गोवंश हत्या बंदी कायदा काटेकोर अंमलात आणा

*जिल्हाधिकारी गौडा यांच्या सूचना
*प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीचा आढावा

    दिनांक :03-Jan-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर,
महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 अन्वये करण्यात आलेल्या तरतुदीनुसार राज्यात (Cattle Slaughter Act) गोवंश हत्या बंदी अंमलात आली आहे. या अधिनियमातील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे अशी सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिली आहे. जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक समिती स्थापन करण्यात आली असून, जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी यासंदर्भात मंगळवारी आढावा बैठक घेतली.
 
Cattle Slaughter Act
 
वीस कलमी सभागृह येथे आयोजित या बैठकीला उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंगेश काळे, जि. प. पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उमेश हिरुडकर, चंद्रपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुवर्णा चव्हाण, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कल्पना चव्हाण, मनपा उपायुक्त गराटे आदी उपस्थित होते.
 
 
बेकायदेशीर (Cattle Slaughter Act) पशुंची वाहतूक करताना पोलिसांमार्फत पकडण्यात आलेल्या पशुंचे संगोपन करण्यासाठी गोशाळांना हस्तांतरण करण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्यानुसार अवैधरित्या वाहतूक करताना जप्त करण्यात आलेल्या पशुंच्या संदर्भात पोलिसांकडून संबंधितांविरुध्द तात्काळ गुन्हा दाखल करण्याबाबत कायद्यातील तरतुदींचे योग्य पालन करण्यात यावे. गुन्हा दाखल झाल्यानंतर जप्त करण्यात आलेल्या पशुंची पशुवैद्यकीय अधिकार्‍यांकडून आरोग्य तपासणी करून पशु स्वास्थ दाखला त्याच दिवशी घेण्यात यावा. गुन्हा दाखल केल्याशिवाय कोणताही पशु गोशाळेला देण्यात येऊ नये.
 
 
जप्त करण्यात आलेले (Cattle Slaughter Act) पशु गोशाळेत विहित प्रक्रिया अवलंबून पाठवावेत. गोशाळेत पायाभुत सुविधा असल्याची तसेच गोशाळेच्या पदाधिकार्‍याविरुध्द गुन्हा दाखल नसल्याची खात्री करून घ्यावी. जप्त करण्यात आलेल्या पशुंचे संगोपन करण्याची जबाबदारी गोशाळा प्रशासनाची राहील. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त तथा जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीचे सदस्य सचिवांच्या लेखी परवानगीशिवाय जप्त करण्यात आलेल्या पशुंचे इतर व्यक्ती, संस्थांकडे हस्तांतरण करता येणार नाही. तसेच शेतकर्‍यांना वापरण्यासाठी किंवा विक्री करण्यासाठी परवानगी देता येणार नाही, असे शासन निर्णयात म्हटले आहे.
 
 
जिल्ह्यात प्रत्येक पोलिस ठाण्यानुसार यासदंर्भात किती गुन्हे दाखल आहेत व ते कोणत्या भागात सर्वाधिक आहेत, याचे योग्य वर्गीकरण करावे. जिल्ह्यातील (Cattle Slaughter Act) गो शाळांची यादी अद्ययावत ठेवा. प्रत्येक महिन्यात जिल्ह्यात अशा किती घटना घडतात, त्याची नोंद ठेवावी. जिल्हा प्राणी क्लेष समितीवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यासंदर्भात पोलिस विभागाकडे चारित्र्य पडताळणी अहवाल प्रलंबित असल्यास तो तातडीने देण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी दिल्या.
 
 
जिल्ह्यात कार्यरत असलेल्या गोशाळा
उज्ज्वल गोरक्षण संस्था (Cattle Slaughter Act) (लोहारा), जय श्वेतांबर तीर्थ गोशाळा (भद्रावती), प्यार फाऊंडेशन (चंद्रपूर), गोशाळा चुनाळा (ता. राजुरा), गोविंद गोशाळा गोरक्षण संस्था (हळदा, ता. ब्रम्हपुरी), श्रीकृष्ण गोशाळा (तोहोगाव, ता. गोंडपिपरी) आणि भारतीय गोरक्षण व गोशाळा संस्था (तळोधी बा. ता. नागभीड).