भारताच्या मुलींनी घडविला इतिहास

- प्रथमच जिंकला अंडर-19 टी-20 विश्वचषक
- अंतिम सामन्यात इंग्लंडचा सात गडी राखून पराभव
- संपूर्ण देशात आनंदाची लाट

    29-Jan-2023
Total Views |
नवी दिल्ली, 
भारतीय महिलांनी इतिहास घडवत प्रथमच आयसीसी अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक (T20 World Cup) 2023 जिंकला आहे. रविवारी टीम इंडियाचा अंतिम सामना इंग्लंडच्या संघाविरुद्ध होता. पण प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ केवळ 68 धावांतच गारद झाला. प्रत्युत्तरात सौम्या तिवारीच्या उत्कृष्ट खेळीमुळे भारतीय संघाने सहज विजय मिळवला. भारतीय मुलींनी केलेल्या प्रचंड पराक्रमामुळे संपूर्ण देशात आनंदाची लाट पसरली असून देशभरात युवक-युवतींनी रस्त्यावर उतरून, पेढे मिठाई वाटून आनंद साजरा केला.
 
T20 World Cup
 
T20 World Cup : प्रथम खेळण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात खराब झाली. पश्चिम बंगालच्या तितास साधूने सलामीच्या षटकातच लिबर्टी हीपची विकेट घेतली. धावसंख्या जेमतेम 15 पर्यंत पोहोचली असताना अर्चना देवीने फिओना हॉलँडचा त्रिफळा उडवला. मधल्या फळीत मॅकडोनाल्ड गेने 24 चेंडूत 19 तर अलेक्सा स्टोनहाऊसने 25 चेंडूत 11 धावा केल्या. शेवटच्या षटकांत सोफियाने 11 धावा केल्या. मात्र धावसंख्या 68 च्या पुढे जाऊ शकली नाही. दुसरीकडे भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. तितास साधूने 4 षटकांत केवळ 6 धावा देत 2 बळी घेतले. तर अर्चना देवीने 17 धावा देऊन दोन, पर्शवी चोपडाने 13 धावांत दोन, मन्नत कश्यपने 13 धावा देऊन एक, शेफाली वर्माने 16 धावा देत एक तर सोनम यादवने तीन धावा देत एक गडी बाद केला.
 
 
T20 World Cup : लक्ष्याचा पाठलाग करण्यास मैदानात उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवातही खराब झाली. शेफाली वर्मा 15 तर श्वेता सेहरावत 5 धावा करून तंबूत परतल्या. मात्र, सौम्या तिवारी आणि त्रिशा यांनी एक टोक सांभाळून ठेवत भारताला विजय मिळवून दिला.16 धावांत तीन गडी गमावल्यानंतर इंग्लंडचा संघ दडपणाखाली आला आणि भारतीय गोलंदाजांनी याचा फायदा घेत ठरावीक अंतराने गडी बाद केले. 22 धावांवर इंग्लंडचा चौथा गडी तंबूत परतला. तितास साधूने सेरेनचा त्रिफळ उडविला. यानंतर चॅरिस पावले आणि मॅकडोनाल्ड यांनी 17 धावांची भागीदारी केली. पावले बाद होण्याबरोबरच इंग्लंडचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर भारतीय गोलंदाजांनी ठरावीक अंतराने गडी बाद करीत इंग्लंडचा संघ 68 धावांत गुंडाळला. इंग्लंडकडून मॅकडोनाल्डने सर्वाधिक 19 धावा केल्या. त्याचवेळी अलेक्सा स्टोनहाऊस आणि सोफिया यांनी 11 धावांची खेळी केली. हॉलंडनेही 10 धावा केल्या. या चौघींशिवाय इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.
 
 
भारताची खराब सुरुवात
T20 World Cup : शेफाली वर्मा, ऋचा घोष आणि श्वेता सेहरावतसारख्या स्टार खेळाडूंचा समावेश असलेल्या टीम इंडियाला 69 धावांचे अत्यंत सोपे लक्ष्य होते. परंतु इंग्लंडच्या गोलंदाजांनी शानदार सुरुवात केली. भारतीय डावाच्या तिसर्‍या षटकात कर्णधार शेफाली 15 धावांवर बाद झाली. पुढच्याच षटकात पाच धावा काढून श्वेता सेहरावतही बाद झाली. 20 धावांच्या आत भारताने आपले दोन महत्त्वाचे फलंदाज गमावले होते. श्वेता या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे, तर शेफाली तिसर्‍या स्थानावर आहे. दोन गडी झटपट बाद झाल्याने भारतीय संघ दडपणाखाली आला होता. परंतु सौम्या तिवारी आणि गोंगडी त्रिशा या जोडीने चांगली भागीदारी केली. दोघांनी तिसर्‍या गड्यासाठी 46 धावांची भागीदारी केली. मात्र, गोंगडी त्रिशा भारताच्या विजयापूर्वीच बाद झाली. तिने 29 चेंडूत 24 धावा केल्या. शेवटी सौम्या तिवारीने विजयी फटका हाणून सामना संपुष्टात आणला. तिने 37 चेंडूत नाबाद 24 धावा केल्या. इंग्लंडकडून हॅना बेकर, ग्रेस स्क्रिव्हन्स आणि अलेक्सा स्टोनहाउसने प्रत्येकी एक गडी बाद केला.
 
 
बीसीसीआयकडून पाच कोटींची घोषणा
T20 World Cup : भारतीय महिलांनी पहिली वहिली आयसीसी स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केल्याने बीसीसीआयमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण आहे. बीसीसीआयमचे सचिव जय शाह यांनी मुलींना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर विजयाच्या जल्लोष करण्याचे निमंत्रण दिले आणि संघाला 5 कोटींच्या बक्षिसाच्या रकमेची घोषणा केली. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला टी-20 विश्वचषक जिंकला होता आणि आज शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली 19 वर्षांखालील मुलींनी तसाच पराक्रम केला.