रवींद्र शिंदे यांच्या नियुक्तीमुळे सेनेत वादळ!

- पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रमुखाकडे सोपविले राजीनामे

    दिनांक :09-Jan-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा 
वरोडा, 
शिवसेनेतर्फे (Shivsena) वरोडा विधानसभा प्रमुखपदी रवींद्र शिंदे यांची व त्यांच्या सोबत झालेल्या इतर नियुक्त्या या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अंधारात ठेवून करण्यात आल्या. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेनेत जुने विरुध्द नवे असा वाद पेटला असून, या वादंगाचे पर्यवसान वरोडा तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात राजीनामे देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, आपण या सर्वांची समजूत घातली असून, तालुक्यातील वस्तुस्थिती पक्ष प्रमुखांच्या कानावर घालणार असल्याचे माहिती शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत कदम यांनी पत्रकारांशी बोलताना सोमवार, 9 जानेवारी रोजी दिली.
 
Shivsena
 
येथील शिवसेना (Shivsena) नेते व कार्यकर्ते यांच्यावर ओढवलेल्या परिस्थितीला पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे हे निश्चितपणे न्याय देतील आणि कार्यकर्ते पुन्हा कामाला लागतील, अशी आशाही कदम यांनी व्यक्त ेकेली. शिवसेनेच्या विधानसभा प्रमुखपदी रवींद्र शिंदे यांचे नियुक्ती करण्यात आल्याने जिल्ह्यात गटबाजीचे वातावरण तयार झाल्याची स्थिती आहे. त्यामुळे जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे समर्थक शिवसैनिकांनी सोमवार, 9 रोजी वरोडा येथे मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला प्रशांत कदम उपस्थित होते. या मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
 
 
वरोडा-भद्रावती विधानसभा सभेची परिस्थिती पाहता आगामी विधानसभा निवडणूक शिवसेनाच (Shivsena) लढवेल आणि आम्ही विजयी होऊ याबद्दल खात्री असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. या मेळाव्यात वरोडा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात रवींद्र शिंदे यांची नियुक्ती झाल्यामुळे नाराज शिवसेनिकांनी संपर्कप्रमुखापुढे आपली व्यथा मांडली. प्रशांत कदम यांनी शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करीत येत्या सात-आठ दिवसात नाराज झालेल्या शिवसैनिकांना न्याय मिळवून देण्याची हमी दिली. रवींद्र शिंदे यांची व इतर नियुक्त जणांची नियुक्ती करताना संपर्क प्रमुखांना विश्वासात न घेतल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली व या मेळाव्यात उपस्थित शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांना राजीनामे परत घेण्याची विनंती कदम यांनी केली.
 
 
ही नियुक्ती कायम राहिली, तर आगामी विधानसभा निवडणुकीत या क्षेत्रात रवींद्र शिंदे गट व मुकेश जीवतोडे गट यांच्यात शिवसैनिकांची विभागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मेळाव्याला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे, उप जिल्हाप्रमुख अमित निब्रड, तालुका प्रमुख विपिन काकडे, युवा सेना जिल्हाप्रमुख मनीष जेठाणी, विधानसभा संघटक सुधाकर मिलमिले, शिवसेना शहर प्रमुख संदीप मेश्राम, भद्रावती तालुकाप्रमुख नंदू पडाल यांच्यासह पदाधिकारी व वरोडा भद्रावती तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
 
 
वैयक्तिक विरोध केला जात आहे : रवींद्र शिंदे
माझे काम बघता शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझी विधान सभा प्रमुखपदाची जबाबदारी दिली. यापूर्वी माझी जिल्हा प्रमुख पदासाठी नियुक्ती होणार होती. परंतु, जिल्ह्याच्या संपर्क प्रमुखांनी माझ्या नावाला विरोध केला होता. पक्षप्रमुखांनी मला जेव्हा जेव्हा विविधपदाची जबाबदारी घेण्यासंबंधी सांगितले. त्या त्यावेळी आपण शिवसैनिक म्हणूनच काम करू असे सांगितले होते. पण मला वैयक्तिक विरोध केला जात आहे. हा पक्षांतर्गत वाद असल्याने पक्षाचे नेते व पदाधिकारी तो निपटवतील. शिवसेनेचा एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून आपण या प्रकरणी पक्षप्रमुख जो आदेश देतील तो मान्य करू व शिवसैनिक म्हणून काम करत राहू, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नवनियुक्त विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांनी तभाला दिली.