आनंद नाकाडे गाजवितो झाडीपट्टी रंगभूमी

19 Oct 2023 18:27:58
अर्जुनी मोरगाव, 
Anand Nakade भंडारा ,गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर हे पूर्व विदर्भातील चार जिल्हे झाडीपट्टी रंगभूमीसाठी सर्वदूर परिचित आहेत. यामध्ये वडसा देसाईगंज व सिंदेवाही ही शहरे रंगभूमीची सेवा करण्याचे केंद्र बनले आहे. या रंगभूमीला एकूणच दीडशे वर्षाची परंपरा लाभली आहे. या चार जिल्ह्याच्या मातीत अनेक कलावंतांनी जन्म घेऊन या रंगभूमीवर नानाविध प्रयोग करून आपल्या अभिनयाची छाप पडली आहे. याच रंगभूमीवर गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगावदेवीचा 42 वर्षीय आनंद नाकाडे आपल्या अभिनय कौशल्याने विविध नाटकात वेगवेगळ्या भूमिका साकारतो आहे. आजपर्यंत दीड हजाराचे वर नाटकात विविध प्रकारच्या भूमिका सादर करणारा हा नटवर्य खलनायकाच्या भूमिकेसाठी झाडीपट्टी रंगभूमीवर आपला ठसा उमटवत आहे.
 
 
Anand Nakade
 
आनंद नाकाडे यांना शालेय जीवनापासूनच अभिनयाची आवड आहे. शाळांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात वयाच्या बाराव्या वर्षापासूनच काम करण्यास सुरुवात झाली. अष्टपैलू नाट्य कलावंत असलेला आनंद नाकाडे यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात पहिल्यांदा वयाच्या चौदाव्या वर्षापासून गणेश हिर्लेकर लिखित संगीत ‘जिव्हाळा’ या नाटकापासून केली. Anand Nakade बोंडगावदेवीच्या गाव कलाकारांसोबत ‘पेटलं सारं गाव’, ‘विझव बाबुराव’ या नाटकातील बाबुरावच्या भूमिकेमुळे त्यांची खरा नाट्य कलावंत म्हणून ओळख पटली. त्यांचे अष्टपैलू नाट्यकलावंत म्हणून आपल्या अभिनय कौशल्याने झाडीपट्टी रंगभूमी देसाईगंज वडसा येथे प्रवेश मिळविला. पहिल्यांदा जय दुर्गा नाट्य रंगभूमी देसाईगंज वडसामध्ये खलनायकाच्या अभिनयासाठी संधी मिळाली. दमदार आवाज व अभिनय कौशल्याचे बळावर त्यांनी झाडीपट्टी रंगभूमीमध्ये आपला जम बसविला. त्यांनी पहिल्यांदाच जय दुर्गा नाट्य रंगभूमीच्या मंचावरून दोन वर्षात 150 ते 200 नाट्यप्रयोग केले. त्यानंतर प्रल्हाद नाट्य रंगभूमी देसाईगंज वडसा व गणराज कलारंगभूमी सिंदेवाही वडसा इथेही तीन वर्षात 200 ते 250 चे वर नाटकात विविध भूमिका साकारल्या. जवळपास 600 च्या वर नाट्यप्रयोगातून चरित्र नट व खलनायकाच्या भूमिका साकारत आहे.
 
धनंजय स्मृती नाट्य रंगभूमीमध्ये ‘फाटका पदर मायेचा’ या नाटकाचे 250 चे वर प्रयोग झाले असून यामध्ये अशोक भंडारी ही भूमिका आतापर्यंत अविस्मरणीय ठरली असल्याचे आनंद नाकाडे यांनी सांगितले. सध्या झाडीपट्टीमध्ये धनंजय स्मृती रंगभूमीमध्ये ‘साता जन्माच्या गाठी’ या नाटकात कलेक्टरची भूमिका प्रचंड गाजत असल्याचेही आनंद नाकाडे यांनी सांगितले. झाडीपट्टी रंगभूमीच्या मंचावर सामाजिक नाटकात काम करीत असताना ऐतिहासिक व पौराणिक नाटकातही काम करण्याची संधी मिळाली. त्यात सर्वाधिक व्यंकोजी वाघ या नाटकात भूमिका साकारल्या. धनंजय स्मृती नाट्य मंडळात काम करीत असताना मराठी चित्रपट अभिनेते रमेश भाटकर, मोहन जोशी, कुलदीप पवार या महान अभिनेत्यांसोबत झाडीपट्टीच्या नाटकात काम करण्याची संधी मिळाल्याने त्यांचे मार्गदर्शन आपल्या अभिनयासाठी मोलाचे ठरले असल्याचे आनंद नाकाडे यांनी सांगितले. असा हा अष्टपैलू कलावंत आनंद नाकाडे आपल्या अभिनय कौशल्याने झाडीपट्टी रंगभूमीवर बोंडगावदेवी गावचे नाव गाजवतो आहे.
 
Powered By Sangraha 9.0