तभा वृत्तसेवा
मारेगाव,
Gadegaon road मार्डी-गाडेगाव रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले असून हा रस्ता वाहतुकीस अयोग्य असून मानव विकास मिशनची शाळकरी विद्यार्थ्यांसाठी असलेली बससुद्धा बंद झालेली आहे. त्यामुळे या रस्त्याकडे संबंधीत विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. मार्डी ते गाडेगाव हा अंदाजे 5 ते 6 किमीचा रस्ता. यात मजरा-गाडेगाव हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनलेला आहे.
या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. एका ठिकाणी तर पाईपलाच मोठे छिद्र पडले आहे. सध्या पावसाळा सुरु असून अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचलेले आहे. या खड्यामध्येही पाणी साचत आहे. खड्यामध्ये साचलेले पाणी अनेकदा लक्षात येत नसल्याने काही जण या खड्यामध्ये पडल्याचीही उदाहरणे आहे. Gadegaon road तसेच जागोजागी खड्डे पडले असून यात पाणी साचून तळ्यासारखे स्वरूप आल्याचा भास होतो. महाराष्ट्र शासनातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी मानव विकास मिशनतर्फे बस आहे. परंतु रस्त्यावर खड्डे असल्याने या बसेस आता बंद आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या समस्येकडे शासनाचे दुर्लक्ष असून यात सामान्य नागरिकांसोबतच शाळकरी विद्यार्थी मात्र होळपळले जात आहे.