ई-चावडी प्रणालीतून नागरिकांना मिळणार घरबसल्या सुविधा

08 Jan 2023 20:44:34
अकोला, 
ई-चावडी प्रणालीमुळे (E-Chavadi system) महसूल विभागाचे कामकाज अधिक पारदर्शक व गतिमान होण्यास मदत होणार असून, यामुळे महसूल संबंधित विविध सुविधेचा लाभ नागरिकांना घरबसल्या उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी ई-चावडी प्रणाली शिबिराच्या शुभारंभप्रसंगी केले.
 
 E-Chavadi system
 
येथील तहसील कार्यालयात ई-चावडी प्रणाली (E-Chavadi system) शिबिराचा उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी नीमा अरोरा, उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, तहसीलदार सुनील पाटील, मंडळ अधिकारी, तलाठी आदी उपस्थित होते. विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे पुढे म्हणाले की, महसूल संबंधित विविध कामकाजाकरिता नागरिकांना कार्यालयाची पायपीट करावी लागते. ई-चावडी प्रणालीच्या माध्यमातून सातबारा व त्याबाबत त्रुटी, कृषक-अकृषक कर, अनधिकृत विषयक दंड भरणे अशा विविध सुविधा नागरिकांना घरबसल्या पाहता व ऑनलाइन दंड वा शुल्क भरणा करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. या सुविधा पारदर्शक व गतिमानतेने नागरिकांपर्यंत पोहोचवा, अशी सूचना यावेळी त्यांनी केली.
 
 
ई-चावडी प्रकल्पातंर्गत (E-Chavadi system) जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला 25 गावे ई-चावडी प्रणाली कार्यन्वित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. अकोला तालुक्यात 203 गावांचा समावेश असून, संपूर्ण तालुका ई-चावडी प्रणाली कार्यन्वित करण्याचे निश्चित केले आहे. त्याअनुषंगाने 8 ते 18 जानेवारी दरम्यान तालुक्यातील 178 गावांत विशेष शिबिरांद्वारे ई-चावडी प्रणाली कार्यन्वित करण्यात येणार आहे. तसेच 25 गावांमध्ये यापूर्वीच ई-चावडी प्रणाली कार्यन्वित करण्यात आली आहे. या शिबिरामध्ये 178 गावांचे महसुली अभिलेख, जुन्या नोंदी, जमिनीचे अभिलेख, सातबारा, सर्वप्रकारचे नकाशांचे आधुनिकीकरण, आठ-अ आणि फेरफार इ. ई-चावडी प्रणालीव्दारे संगणकिकृत करण्यात येणार आहे. याकरिता 12 समन्वयकांची नेमणूक करण्यात आली असून, त्यांच्या निरीक्षणात 18 जानेवारीपर्यंत ई-चावडी प्रणाली पूर्ण करून नागरिकांकरिता उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार सुनील पाटील यांनी दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन लिखाडे यांनी केले.
 
Powered By Sangraha 9.0