उद्यापासून सावंगीत ओरल आँकोलॉजीवर राष्ट्रीय परिषद

31 Jan 2023 21:08:44
तभा वृत्तसेवा 
वर्धा, 
दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठातील स्कूल ऑफ ओरल आँकोलॉजीद्बारे (Oral Oncology) पहिली राष्ट्रीय परिषदेचे आयोजन 2 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता दत्ता मेघे ऑडिटोरियम येथे करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे यांनी आज मंगळवार 31 रोजी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
  
Oral Oncology
 
या (Oral Oncology) परिषदेचे उद्घाटन अभिमत विद्यापीठाचे कुलपती दत्ता मेघे यांच्या हस्ते होणार असून प्रकुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच कुलगुरु डॉ. ललित वाघमारे, प्रकुलगुरु डॉ. गौरव मिश्रा, रजिस्ट्रार डॉ.श्‍वेता काळे-पिसुळकर, डॉ. अभ्युदय मेघे, डॉ. राजीव बोरले आदींची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे, अशी माहितीही डॉ. अभ्युदय मेघे यांनी दिली. यावेळी बोलताना डॉ. मिनल चौधरी म्हणाल्या की, कॅन्सरचे प्रमाण विदर्भात जास्त असून विदर्भ अव्वल स्थानी आहे. तंबाखूमुळे कॅन्सर होत असतो. पहिल्या स्टेजचा कॅन्सर उपचाराने बरा होतो. मात्र, चौथ्या स्टेजला याचे निदान झाल्यास 50 टक्केच रुग्णाची वाचण्याची शक्यता असल्याची माहिती डॉ. चौधरी यांनी दिली. तर कॅन्सर विभागाचे प्रमुख डॉ. नितीन भोला यांनी, कॅन्सरबाबत जनजागृती आवश्यक असल्याची माहिती दिली.
 
 
वर्धेत आजघडीला सिद्धार्थ गुप्ता कॅन्सर मेमोरिअल हॉस्पिटल आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे. रेडिएशनची अत्याधुनिक तंत्रज्ञान सावंगीत आहे. या रुग्णालयात आतापर्यंत एक हजार पेक्षा जास्त रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे. सिद्धार्थ गुप्ता कॅन्सर मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये कॅन्सरमुळे झालेल्या चेहर्‍याचे विद्रुपीकरणावर अत्याधुनिक पद्धतीने सर्जरी करण्याची व्यवस्थाही आहे. त्यामुळे कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांचे मनोबल वाढविण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे. या कार्यक्रमांतर्गत कॅन्सर आजारातून बरे झालेल्या 75 लोकांना बोलावून त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचेही डॉ. नितीन भोला यांनी यावेळी सांगितले.
 
 
4 फेब्रुवारी हा जागतिक कर्करोग दिन असून 4 मार्चपर्यंत सलग एक महिना मध्यभारतातील महत्त्वाच्या गावांमध्ये मोफत कर्करोगपूर्व तपासणी, निदान व उपचार शिबिरांचे आयोजन करण्यात आल्याचे सिद्धार्थ गुप्ता मेमोरिअल कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक, मुखशल्यचिकित्सक डॉ. नितीन भोला यांनी सांगितले. कर्करोगावर प्राथमिक अवस्थेतच उपचार झाल्यास रुग्ण बरा होऊ शकतो. मात्र, कर्करोग होऊच नये यासाठी जनजागृती आणि पूर्वकाळजी अधिक महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले. सावंगीच्या कर्करोग रुग्णालयात गत वर्षभरात सुमारे 750 शस्त्रक्रिया झाल्या असून केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर दिल्ली, बिहार, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या राज्यातील रुग्ण कर्करोगावरील उपचारांसाठी येत असतात, असेही डॉ. भोला यांनी यावेळी सांगितले. पत्रपरिषदेला अभिमत विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय इंगळे तिगावकर, शरद पवार दंत महाविद्यालयाच्या संचालक मनीषा मेघे, अधिष्ठाता डॉ. मनोज चांडक, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. विद्या लोहे, आयोजन समितीच्या अध्यक्ष डॉ. अलका हांडे, डॉ. स्वप्नील मोहोड यांची उपस्थिती होती.
 
Powered By Sangraha 9.0