देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस

    दिनांक :02-Jan-2023
Total Views |
कानोसा
 - अमोल पुसदकर
30 डिसेंबर 1943 रोजी अंदमान या बेटावर इंग्रजांची सत्ता उलथवून आझाद हिंद फौजेने तिरंगा ध्वज फडकविला. अंदमान व निकोबार हे बेट स्वतंत्र झाले. आझाद हिंद फौजेचा हा पहिला विजय होता. त्यांना Netaji Subhash Chandra Bose नेताजींनी ‘शहीद’ व ‘स्वराज’ हे नाव दिले. दीडशे वर्षांच्या इंग्रजांच्या गुलामगिरीत भारतीयांना फक्त इंग्रजांच्या सेनेमध्ये नोकरी करणे माहिती होते. देशातील राजे-राजवाडे खालसा झाल्यामुळे सर्वसामान्य माणसाला आपला पराक्रम गाजविण्याची, सैनिक बनण्याची संधी अन्यत्र कुठेही उपलब्ध नव्हती. त्यामुळे एकतर इंग्रजांच्या सैन्यांमध्ये सामील व्हा अथवा सशस्त्र दलांपासून दूर राहा हाच काय तो पर्याय होता. जपानने पर्लहार्बर या बेटावर आपला ताबा मिळविला व त्यांनी ब्रह्मदेशमध्येही इंग्रजांचा पराभव केला. इंग्रजांच्या पराभवानंतर हजारो सैनिक बंदी झाले. यामध्ये जवळपास पंचेवीस हजार भारतीय सैनिकांचा समावेश होता. नेताजी सुभाषचंद्र बोस जपानच्या पंतप्रधानांना भेटले व त्यांनी या सर्व सैनिकांना मुक्त करण्याची विनंती केली. या पंचेवीस हजार सैनिकांना संबोधित करताना नेताजी त्यांना म्हणाले की, ‘‘मित्रहो, आजपर्यंत आपण इंग्रजांची गुलामगिरी केली. आता चला, आपण भारताच्या स्वातंत्र्याकरिता फौज उभारू.’’ आणि येथूनच आझाद हिंद फौजेची मुहूर्तमेढ रोवली गेली. रासबिहारी बोस यांनी या फौजेची संपूर्ण जबाबदारी सुभाषचंद्र बोस यांच्यावर टाकली. जपानच्या संसदेमध्ये भाषण करताना सुद्धा नेताजींनी जपानी सांसदांसमोर केलेल्या भाषणात, त्यांना भारताच्या स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून सांगितले.
 
 
Netaji Subhash Chandra Bose
 
इंग्रजांच्या ताब्यातून ब्रह्मदेश मुक्त झाल्यानंतर त्यांच्या स्वातंत्र्य समारंभात सुद्धा Netaji Subhash Chandra Bose नेताजींचे भाषण झाले. ब्रह्मदेशला त्यांनी आझाद हिंद फौजेसाठी एक महत्त्वाचे केंद्र बनविले. जपानच्या टोकियो रेडिओ स्टेशनवरून सुद्धा नेताजींचे भाषण सर्वत्र प्रसारित झाले. रंगून येथील रेडिओ स्टेशनवर केलेल्या आपल्या भाषणात त्यांनी भारतीयांना, ‘तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा’, स्वातंत्र्य पाहिजे असेल तर आपल्या रक्ताचे मोल द्यावे लागेल, अशा पद्धतीचा संदेश दिला. नेताजींचे व्यक्तिमत्त्व देशभक्तीने भरलेले होते. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप सर्वच जनसामान्यांवर पडत होती. तरुणांचे थवेच्या थवे आझाद हिंद फौजेमध्ये सामील होण्याकरिता येऊ लागले. यासाठी धनाची आवश्यकता होती. नेताजींनी ब्रह्मदेश, जपान व इतर देशांतील भारतीयांना आझाद हिंद फौजेसाठी धन समर्पण करण्याची आवश्यकता प्रतिपादित केली. गरिबातला गरीब व श्रीमंतातला श्रीमंत यांच्यामध्ये आपल्याजवळ असलेले सर्व आझाद हिंद फौजेसाठी समर्पित करण्याची स्पर्धा लागली. एका वृद्ध स्त्रीने तिचा पुत्र आझाद हिंद फौजेमध्ये गमावलेला होता. परंतु नेताजींची ही मागणी ऐकल्यावर तिने तिच्याजवळ असलेल्या सर्व चीजवस्तू आझाद हिंद फौजेला समर्पित केल्या. शेवटी आपल्या मुलाचा एक फोटो तिच्याजवळ होता तो सुद्धा तिने नेताजींना दिला व म्हणाली की, ‘‘मला अजून एक मुलगा असता तर तोही मी आझाद हिंद फौजेकरिता दिला असता.’’ आझाद हिंद फौजेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या रेजिमेंट बनविल्या गेल्या. काही दिवसांपूर्वी आपल्या भारतीय सैन्यांमध्ये महिलांना कायमस्वरूपी नोकरी बहाल करण्यात आलेली आहे.
 
