जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण

04 Jan 2023 20:15:26
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर,
जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून सर्वत्र ढगाळ वातावरण (Cloudy weather) होते. तर, ब्रम्हपुरी, सिंदेवाही, चिमूर तालुक्यात सकाळच्या सुमारास, तर राजुरा येथे दुपारी अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. ढगाळ वातावरण व पावसामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला आहे. या वातावरणमुळे रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.
 
Cloudy weather
 
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अधूनमधून ढगाळ वातावरण (Cloudy weather) निर्माण होत होते. दरम्यान, बुधवारी सकाळी चंद्रपूरसह राजुरा, मूल, कोरपना, सावली, भद्रावती, ब्रम्हपुरी, सिंदेवाही, चिमूर, वरोडा आदी तालुक्यात ढग दाटून आले. वातावरणात कमालीचा गारठा जाणवू लागला. त्यामुळे रस्त्यावर नागरिक गरम कपडे घालून फिरताना दिसून आले. ब्रम्हपुरीत सकाळच्या सुमारास दोन-तीन वेळा विश्रांती घेत पाऊस झाला. तसेच सिंदेवाही, चिमूर तालुक्यात सकाळच्या सुमारास, तर राजुरा येथे दुपारच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सध्या शेतपिकांचा रब्बी हंगाम सुरू असून, शेतात हरबरा, तूर, लाखोळी, ज्वारी, गहू, भाजीपाला आदी पिके आहेत. ढगाळ वातावरणामुळे हरबरा, तूर, लाखोळी, भाजीपाला या पिकांवर अळ्या पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
Powered By Sangraha 9.0