‘ते’ पगमार्क वाघाचे नसून तडसाचे

31 Jan 2023 20:44:39
तभा वृत्तसेवा 
चांदूर बाजार, 
Pugmark : तालुक्यातील दिलालपूर शेतशिवारात वाघ दिसल्याच्या चर्चेने शेतकरी वर्गात चांगलेच दहशतीचे वातावरण पसरले होते. यादरम्यान घटनेची माहिती मिळताच वन्यप्राण्यांचे पगमार्क घेण्याकरिता वनपरिक्षेत्र अधिकारी व रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. पगमार्कची तपासणी केली असता ते वाघाचे नसून तडसाचे असल्याचे स्पष्ट झाले.
 
Pugmark
 
चांदूर बाजार ते माधान मार्गावर दिलालपूर शेतशिवारात प्रशांत चर्जन यांचे शेत आहे. सोमवारी 30 जानेवारीला रखवालदार शेतात काम करीत असतांना दुपारी एक वाजताच्या दरम्यान शेतातून वाघ गेल्याची माहिती त्याने शेतमालक चर्जन यांना दिली. वाघोबा आल्याची अफवा परिसरात वार्‍यासारखी पसरताच जसापूर, दिलालपूर परिसरातील शेतकरी घटनास्थळी दाखल झाले व संबंधित घटनेची माहिती शेतकरी प्रदीप बंड यांनी परतवाडा येथील वनविभाग कार्यालयाला दिली.
 
 
घटनेची माहिती मिळताच वनपाल विजय कोहळे व वनरक्षक डी. ओ. चव्हाण दुपारी 4 वाजता तात्काळ घटनास्थळी शेतात दाखल झाले. वाघ दिसल्याची माहिती शेतातील रखवालदाराने दिली आणि चिखलात पदचिन्ह असल्याचेही त्याने वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप भड यांना सांगितले. रात्री 8 वाजेपर्यत परिसरात शोध मोहीम राबवण्यात आली. नेमके पगमार्क कोणत्या वन्यप्राण्यांचे आहे, याची ओळख पटवण्याकरिता पगमार्कचे फोटो अमरावतीच्या वरिष्ठ कार्यालयात देण्यात आली. वरिष्ठांच्या चमुने पदचिन्हाचे निरीक्षण केले असता ते वाघाचे नसून तडसाचे असल्याचे निष्पन्न झाले.
 
Powered By Sangraha 9.0