 
यामुळे महिला आता दीर्घकाळ सैन्यामध्ये आपली सेवा देऊ शकतील व मोठ्या पदावर सुद्धा पोहोचू शकतील. परंतु आझाद हिंद फौजेमध्ये त्या काळामध्ये महिलांची एक ‘राणी झाशी रेजिमेंट’ उभारण्यात आली व याचे नेतृत्व कॅप्टन लक्ष्मी स्वामिनाथन यांच्याकडे होते. अनेक भारतीय राजकारणी लोकांनी नेताजी भारतावर आक्रमण करीत आहेत. आतापर्यंत देश इंग्रजांचा गुलाम होता, आता जपानी लोकांचा गुलाम भारताला बनविण्यासाठी Netaji Subhash Chandra Bose नेताजी निघालेले आहेत, अशी त्यांच्या कार्याची निंदा केली. परंतु नेताजींनी जपानी फौजेसोबत जो करार केला होता, त्यामध्ये त्यांनी सांगितले होते की, भारताचा कुठलाही भूभाग आम्ही जिंकून घेतला तर त्या ठिकाणी जपानी झेंडा लागणार नाही, आझाद हिंद फौजेचा झेंडा लागेल. जो भाग जिंकून घेतला जाईल तो भाग जपानच्या मालकीचा होणार नाही, तर आझाद हिंद फौजेच्या मालकीचा होईल. जी संपत्ती मिळेल ती सुद्धा जपानची होणार नाही, तर आझाद हिंद फौजेच्या मालकीची होईल. यावरून आपल्याला नेताजींच्या कार्याची दिशा व त्याचे स्वरूप लक्षात येईल. नेताजींच्या आझाद हिंद फौजांनी कोहिमावर हल्ला केला. त्यांना काही ठिकाणी विजय मिळत होता, तर काही ठिकाणी पराजय सुद्धा चाखावा लागत होता. अशा परिस्थितीत इम्फाळवर आझाद हिंद फौजेने व जपानच्या सेनेने आक्रमण केले. ते आक्रमण अयशस्वी झाले. त्यावेळेस जपानी सरकारने नेताजींना तिथून सुरक्षित काढण्यासाठी सर्व प्रकारची योजना केली व नेताजींना तिथून निघून जाण्याची विनंती केली. परंतु नेताजींनी आपल्या महिला सैनिकांसोबत शेकडो किलोमीटर पायी चालणे पसंत केले, परंतु ते तिथून निघून गेले नाहीत. एक वेळ अशी आली की, रंगूनमध्ये ज्या ठिकाणी नेताजी बसलेले होते, त्यांच्यापासून दहा किलोमीटर अंतरावर इंग्रजांच्या गाड्या पोहोचलेल्या होत्या. आकाश इंग्रजांच्या विमानांनी व्यापलेले होते. याही परिस्थितीत नेताजी आपल्या सैनिकांसोबत युद्धाच्या मोर्चावर सज्ज होते.
 
