'स्मरण भाषाप्रभूंचे : विविध कार्यक्रमांद्वारे 'गोविंदाग्रजां'चे स्मरण

24 Jan 2023 18:04:23
नागपूर, 
Ram Ganesh Gadkari : अखिल भारतीय साहित्य परिषद ,नागपूर जिल्हा समिती, केशवनगर सांस्कृतिक सभा आणि आणि कलासंगम नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राम गणेश गडकरी “गोविंदाग्रज” यांच्या पुण्यतिथी निमित्ताने “स्मरण भाषप्रभूंचे” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन सेवासदन विद्यालयाच्या लीलाताई जठार सभागृहात 23 जानेवारीला करण्यात आले. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम दीप प्रज्वलन करुन संपन्न झाला. विलास मानेकर सरचिटणीस, विदर्भ साहित्य संघ, दिलीप चिंचमलातपुरे आणि जयंत खळतकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाची संकल्पना, नियोजन आणि आरेखन ज्येष्ठ निवेदक प्रकाश एदलाबादकर याचे असून, सुत्रसंचालकाची भूमिका त्यांनीच पार पाडली.
 
Ram Ganesh Gadkari
 
एकच प्याला, प्रेम संन्यास, पुण्यप्रभाव आणि भावबंधन अशी एकाहून एक सरस नाटके लिहणारे मराठी नाटककार, कवी, विनोदी लेखक राम गणेश गडकरी (Ram Ganesh Gadkari) यांनी “गोविंदाग्रज” या नावाने सुमारे दीडशेपेक्षा जास्त कविता लिहून “बाळकराम” या टोपण नावाने अनेक विनोदी लेख लिहिले. २६ मे १८८५ ला नवसारी गुजरात येथे जन्म झालेल्या राम गणेश गडकरी यांचा मृत्यू सावनेर येथे २३ जानेवारी १९१९ ला वयाच्या केवळ ३४ साव्या वर्षी झाल्याचे प्रकाश एदलाबादकर यांनी सूत्रसंचालनात सांगून त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकला.
 
 
या निमित्ताने ज्येष्ठ कलावंत प्रा. डॉ. सुरुची डबीर यांनी गाजलेल्या ‘एकच प्याला’ या गडकर्‍यांच्या (Ram Ganesh Gadkari) नाटकातील ‘गडकर्‍यांची सिंधू’ हा एकपात्री नाट्यप्रवेश उत्कृष्ट वेशभूषेसह प्रभावी संवादाने सादर केला. गोविंदाग्रजांच्या निवडक कवितांचे प्रभावी अभिवाचन कवयित्री मनीषा अतुल, शलाका जोशी, विवेक अलोणी आणि प्रकाश एदलाबादकर यांनी करून, कवितेच्या विविध वृत्तांची आणि जुन्या काळातल्या शब्द सामर्थ्याची ओळख करून दिली. तसेच गोविंदग्रजांनी रचलेल्या शंभर वर्षापूर्वीचे मंगळाष्टक एदलाबादकर यांनी गाऊन दाखविले.
 
 
कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात राम गणेश गडकरी यांच्या काही नाटकातील अजरामर पदांचे सुंदर सादरीकरण विशाखा मंगदे, सानिका रुईकर आणि गुणवंत घटवाई यांनी केले. नाट्यसंगीताची सुरेख वाद्य संगत तबल्यावर राम ढोक, संवादिनीवर अमोल उरकुडे यांनी केली. या कार्यक्रमाचे प्रभावी संचालन डॉ. अमृता इंदूरकर यांनी केले तर अॅड. सचिन नारळे यांनी आभार प्रदर्शन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, अॅड. कुमकुम सिरपूरकर, माधुरी साकुळकर, पत्रकार अविनाश पाठक, पर्यटन लेखक श्रीकांत पवनीकर आयुर्विम्याच्ये निवृत्त प्रबंधक शिवप्रसाद झलके आदी मान्यवर परिवारासह उपस्थित होते.
             सौजन्य : श्रीकांत पवनीकर, संपर्क मित्र
 
Powered By Sangraha 9.0