साप्ताहिक राशिभविष्य, 22 ते 28 जानेवारी 2023

22 Jan 2023 06:00:00
साप्ताहिक राशिभविष्य 

saptahik  
 
 
मेष (Aries) : कामात धडाडी दिसणार
Weekly-Horoscope : या आठवड्यात आपल्याकडून काही धडाडीची कामे पूर्ण होऊ शकतील. विशेषतः कार्यक्षेत्रात आपल्या कामाची चुणूक दिसून येईल. काही धाडसाची पावले आपण या आठवड्यात उचलाल. त्याचे दीर्घकाळ उत्तम लाभ आपणास प्राप्त होत राहतील. कुटुंबातूनही आपल्या योजनांना चांगला प्रतिसाद मिळेल. प्रवासाच्या योजना संभवतात. काही मंगलकार्याची आखणी होईल. आजूबाजूला आनंद व समाधानाचे वातावरण राहील. विद्यार्थिवर्गाला हा आठवडा उत्साहवर्धक राहील.
शुभ दिनांक- 22, 23, 26, 27.
 
 
वृषभ (Taurus) : आर्थिक घडी मजबूत
या आठवड्यात आपली आर्थिक घडी मजबूत होताना दिसेल. विशेषतः व्यवसायात असलेल्या व्यक्तींची आवक वाढेल. जुनी येणी येऊ लागतील. काही अचानक निर्णयामुळे मोठा आर्थिक लाभ होऊ शकेल. तसेच काही आकस्मिक घटनांची नोंद करता येऊ शकेल. कुटुंबात काही मोठ्या खरेदीचे विचार साकार होऊ शकतात. प्रवासाच्या योजना ठरतील. दरम्यान, काही किरकोळ घटना मनाचा हिरमोड करू शकतात. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी समाधानकारक काळ.
शुभ दिनांक- 24, 25, 26, 27.
 
 
मिथुन (Gemini) : कामांमधून कस लागणार
Weekly-Horoscope : या आठवड्यातील ग्रहमान पाहता आतापर्यंत काहीसा विस्कळीत ठरलेला काळ जरा सुगठित होऊन आपल्याला कार्यक्षेत्रात महत्त्व प्राप्त व्हावे. नोकरी- व्यवसायात व्यग्रता वाढेल. काही जबाबदारीची कामे आपल्याला आवर्जून दिली जाऊ शकतात. स्वतःचे महत्त्व वाढवून घेण्यासाठी हे लाभकारकच ठरेल. विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग वाढेल. दरम्यान, खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष कदापि होऊ देऊ नये. पथ्ये सांभाळावीत. विद्याथिर्र्वर्गास उत्तम काळ.
शुभ दिनांक- 25, 26, 27, 28.
 
 
कर्क (Cancer) : सावध निर्णय घ्यावेत
या आठवड्याची सुरुवात एखाद्या आनंददायक घटनेने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रवास, एखादी मोठी खरेदी वगैरे होऊ शकते. मात्र कुणाला उधार, उसनवारी देण्याचा प्रसंग आल्यास सावध निर्णय घ्यायला हवा. गुंतवणूक सध्या टाळावी. हा आठवडा तसा विविध समारंभांत सहभाग, भ्रमंती यामुळे उत्साहात पार पडू शकतो. नोकरी-व्यवसायात सहकार्‍यांशी वादविवाद उद्भवण्याची शक्यता आहे. विरोधकांपासूनही सावध असावे. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत आवश्यक.
शुभ दिनांक- 22, 24, 26, 28.
 
 
सिंह (Leo) : यशाची कमान उंचावणार
Weekly-Horoscope : या आठवड्यात आपल्या सर्व प्रकारच्या प्रयत्नांना उत्तम बळ मिळताना दिसेल. नोकरी-व्यवसायातील कामाचे कौतुक होईल. व्यवसायात आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. आपल्या संततीस देखील या आठवड्यात शिक्षण, नोकरी संबंधाने काही लक्षणीय यश लाभू शकेल. यशाची कमान उंचावेल. तथापि मनावर संयम ठेवावयास हवा. नव्या योजना पुरेशी खबरदारी घेऊन सुरू करावयास हरकत नाही. गुंतवणूक तूर्त टाळावी. विरोधकांच्या कारवायांवर लक्ष ठेवावे. विद्यार्थिवर्गास आठवडा उत्तम ठरावा.
शुभ दिनांक- 24, 25, 26, 27.
 
 
कन्या (Virgo) : कार्यक्षेत्रात महत्त्वपूर्ण घडामोडी
या आठवड्यात आपल्या व्यवसाय किंवा नोकरीच्या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण घडामोडी संभवतात. काही अपेक्षित बदल आनंददायक ठरावेत. जबाबदारीने सोपविलेले काम पूर्ण करून दाखवाल. आपली आर्थिक आवकदेखील वाढेल. काही युवकांना व्यावसायिक वाटचाल सुरू करण्यास उत्तम संधी लाभू शकेल. विवाहादी कार्याच्या दृष्टीने योग चालून येतील. मात्र या सार्‍यात प्रलोभनांच्या मागे धावू नका असे मुद्दाम सुचवावेसे वाटते. कुटुंबात समाधान राहील. विद्याथिर्र्वर्गाला उपयुक्त काळ.
शुभ दिनांक- 25, 26, 27, 28.
 
