तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
काँग्रेस पक्षासोबत चांगल्या, वाईट काळात निष्ठेने राहणार्या (Manikrao Thackeray) काँग्रेस नेते तथा माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंना तेलंगणा राज्याचे प्रभारी म्हणून पक्षाध्यक्ष खा. मल्लीकार्जुन खरगे यांनी जबाबदारी दिली आहे. त्यांनी ठाकरे यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केल्याने विदर्भासह राज्यातील ठाकरे समर्थकात आनंदाला उधाण आले आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार मल्लीकार्जुन खरगे यांनी ठाकरे (Manikrao Thackeray) यांची नुकतीच तेलंगणाचे पक्षप्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. साधारणत: या पदाची संधी अखिल भारतीय काँग्रेसमध्ये सरचिटणीस पदावर काम करणार्या नेत्यांनाच आजवर देण्यात आली आहे. मात्र खासदार सोनिया गांधी, खा. राहुल गांधी यांनीही ठाकरे यांच्या निष्ठापुर्वक कामाची पावती म्हणून त्यांना पक्षप्रभारी केले आहे. अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणूगोपाल यांनी ठाकरे यांची नियुक्ती प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केली.
तेलंगणा हे राज्य विकासाच्या दिशेने अग्रेसर आहे. विदर्भाला लागूनच हे राज्य असल्याने ठाकरे (Manikrao Thackeray) यांच्या या नियुक्तीचा पक्षालाही मोठा लाभ होणार आहे. महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणून ठाकरे यांनी मोठा कार्यकाळ गाजविला आहे. त्यांच्याकडे पक्षसंघटन बांधणीचे मोठे कौशल्य आहे. त्यामुळे आगामी काळात तेलंगणामध्ये निवडणुका असल्याने ठाकरे यांच्यावरही मोठे आव्हान राहणार आहे.