प्रणव अवतार महोत्सवानिमित्त पालखी मिरवणूक

23 Jan 2023 19:17:00
मेहकर, 
Pranav Avatar festival : येथील श्रीक्षेत्र ज्ञानमंदिर परिसरात संत बाळाभाऊ महाराज पितळे तथा श्वासानंद माऊली यांचा 93 वा प्रणव अवतार महोत्सव हजारो भक्तांच्या मांदियाळीत उत्साहात साजरा करण्यात आला. श्री नरसिंह संस्थानतर्फे आयोजित या महोत्सवात राज्याच्या कानाकोपर्‍यातून महाराजांचे भक्त सहभागी झाले होते.
  
Pranav Avatar festival
 
विद्यमान पीठाधिश सद्गुरु ड.रंगनाथ महाराज पितळे यांच्या सानिध्यात 19 ते 21 जानेवारी या कालावधीत या महोत्सवामध्ये भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल होती. त्र्यंबकराव शिंदे (वाशिम) यांच्याहस्ते प्रारंभी धर्मध्वजारोहण करण्यात आले. काकडा भजन, हरिपाठ, गाथा भजन आदी नियमाच्या कार्यक्रमांसह संजय महाराज देशमुख (मेहकर), तुकाराम महाराज कडपे (परभणी), नामदेव महाराज काकडे (वाशिम) व देविदास महाराज घुगे (भंडारी) यांच्या कीर्तन व प्रवचनांचे कार्यक्रम झाले. संस्थानचा सामाजिक उपक्रम म्हणून या महोत्सवात भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.
 
 
महाराजांच्या पादुकांची टाळमृदंगाच्या निनादात नगरातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. हजारो भाविकांनी श्वासानंदनामाचा जयघोष करून पालखीमध्ये सहभाग घेतला. रस्त्यावर सडासंमार्जन करून व रांगोळ्या काढून नगरवासीयांनी पालखीचे स्वागत केले. ठिकठिकाणी सुवासिनींनी पालखीला ओवाळले. बालाजी मंदिराच्या मैदानात पालखीभोवती गोल रिंगण करण्यात येऊन भाविकांनी फुगडी, पिंगा व इतर पाऊल्या खेळल्या. दिंडीतील भाविकांना ठिकठिकाणी खाद्यपदार्थ व चहाचे वितरण करण्यात आले. काल्याच्या कीर्तनानंतर वझर आघाव येथील ग्रामस्थांतर्फे सद्गुरु ड.रंगनाथ महाराज पितळे यांचे गुरुपूजन करण्यात आले. तसेच प्रथेनुसार महोत्सवात सहभागी झालेल्या तीनशे गावांच्या प्रतिनिधींना सद्गुरूंच्या हस्ते मानाचे श्रीफळ देण्यात आले. महोत्सवाच्या शेवटी हजारो भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
 
Powered By Sangraha 9.0