भोपाळ,
Congress Election : मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा झाल्यानंतर काही मतदारसंघांत मोठी नाराजी दिसून येत आहे. परिणामी, बंडखोरी होऊ नये म्हणून काँग्रेसने आतापर्यंत सात जागांवरील उमेदवारीत बदल केला आहे. दिल्लीतून काँग्रेस नेतृत्वाने पहिली यादी जाहीर केल्यापासूनच इच्छुक उमेदवारांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या समर्थकांनीही राज्यातील वरिष्ठ नेत्यांच्या घरासमोर निदर्शने केली.
याशिवाय काही ठिकाणी (Congress Election) उमेदवार बदलण्याची मागणी समोर आली. यानंतर आतापर्यंत सात मतदारसंघांत उमेदवार बदलण्यात आले आहेत. यात सुमावली, पिपरिया, बडगनगर आणि जावरा मतदारसंघातील विद्यमान उमेदवारांची तिकिटे कापण्यात आली. सुमावलीत कुलदीप सिकरवारांच्या जागी आता अजबसिंह कुशवाह यांना उमेदवारी मिळाली आहे. विशेष म्हणजे, 2020 मध्ये कमलनाथ सरकार कोसळल्यानंतरच्या पोटनिवडणुकीत कुशवाह विजयी झाले होते.
पिपरिया येथून गुरुचरण खरे यांच्याऐवजी वीरेंद्र बेलवंशी, बडनगर येथून राजेंद्रसिंह सोलंकीऐवजी मुरली मोरवल आणि रतलाम जिल्ह्यातील जावरा येथून हिंमत श्रीमाल यांच्याऐवजी वीरेंद्रसिंह सोलंकी यांना संधी मिळाली आहे. (Congress Election) यापूर्वी 19 ऑक्टोबर रोजी तीन उमेदवारांची नावे मागे घेत नर्मदा प्रसाद प्रजापती यांना नरसिंहपूर जिल्ह्यातील गोटेगाव (राखीव) येथून, दतिया येथून राजेंद्र भारती, पिछोर येथून अरविंदसिंह लोधी यांना अचानक संधी देण्यात आली. विशेष म्हणजे, काँग्रेसने भाजपातून पक्षांतर केलेल्या विशेष स्थान दिले आहे.