उमरखेडचे जाज्वल्य शक्तीपीठ ‘जगदंबा माता’

19 Oct 2023 08:08:08
शारदीय नवरात्री
 
 
Jagdamba Mata : उमरखेड शहरालगत असलेल्या एका भव्य टेकडीवर जगदंबा मातेचे मंदिर असून या मंदिरात नवरात्र महोत्सवात भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी असते. परिसरात हे मंदिर जाज्वल्य शक्तीपीठ म्हणून ओळखल्या जाते. आठव्या शतकातील सुप्रसिद्ध संस्कृत नाटककार भवभूती यांनी आपल्या एका नाटकाच्या प्रस्तावनेत जन्मस्थानाच्या खुणा सांगताना उंच टेकडीवर वसलेल्या पूर्वाभिमुख असलेल्या जगदंबा मातेच्या (तांदळा) चौथारा मंदिराचा उल्लेख सापडतो. येथे भवभूतीच्या अगोदरपासूनच जगदंबेचा तांदळा स्थापन करून पूजेची सुरवात होते.
 
Jagdamba Mata
 
‘तांदळा’ म्हणजे माहूर दर्शनास गेल्यावर ‘मोवाळे’ तलावात डुबकी मारून, तळाचा अश्मा वर आणून त्यास शेंदूर विलेपन, डोळे, टोप इत्यादी बाबी अर्चन करून जगदंबेची (Jagdamba Mata) स्थापना करणे या मूर्तीस्वरूपी दगडास तांदळा म्हणतात. मुंबई-मुंबादेवी, अमरावती-अंबादेवी, आंधप्रदेश-यल्लम्मा, तलवाडा-कामाक्षी, मुळावा-रेणुका, उमरखेड-जगदंबा अशी अनेक देवींची तांदळा स्वरूप मंदिरे आहेत. पुरातन व ऐतिहासिक महत्व असलेल्या मंदिरांचे जीर्णोद्धाराचे कार्य येथील चिन्मयमूर्ती मठाचे चवथे मठाधिपती शिवरामानंद महाराज यांनी पूर्ण करून शके 1821 म्हणजे 1799 मध्ये या मंदिरात जगदंबा देवीची पुनर्स्थापना केली.
 
 
त्या काळी हा परिसर जंगलमय असल्याने लोक क्वचितच दर्शनास जात. त्यानंतर चिन्मयमूर्ती संस्थानने या जगदंबा मंदिराची देखरेख व पूजा सांभ भानेगावकर परिवाराला सोपविली. 1942 मध्ये रामेश्वर परदेशी सुतार या देवीभक्ताने देवीचे मंदिर बांधले. तर देवीच्या मंदिरावर जाणार्‍या सव्वाशे पायर्‍यांचे काम लक्कडदास महाराज या सत्पुरुषाने केले. 1975 पासून जीर्णोद्धार समिती या मंदिराच्या पायर्‍या, रस्ता, पाणी यासह देवीभक्तांंच्या दर्शनाची सर्व व्यवस्था उत्कृष्टपणे सांभाळत असून त्यांना देवीभक्तही सढळ हाताने मदत करतात. या औदुंबर नगरीच्या (Jagdamba Mata) जगदंबा देवी मंदिराला महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागाने क दर्जा पर्यटनस्थळ म्हणून जाहीर केले असून 1 कोटी रुपये विकास निधी उपलब्ध करून दिला आहे.
 
विजय आडे 
Powered By Sangraha 9.0