 
Netaji Subhash Chandra Bose नेताजींमुळे भारतीय तरुणांना सैनिकीकरणाची प्रेरणा मिळाली. आमची पण फौज असू शकते. आम्ही पण विजयी होऊ शकतो, हा विश्वास भारतीय तरुणांना नेताजींमुळे मिळाला. एक सुसंघटित, शिस्तबद्ध, प्रशिक्षित सैन्य कसे असू शकते, याचे उदाहरण नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी घालून दिलेले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेपासूनच प्रेरणा भारतातील नौसैनिकांनी घेतली व पुढे त्यांनी सुद्धा सत्याग्रह केला. ज्यावेळेस अंदाजे चाळीस हजार सैनिकांनी सत्याग्रह केला, त्यांनी आपली शस्त्रे इंग्रज सरकारला परत केली व आम्ही आमच्याच भारतीय लोकांविरुद्ध लढणार नाही अशी घोषणा केली, त्यावेळेस मात्र इंग्रज सरकार हादरले व त्यांच्या हे लक्षात आले की, या फौजेच्या आधारावर आता भारतावर राज्य करणे शक्य नाही. आणि त्यामुळे हळूहळू भारताच्या स्वातंत्र्याची बीजे अंकुरित व्हायला लागली व शेवटी 1947 साली आमचा देश स्वतंत्र झाला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारताच्या स्वातंत्र्याकरिता, भारताच्या बाहेर राहून जो लढा उभारला, जे सैन्य जमवले, देश-विदेशातील मोठ मोठ्या लोकांच्या भेटी घेतल्या, त्या सगळ्या त्यांच्या देशभक्तीचा परिचय देणार्‍याच आहेत. नोव्हेंबर 1940 मध्ये नेताजींना कोलकाता येथील त्यांच्या घरी स्थानबद्ध करण्यात आले. त्यावेळेस त्यांच्या घराच्या बाहेर पहारा बसविण्यात आला होता. अशा परिस्थितीत नेताजी त्या घरातून रहस्यमयरीत्या बाहेर पडले. घराच्या बाहेर त्यांचा पुतण्या शिशिर बोस कार घेऊन त्यांची वाट पाहत होता. तेथून नेताजी गोमोह नावाच्या रेल्वेस्टेशनवर गेले. तिथून ते पेशावरला गेले. पेशावरला गेल्यानंतर भगतराम तलवार यांच्यासोबत नेताजी पायदळ अफगाणिस्तानची राजधानी काबूलकडे निघाले. वाटेमध्ये त्यांनी ‘मौलाना जियाउद्दिन’ असे नाव धारण केले होते. अनेक अडचणींचा सामना करत इंग्रजांचा व स्थानिक कबायली लोकांचा ससेमिरा चुकवत नेताजी काबूलला पोहोचले. तेथे ते उत्तमचंद्र नावाच्या व्यक्तीच्या घरी थांबले.
 
 
तेथे त्यांनी इटलीच्या राजदूतांची भेट घेतली व त्यांच्या मदतीने तेथून ते जर्मनीची राजधानी बर्लिनला पोहोचले. तिथे जाऊन त्यांनी हिटलरची भेट घेतली व भारतीय स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून दिले. परंतु हिटलरकडून आपल्याला फारशी मदत होणार नाही, हे लक्षात आल्यावर पाणबुडीने समुद्रातला प्रवास करीत ते जपानला पोहोचले. ही पाणबुडी दिवसभर समुद्राच्या तळाशी राहायची व रात्र होताच प्रवास करायला लागायची. अतिशय छोट्या जागेत अनेक दिवस प्रवास करीत नेताजी जपानला पोहोचले व त्यानंतरच आझाद हिंद फौजेची स्थापना झाली. नेताजींचे संपूर्ण जीवन व त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी केलेले कठोर परिश्रम हे आम्हा भारतीयांसाठी प्रेरणास्पद आहेत. 30 डिसेंबर 1943 रोजी अंदमान-निकोबार बेटांवर फडकविलेला तिरंगा हा आमच्या सैन्याचा एक मोठा विजय दिवस आहे. ‘दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल’ असे म्हणणार्‍या लोकांनी आझाद हिंद फौजेचा इतिहास एकदा वाचावा असे वाटते. भारतीयांनी आझाद हिंद फौजेचे, त्यांच्या सैनिकांचे व देश गौरव Netaji Subhash Chandra Bose नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे स्मरण ठेवणे आवश्यक आहे. 
 
- 9552535813
(लेखक प्रसिद्ध वक्ते, सामाजिक व राजकीय विचारक आहेत.)