नादुरूस्त रोडरोलरवर दुचाकी आदळली

31 Jan 2023 21:03:08
तभा वृत्तसेवा 
अचलपूर, 
सालबर्डी येथून महादेवाचे दर्शन करून अचलपूरला येत असतांना बेलज फाट्यानजीक रस्त्यावर नादुरूस्त अवस्थेत उभ्या असलेल्या रोलरवर (Road Roller) दुचाकी आदळून दुचाकीवरील 46 वर्षीय अचलपुरातील विलायतपुर्‍यातील रहिवासी चालक प्रदीप श्रीराम राखोंडे यांचा जागीच मृत्यू झाला तर 40 वर्षीय पत्नी नीलिमा राखोंडे गंभीर जखमी असून 12 वर्षीय मुलगा सार्थक याला किरकोळ मार लागला आहे.
 
Road Roller
 
प्राप्त माहितीनुसार, अचलपूर येथील रहिवासी राखोंडे परिवार सोमवारी श्री क्षेत्र सालबर्डी येथे महादेवाच्या दर्शनाकरिता गेले असता सायंकाळच्या वेळेला तिथून परत येत असताना अचलपूर शहरानजीक असलेल्या बेलज फाट्याजवळ नादुरूस्त अवस्थेत असलेल्या रोडरोलरवर (Road Roller) दुचाकी आढळून अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच सरमसपुरा पोलिसांसह नातेवाईकांनी धाव घेत जखमींना उपचाराकरिता प्रथम अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमी महिलेची प्रकृती बिघडल्यामुळे पुढील उपचाराकरिता अमरावतीच्या सावदेकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. गाडीवर असलेल्या मुलगा सार्थक हा किरकोळ जखमी झाला आहे. व्यवसायाने मजूर असलेला प्रदीप हा भजन, कीर्तनाचा छंद असल्यामुळे सालबर्डी येथे गेला होता.
 
 
रोलरच्या मालकावर गुन्हा दाखल करा
रस्त्याच्या मधोमध बंद असलेल्या रोडरोलरच्या मागे पुढे कुठल्याच प्रकारचे रिफ्लेक्टर म्हणून रेडियम लावलेले नव्हते. कुठल्याच प्रकारची सुरक्षात्मक उपाययोजना केली नव्हती. समोरून आलेल्या मोठ्या वाहनाच्या लाईटमुळे उभे असलेले रोलर दिसले नसल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत असून संबंधित रोडलरचा मालक व चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांकडून होत आहे. पुढील तपास सरमसपुरा पोलिस करीत आहेत.
 
Powered By Sangraha 9.0