आज मुख्य सभामंडपात खंजिरी भजन

31 Jan 2023 20:30:01
तभा वृत्तसेवा 
वर्धा, 
Khanjiri Bhajan : वर्धा येथे आयोजित 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलन 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान होत असले तरी प्रत्यक्ष सुरुवात मात्र बुधवार 1 फेब्रुवारी रोजीच सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांच्या खंजिरी भजनाने होणार आहे.
 
Khanjiri Bhajan
 
3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान परिसंवाद, कथाकथन, निमंत्रितांचे कविसंमेलन, परिचर्चा, प्रकट मुलाखत, मुक्त संवाद, विशेष कार्यक्रम, खुले अधिवेशन असे विविध कार्यक्रम होत आहे. परंतु, या संमेलनात पहिल्यांदाच प्रत्यक्ष संमेलन सुरू होण्याच्या दोन दिवस आधीपासुनच साहित्य रसिकांना विविध कार्यक्रमांची मेजवाणी राहणार आहे. 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजता मुख्य सभामंडपात सप्त खंजिरी (Khanjiri Bhajan) वादक सत्यपाल महाराज यांचे खंजिरी भजन व प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे. संमेलनात राज्य व राज्याबाहेरुन येणार्‍या साहित्य रसिकांसाठी ग्रंथदालन प्रमुख आकर्षण असते.
 
 
संमेलनाच्या पहिल्या दिवशी उद्घाटन समारंभानंतर या दालनांचे उद्घाटन होऊन ती खुली केली जातात. वर्धा येथील संमेलनात मात्र वेगळेपण जपत आणि ग्रंथ दालने वाचकांना पूर्णवेळ उपलब्ध व्हावे यासाठी 2 रोजी दुपारी 4 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. याच दिवशी सायंकाळी 6.30 वाजता सामुदायिक प्रार्थना व खंजिरी भजन देखील होणार आहे. सामुदायिक प्रार्थना प्रकाश महाराज वाघ व भजन भाऊसाहेब थुटे हे सादर करतील. या सर्व कार्यक्रमांचा साहित्य रसिक व वर्धेकरांनी आस्वाद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
Powered By Sangraha 9.0