नागपूर,
मराठी पत्रकारितेचे जनक ‘दर्पण’कार (Balshastri Jambhekar) आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा अर्धपुतळा येत्या मराठी पत्रकार दिनी, शुक्रवार, 6 जानेवारीला दुपारी 3 वाजता टिळक पत्रकार भवनात स्थापित केला जाणार आहे. टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ पत्रकार ल. त्र्यं. जोशी यांच्या हस्ते अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात येईल. या कार्यक्रमाला पत्रकारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि ट्रस्टचे सरचिटणीस शिरीष बोरकर, प्रेस क्लबचे सचिव ब्रह्माशंकर त्रिपाठी यांनी केले आहे.
वर्हाडमधील ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक देशोन्नतीच्या बुलढाणा आवृत्तीचे संपादक राजेश राजोरे यांनी ब्रॉन्झचा हा (Balshastri Jambhekar) अर्धपुतळा नागपूर श्रमिक पत्रकार संघाला भेट दिला आहे. तसेच वाशीम, संग्रामपूर आणि देऊळगावराजा येथील पत्रकार संघांनाही त्यांनी असाच अर्धपुतळा भेट दिला. बाळशास्त्रींच्या ‘दर्पण’ या पहिल्या मराठी वृत्तपत्राचा स्थापनादिन (6 जानेवारी 1832) मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. बाळशास्त्रींच्या नावाने सेवानिवृत्त पत्रकारांना दरमहा सन्माननिधी देण्याची योजनाही महाराष्ट्र सरकारने 2019 पासून सुरू केली आहे.
- सौजन्य : सपर्क मित्र देवराव प्रधान