12 जानेवारीपासून ब्रम्हपुरी महोत्सव 2023

- विजय वडेट्टीवार यांची संकल्पना
- सिनेकलावंतांच्या बहारदार कार्यक्रमांची मेजवानी

    दिनांक :08-Jan-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा 
ब्रम्हपूर, 
यंदा नववर्ष 2023 च्या प्रारंभी माजी मंत्री आ. विजय वडेट्टीवार यांनी महोत्सवाच्या (Bramhapuri Festival) माध्यमातून सांस्कृतिक, क्रीड, प्रबोधन, व्यक्तिमत्व विकास, आरोग्य शिबिर, समाजसेवेची परंपरा कायम राखत ब्रम्हपुरी महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. प्रसिध्द कलावंत, सिनेस्टार, यशस्वी जीवनाची दिशा देणारे मार्गदर्शक, हास्य कलाकार यांच्या उपस्थितीत व स्थानिक कलावंतांना वाव मिळावा याकरिता विविध स्पर्धेच्या माध्यमातून 12 ते 15 जानेवारीदरम्यान ‘ब्रह्मपुरी महोत्सव-2023’ च्या रूपाने नागरिकांना बहारदार कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे.
  
Bramhapuri Festival
 
महोत्सवाचा (Bramhapuri Festival) प्रारंभ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या प्रेरणेतून 12 जानेवारीला सकाळी 8 वाजता नगर स्वच्छतेतून होणार असून, या दरम्यान सकाळी 10 वाजता महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविण्याकरिता उत्कृष्ट रांगोळी स्पर्धा, दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत देखावे प्रदर्शन व प्रभात फेरी काढण्यात येईल. यात सिने अभिनेत्री आदिती गोवित्रीकर, प्राजक्ता माळी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तर सायंकाळी 5.30 वाजता सुरू होणार्‍या कृषी प्रदर्शनी व महोत्सव उद्घाटन सोहळ्यास उद्घाटक म्हणून राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, अध्यक्ष म्हणून आ. विजय वडेट्टीवार, आ. सुभाष धोटे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, विचारवंत राजू परुळेकर, संपादक श्रीपाद अपराजित, ज्येष्ठ सिने अभिनेते असराणी, प्रसिध्द सिनेस्टार ‘दबंग’ चित्रपट फेम सोनू सूद यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तसेच रात्री 7 वाजता संपूर्ण महाराष्ट्रात विनोदी हास्य कल्लोळाने सर्वदूर परिचित असलेल्या महाराष्ट्राची हास्य जत्रा या विनोदविरांच्या चमूचा कार्यक्रम सादर होणार आहे.
 
 
तर 13 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता विविध वयोगटातील खेळाडूंसाठी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन, तर दुपारी 2 वाजता प्रसिध्द मराठी सिने अभिनेते आदेश बांदेकर यांचा गृहमंत्री (होम मिनिस्टर) हा लक्षवेधक स्पर्धा कार्यक्रम किरण विजय वडेट्टीवार व ब्रह्मपुरी (Bramhapuri Festival) नगरपरिषद पदाधिकार्‍यांच्या विशेष उपस्थितीत होणार आहे. यानंतर सायंकाळी 6 वाजता महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस, विजय क्रांती कामगार संघटनेच्या अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत सौंदर्य स्पर्धा मिस व मिसेस ब्रम्हपुरी पार पडणार आहे. तसेच इंडियन आयडल विजेते सलमान अली व लिटिल चॅम्प्स विजेते मनी यांच्या गायनाचा सदाबहार कार्यक्रम होणार आहे. महोत्सवाचा उत्तरार्ध 14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या शुभ पर्वावर सकाळी 9 वाजता पतंग स्पर्धा, दुपारी 2 वाजता प्रा. नितेश कराळे यांची विशेष मार्गदर्शन होणार आहे. तर रात्री 7 वाजता स्थानिक कलावंतातील सुप्त गुणांचे दर्शन घडविणार्‍या नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
15 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता ज्येष्ठ नागरिक व नामवंतांचा सत्कार, दुपारी 3 वाजता कुकिंग कॉम्पिटिशन स्वरूप आनंद मेळावा, रात्री 7 वाजता प्रख्यात गायक आदर्श शिंदे यांच्या गीतांचा बहारदार कार्यक्रम होईल. तर रात्री 10 वाजता डीजे नाईट अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी ब्रह्मपुरीकर व परिसरातील नागरिकांना मिळणार असून, या कार्यक्रमाचा आस्वाद अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन ब्रह्मपुरी महोत्सव (Bramhapuri Festival) समितीच्या वतीने करण्यात आले आहे.