- संजय गारपवार
मोर्शी,
Mahimapur well : दर्यापूर तालुक्यातील महिमापूर येथील ऐतिहासिक पायर्यांची विहीर आता डाक विभागाच्या पोस्ट कार्डवर झळकणार आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील दर्यापूर ते आसेगाव रोडवरील महिमापूर या गावात हजारो वर्षापूर्वी ऐतिहासिक विहीर बांधण्यात आली आहे. पुरातन काळातील स्थापत्य कलेचा उत्कृष्ट असा नमुना ही विहीर पाहिल्यावर पर्यटकांच्या नजरेस पडतो. नुकताच राष्ट्रीय पोस्ट दिनानिमित्त महाराष्ट्रातील आठ ‘हेरिटेज स्टेपवेल पोस्ट कार्ड’ व माहिती पुस्तकाचा लोकार्पण सोहळा पोस्ट मास्टर जनरल के. के. शर्मा व महाराष्ट्र सर्कल पोस्टमास्टर जनरल अभिताभ सिंग यांच्या हस्ते झाला होता.
स्टेपवेल म्हणजेच (Mahimapur well) पायर्यांची विहीर. सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य यादव, शिवकालीन व नंतर विविध कालखंडातील राज्यकर्त्यांनी व सत्ताधार्यांनी पायर्याच्या विहिरी प्रामुख्याने बांधलेल्या आहेत. त्यात अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील महिमापूर येथील पुरातन विहिरीचा समावेश आहे. लोकार्पण झालेल्या पोस्ट कार्डावर या विहिरीचा फोटो देण्यात आला आहे. यामुळे या विहिरीची माहिती जिल्ह्यातील व इतर राज्यातील नागरिकांपर्यंत सहज पोहोचणार आहे.
आठ ऐतिहासिक विहिरी
विदर्भातील (Mahimapur well) अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील महिमापूरच्या या विहिरीसह नाशिक जिल्ह्यातील गिरणारे येथील प्राचीन विहीर, पुणे जिल्ह्यातील मंचर येथील ऐतिहासिक प्राचीन विहीर, परभणी जिल्ह्यातील आर्वी, चारठाना, वालूर व पिंगळी , सातारा जिल्हा बाजीराव येथील विहिरीचे फोटो प्रामुख्याने डाक विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या पोस्ट कार्डवर झळकणार आहे.