नवी दिल्ली,
Prime Minister Modi : अयोध्येत भव्य श्रीराम मंदिरात होणार्या रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होणे माझे सौभाग्य आहे, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठीच्या निमंत्रणाचा सविनय स्वीकार केला आहे. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत हा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. याचे यजमानपद पंतप्रधान मोदींना भूषवायचे आहे, अशा अर्थाचे निमंत्रण मंदिर समितीकडून बुधवारी देण्यात आले.
रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या सदस्यांनी पंतप्रधान मोदी यांची राजधानीतील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधानांना औपचारिक निमंत्रण दिले, जे (Prime Minister Modi) पंतप्रधानांनी स्वीकारले आहे. याविषयी आपल्या ‘एक्स’ अकाऊंटद्वार पंतप्रधान मोदी यांनी ही माहिती दिली. आजचा दिवस माझ्यासाठी अतिशय भावपूर्ण असा आहे. श्रीरामजन्मभूमी ट्रस्टचे पदाधिकारी माझ्या निवासस्थानी मला भेटण्यासाठी आले आणि त्यांनी मला अयोध्येला येण्यासाठी निमंत्रण दिले. अशा ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होणे हे मी माझे भाग्य समजतो, अशा भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या. 15 ते 24 जानेवारी दरम्यान अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे मोठे अनुष्ठान आयोजित करण्यात आले आहे. यापूर्वी श्रीराम मंदिराच्या शीलान्यास सोहळ्यातही पंतप्रधान मोदी यजमानपदी होते.