...आणि बच्चू कडूंच्या संतापातील हवा निघाली !

31 Jan 2023 20:52:28
तभा वृत्तसेवा 
शिरजगाव कसबा, 
चांदूर बाजार तालुक्यातील करजगाव येथील बहुर्डा नदीवरील संरक्षण भिंतीच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्याकरता आमदार बच्चू कडू (Bachu Kadu) यांनी 27 जानेवारीला बांधकाम स्थळावर भेट दिली. नदीवरील पूर संरक्षण भिंतीच्या उंची संदर्भात त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. भिंतीच्या उंचीवरून त्यांनी अभियंत्याला चांगलेच धारेवर धरले आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे संतप्तही झाले. मात्र, खरे तांत्रिक कारण अभियंत्याने सांगितल्यावर त्यांच्या संतापाची हवाच निघून गेली. यावरून नागरिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया असून खमंग चर्चा आहे.
 
Bachu Kadu
 
त्याचे झाले असे की, करजगाव येथील बहुर्डा नदीला पूर संरक्षण भिंत उभारण्याकरिता शासनाकडून 498.3 लक्ष रुपये निधी मंजूर झाला असून पूर संरक्षण भिंतीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. जलसंपदा विभाग अमरावती मध्यम प्रकल्पाच्या माध्यमातून हे काम होत आहे. या कामाची पाहणी करण्याकरिता आमदार बच्चू कडू हे 27 जानेवारीला बहुर्डा नदीवरील कामाच्या स्थळावर आले. त्यांनी चालू असलेल्या कामाचे निरीक्षण करून तांत्रिक बाबीवर संताप व्यक्त केला. शाखा अभियंता सरोदे यांना त्यांनी बरेच बोल सुनावले. नदी पात्राची रुंदी अधिक ठेवायला पाहिजे होती, उंच भिंत घ्यायला नको होती, असे प्रश्न उपस्थित केले. बहुर्डा नदीच्या दोन्हीही बाजूच्या पूर संरक्षण भिंतीचे भूमिपूजन आमदार बच्चू कडू (Bachu Kadu) यांच्या हस्ते झाले होते. त्यामुळे ते कामाची पाहणी करण्याकरता आले असता हा प्रकार घडला.
 
 
भिंतीची उंची जास्त घेतल्यामुळे पुराचे पाणी गावात शिरण्याचा धोका होईल ही शंका आ. कडू यांनी उपस्थित केली. यावर शाखा अभियंत्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, दोन भिंतीच्या मधातील नदीपात्र हे 19 मीटरचे असून दोन्ही बाजूने भिंत असल्याने गावात पाणी शिरण्याचा धोका नाही, तसेच काम योग्य पद्धतीने चालू असल्याचेही शाखा अभियंता सतीश सरोदे यांनी सांगताच व त्यांनी आपले नम्रपणे स्पष्टीकरण दिल्यानंतर आमदार बच्चू कडूंच्या संतापातील हवाच निघून गेली. या बाबीची खमंग चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.
 
Powered By Sangraha 9.0