तभा वृत्तसेवा
गोंदिया,
उपविभाग अर्जुनी मोरगाव अंतर्गत (caste certificate) येणार्या शाळांमध्ये पहिली ते दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना किमान कागदपत्र व शासकीय दरात जात प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी यांनी पुढाकार घेतला आहे. 31 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान जात प्रमाणपत्र वितरणाचा विशेष कालबद्ध कार्यक्रम आखला आहे.
यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत जात प्रमाणपत्र (caste certificate) उपलब्ध तर होणारच सोबतच पालकांच्या वेळेची व पैशाचीही बचत होणार आहे. यासाठी केंद्र प्रमुख व मुख्याध्यापकांची भूमिका अतिशय उपयुक्त व मोलाची आहे. अनु. जाती, अनु. जमाती, इमाव, विजा, भज, विमाप्र इत्यादी प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र काढताना त्यांच्या पालकांना नानाविध अडचणींना सामोरे जावे लागते. ही बाब जाणून घेत उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी यांनी जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी येणार्या अडचणी दूर करून किमान कागदपत्र व शासकीय शुल्कात ते उपलब्ध करुण देण्यासाठी अर्जुनी मोर तालुक्यातील सर्व शाळांच्या सहकार्यातुन 31 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत शाळेतच दाखले वितरण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे वेळापत्रक तालुक्यातील सर्व शाळांना पाठविले असून शाळेच्या प्रशासनाने त्यानुसार तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व केंद्र प्रमुख व मुख्याध्यापकांनी ज्या विद्यार्थांकडे जातीचे दाखले नाहीत त्यांची यादी तयार करुन अर्ज भरुन घेणे, दाखल्यासाठी लागणारे कागदपत्र जमा करणे, शुल्क रक्कम जमा करणे, 08 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांनी प्राप्त झालेले अर्ज सेतुचालकांकडे सादर करणे व सेतुचालकांनी प्राप्त अर्ज तपासून ऑनलाईन नोंद करण्याची प्रक्रिया पार पाडावी. 12 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडुन ऑनलाईन दाखले मंजुर केली जाणार आहेत. मंजूर जात प्रमाणपत्र केंद्र प्रमुख व मुख्याध्यापकांमार्फत शाळेत उपलब्ध करुण देण्यात येतील. जास्तीत जास्त विद्यार्थी, पालक व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी विजयकुमार सूर्यवंशी यांनी केले आहे.