 
तुला (Libra) : उत्साह व समाधान लाभेल
Weekly-Horoscope : हा आठवडा आपणास व कुटुंबास प्रामुख्याने आनंदमय व कामात यश प्रदान करणारा राहील. छोट्या-छोट्या कामातूनही आपला उत्साह व समाधान दृष्टिगोचर होत राहील. कार्यक्षेत्रात मात्र सहकार्‍यांशी गोड बोलून काम काढून घेण्याचे तंत्र अवलंबावे लागेल. मित्र परिवार वा भाऊबंदकीत काही वाद निर्माण होणार नाही, याची काळजी घ्या. युवा वर्गास चांगल्या संधी लाभू शकतील. विवाहादी कार्यासाठी चांगले योग चालून येतील. प्रवासाचे योग संभवतात. विद्यार्थिवर्गास उत्तम काळ आहे.
शुभ दिनांक-22, 24, 25, 27.
 
वृश्चिक (Scorpio) : जोखीम पत्करणे धोक्याचे
हा आठवडा आपणास काहीसा कष्टप्रद व मनाविरुद्ध घटनांनी युक्त ठरू शकतो. या काळात प्रकृतीची देखील आपण काळजी घेतली पाहिजे. कार्यालयीन हितशत्रूंच्या कारवायांमुळे निर्माण झालेली बोचदेखील जाणवणार. हे सारे पाहता क्षमतेपेक्षा मोठी उडी मारू नका. जोखीम पत्करणे धोक्याचे राहील. सावध पवित्रा असावा. कार्यक्षेत्रातील वातावरण जरा युक्तीनेच सांभाळावे. खर्चावर नियंत्रण हवे. कुटुंबातून सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना परीक्षेतील यशासाठी जोमाने प्रयत्न करावे लागतील.
शुभ दिनांक- 22, 24, 25, 28.
 
 
 
धनु (Sagittarius) : आर्थिक लाभ वाढणार
Weekly-Horoscope : हा आठवडा आपणास आर्थिक लाभाचा व महत्त्व वाढीस लावणारा ठरू शकतो. जोडीदाराकडून तसेच व्यावसायिक भागीदाराकडून उत्तम प्रतिसाद हे या आठवड्याचे मुख्य फलित ठरावे. आपल्या योजनांना बळ मिळेल. काही धाडसी निर्णय घेण्यास हरकत नाही. त्वरित लाभ दिसला नाही तरी त्याची उत्तम फले सावकाश हाती येतील. युवावर्गास कार्यक्षेत्रात चांगल्या संधी लाभतील. आकस्मिक खर्चांनादेखील तोंड द्यावे लागू शकते. कुटुंबातून सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तम यश मिळावे.
शुभ दिनांक- 24, 26, 27, 28.
 
 
मकर (Capricorn) : उपयुक्त संधी लाभतील
हा आठवडा व्यावसायिक लाभासाठी उत्तम राहील. आपला अर्थत्रिकोण सक्रिय होत असल्याने नोकरी-व्यवसायात चांगले यश मिळावे. नोकरीसाठी प्रयत्नशील युवा वर्गास उपयुक्त संधी लाभू शकतील. आर्थिक आवकदेखील वाढेल. प्रकृतीची कुरबुर असलेल्यांना जरूर दिलासा मिळेल. कुटुंबातून तसेच कार्यक्षेत्रात सहकारी वर्गाकडून अपेक्षित मदत मिळावी. कुटुंबात काही खरेदीचे योग संभवतात. मात्र स्वभावात मृदुपणा बाणावा लागेल. कटु बोलून श्रेय गमावू नका. विद्यार्थिवर्गास उत्तम योग.
शुभ दिनांक- 24, 25, 26, 27.
 
 
कुंभ (Aquarius) : योजनांना निश्चित दिशा
Weekly-Horoscope : हा आठवडा आपणास सर्वतोपरी उत्तम जावा. अगोदर केलेल्या एखाद्या महत्त्वपूर्ण कार्याचा लाभ या आठवड्यात मिळू शकतो. आर्थिक फायदाही मिळणार. मुलांकडून अपेक्षित बातम्या कळू शकतात. त्यांचे यश निश्चितपणे सुखावून जाईल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. सहलीच्या, प्रवासाच्या योजना आखल्या जातील. विशेषतः शिक्षणासाठी बाहेर जाऊ इच्छिणार्‍यांच्या योजनांना दिशा मिळेल. कलाक्षेत्रातील मंडळींना आठवडा उत्तम जावा. विद्यार्थिवर्गाला परीक्षेत मोठे यश मिळवता येईल.
शुभ दिनांक- 22, 25, 27, 28.
 
 
 
मीन (Pisces) : व्यवसायात तंगी व मंदी
Weekly-Horoscope : या आठवड्याची सुरुवात काहीशा तंगी-तणावाच्या स्थितीतच होण्याची शक्यता दिसते. व्यवसायात मंदीचे वातावरण जाणवेल. नोकरीत काहीसा तणाव वाढेल. अधिकारीवर्गाशी आपल्याला जुळवून घ्यावे लागेल. कुटुंबातून मात्र आपणास उत्तम साथ मिळेल. पेच निर्माण झाल्यास वडिलधार्‍या मंडळींचा सल्ला उपयुक्त ठरेल. सावधगिरी म्हणून नवीन कोणताही उपक्रम तूर्त सुरू करू नये. आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये. वाहने सांभाळून चालवावीत. विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम घ्यावे लागतील.
शुभ दिनांक- 24, 26, 27, 28.
 
- मिलिन्द माधव ठेंगडी/ज्योतिष शास्त्री, 8600105746
Powered By Sangraha 9.0