानंतर हळूहळू या सर्व तृणधान्याची जागा गहू व भात या दोन तृणधान्यांनी घेतली व आता बहुतांश भागात गहू व भात हे दोनच तृणधान्ये खाल्ली जातात. केवळ या दोनच धान्याच्या जास्तीत जास्त सेवनामुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार याशिवाय अनेक नवीन प्रकारच्या व्याधी होत असल्याचे अलीकडे लक्षात आले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांनी केले. कार्यक्रमाला तालुक्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा, माविम व उमेद मधील बचत गट, शेतकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.