ज्ञानाच्या जोरावर भारत विश्वगुरू होईल : प्रफुल्ल केतकर

- प्रबोधन मंचच्या व्याख्यानात प्रतिपादन

    31-Jan-2023
Total Views |
पुणे, 
महाशक्ती आणि विश्वगुरू या दोन संकल्पनांमध्ये फरक असून, आपल्या ज्ञानाच्या जोरावर भारत विश्वगुरू होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि ऑर्गनायझर साप्ताहिकाचे संपादक प्रफुल्ल केतकर (Prafulla Ketkar) यांनी येथे केले. प्रबोधन मंच, पुणे या संस्थेच्या वतीने ‘भारत- या संकल्पनेपुढील सद्यकालीन आव्हाने’ या विषयावर आयोजित व्याख्यानात केतकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष हरिभाऊ मिरासदार तसेच कार्यवाह किशोर शशितल उपस्थित होते.
 
Prafulla Ketkar
 
प्रफुल्ल केतकर (Prafulla Ketkar) म्हणाले की, सोव्हिएत रशियाच्या पतनानंतर जगात फार मोठी उलथापालथ झाली आहे. आता डाटा हा नवीन तेल (किमती वस्तू) झाला आहे. याचे पडसाद भारतामध्येही जाणवायला लागले आहेत. यातूनच वेगवेगळ्या पद्धतीचे टूल किट व आंदोलन सुरू झाले. त्या माध्यमातून भारतीय समाजमनामध्ये संभ्रम निर्माण करणारे विमर्श तयार झाले आहेत. जागतिक परिस्थितीचा आढावा घेत ते म्हणाले, की सध्या युरोपियन सभ्यतेसमोर इस्लामी कट्टरवादाचे आव्हान आहे. शिवाय किती दिवस युरोप अमेरिकेचे शेपूट म्हणून राहणार, हा प्रश्नही त्यांना भेडसावत आहे. युरोपची स्थिती वाईट आहे. दुसरीकडे अमेरिका तांत्रिकदृष्ट्या प्रगत असली तरी, तिथे सांस्कृतिक आणि सामाजिक समस्या आहेत. युरोपमध्ये धार्मिक हिंसा सुरू असून, आतापर्यंत शांततापूर्ण असलेले स्वीडनही अशांत होऊ पाहात आहे.
 
 
भारतीय राष्ट्रीयत्वाचा विचार मांडताना ते म्हणाले (Prafulla Ketkar) की, वेगवेगळी राज्यव्यवस्था आणि उपासना असूनही एक पुण्यभूमी म्हणून भारत नांदू शकतो, हे सनातन परंपरेतून दिसते. त्यामुळेच इतके आक्रमण होऊनही आपल्या मूळ विचारांवर हा सनातन भारत जिवंत आहे. भारत ही उतरणीला लागलेली सभ्यता नसून, ती उगवती सभ्यता आहे. भारतात आध्यात्मिक लोकशाही आहे. हा देश विविधतेचा उत्सव साजरा करतो आणि जगामध्ये हे चित्र फक्त भारतातच दिसेल. भारताचे हेच वैशिष्ट्य अन्य राष्ट्रांसाठी समस्या ठरले आहे. भारतात विविधतेला विसंगती न मानता राष्ट्रीयत्वाची कल्पना असून, तीच भारताची कल्पना आहे.
 
 
महाशक्ती आणि विश्वगुरू यात असलेला फरक व्यक्त करताना ते म्हणाले, कोरोनाच्या काळात लसींचा आपण व्यापार न करता, विश्वबंधुत्वाच्या भावनेतून लसींचा पुरवठा केला. हाच हिंदू दृष्टिकोनातून केलेला विचार आहे. (Prafulla Ketkar) संयुक्त राष्ट्रसंघाने योग दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव पारित केला. जगातील संकटांवर उत्तर शोधण्याची शक्ती भारताकडे आहे.