माघी एकादशीसाठी चार लाख भाविक पंढरपुरात

    31-Jan-2023
Total Views |
पंढरपूर, 
उद्या बुधवारी (Pandharpur) माघी एकादशीनिमित्त चंद्रभागेत पवित्र स्नान करण्यासाठी पंढरपुरात आज मंगळवारी चार लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल झाले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाल्याने ही यात्रा विक्रमी होणार आहे. बुधवारी एकादशीच्या दिवशी पहाटे विठ्ठलाची नित्य पूजा होईल आणि त्यानंतर एकादशीच्या सोहळ्याला सुरुवात होईल. यासाठी मंदिर प्रशासन सज्ज झाले आहे.
 
Pandharpur
 
माघी यात्रेसाठी (Pandharpur) पंढरपुरात आलेल्या भाविकांना सुलभ दर्शन मिळावे, यासाठी योग्य व्यवस्था करण्यात आली असून, दर्शन रांगेत पिण्याचे पाणी, चहा आणि उपवासाच्या खिचडीचे वाटप मंदिर समितीकडून करण्यात येत आहे. तासन्तास दर्शनासाठी रांगेत उभे राहणार्‍या भाविकांना संतांचे अभंग ऐकण्याची सोयही प्रशासनाने केल्याने भाविक प्रसन्न दिसत आहेत.
 
 
माघी यात्रेत औसेकर महाराजांच्या फडाला मोठे महत्त्व असते. औसा येथून प्रतिपदेला निघालेल्या या दिंडी सोहळ्यात जवळपास 18 ते 20 हजार वारकरी सामील झाले आहेत. माघी यात्रा ही वाळवंटातील यात्रा म्हणून ओळखली जात असल्याने सर्व पारंपरिक फडांची कीर्तन, प्रवचन सेवा चंद्रभागेच्या वाळवंटात होत असते. (Pandharpur) यात गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कीर्तनाला हजारोंचा भाविकवर्ग येत असतो. औसेकर फडाचे चक्रीभजन हे माघी यात्रेतील मुख्य आकर्षण असते. या यात्रेसाठी मराठवाडा, विदर्भ, मुंबई, कोकणसह कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या भागातून भाविक दाखल झाले आहेत. माघी यात्रेला राज्याच्या विविध भागांतून पायी दिंड्या पंढरीची वाट चालत आहेत.