प्रशासकीय कामकाजात अवाजवी हस्तक्षेप, कर्मचा-यांची आयुक्तांकडे लेखी तक्रार
दिनांक :14-Oct-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
भंडारा,
written complaint शहरालागतच्या ग्रामपंचायत खोकरला येथील महिला सरपंच नामधारी झाले असून त्यांचे पतीच कारभारी झाल्याने कर्मचारी त्रस्त झाले आहेत. पत्नी सरपंच असल्याचा गैरफायदा घेत पतीदेवच ग्रामपंचायत कार्यालयात हुकूमशाही गाजवत असल्याने कर्मचाऱ्यांनी याविषयीची तक्रार विभागीय आयुक्तांकडे केली असून नामधारी महिला सरपंचावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमन चे कलम 39 (1) अंतर्गत कारवाई करून पदमुक्त करण्यात यावे, अशी मागणी कर्मचा-यांकडून करण्यात आली आहे.
मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत ग्रामपंचायत खोकरला येथील सरपंच पद महिला राखीव होते. त्यामुळे वैशाली रोहीत सार्वे यांच्या गळ्यात सरपंच पदाची माळ पडली. मात्र त्या केवळ नामधारी सरपंच ठरल्या असून पदभार स्विकारल्यापासून त्यांचे पती रोहीत सार्वे यांचाच ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या दिसतो. येथील प्रत्येक प्रशासकीय कामकाजात ढवळाढवळ करणे, कुणीही नागरिक कामानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात गेले असता त्यांच्याशी अरेरावीच्या भाषेत बोलणे व कर्मचाèयांना नाहक मनःस्ताप देण्याचे प्रकार सरपंचांच्या पतीकडून करण्यात येत आहेत.written complaint कुठलेही अधिकार नसताना केवळ पत्नी सरपंच असल्याचा गैरफायदा घेत ग्रामपंचायत कार्यालयात गैरकायदेशीरपणे त्यांचा हस्तक्षेप सुरू असल्याने सर्वसामान्य नागरिकांसह येथील कर्मचारी सुध्दा त्रस्त आहेत.ग्रामपंचायत कार्यालयात मागील 15 वर्षापासून काम करीत असलेले सफाई कर्मचा-यांना देखील कोणत्याही कामापुर्वी आता सरपंचांच्या पतीची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. या पती महोदयांनी त्यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही सदस्यांनी किंवा उपसरपंचांनी सुध्दा सांगितलेले काम करायचे नाही असे फर्मान दिले. कुणाचेही काम करायचे असल्यास ते आपल्याच मर्जीने होईल अन्यथा वेतन मिळणार नाही व सफाईसाठी निविदा काढून कामावरून काढण्याची धमकी कर्मचा-यांना देण्यापर्यंत मजल मारली आहे. याशिवाय पुर्वी 5 तारखेपर्यंत मिळणारे वेतन आता दहा ते पंधरा दिवस उशिराने देण्याचा प्रकार नामधारी सरपंचाच्या पतीने केला आहे.परिणामी ग्रामपंचायत कर्मचारी प्रचंड मानसिक त्रासात असून त्यांनी याविषयीची लेखी तक्रार विभागीय आयुक्तांकडे केली. या तक्रारीची दखल घेत आयुक्त कार्यालयातून स्पष्टीकरण सादर करण्याबाबतचे पत्र ग्रामपंचायत कार्यालयास 13 ऑक्टोबर रोजी आल्याचे समजते. याविषयी ग्रामविकास अधिकारी नूतन बिसेन यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. आता सरपंचांवर काय कारवाई होणार? याकडे ग्रामवासीयांचे लक्ष लागले आहे.