कोल्हापूर,
Honey Village Patgaon : केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने घेतलेल्या ‘सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम’स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील ‘पाटगाव’हे कांस्य श्रेणीतील प्रमाणपत्र विजेते महाराष्ट्रातील एकमेव गाव ठरले आहे. नाबार्ड, जिल्हा नियोजन समिती व महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने पाटगाव मध उत्पादक शेतकरी कंपनी स्थापन करुन इथल्या मध उद्योगाला चालना देण्यात येत आहे. पाटगाव परिसरात तयार होणारा मध शुद्ध आणि नैसर्गिक असून इथला मध नक्की चाखायला हवा...!
सह्याद्री डोंगररांगांच्या पायथ्याशी वसलेलं कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाटगाव हे निसर्गरम्य ऐतिहासिक गाव. कोल्हापूर शहरापासून साधारण ९० किलोमीटर अंतरावर असलेले १ हजार ५०२ लोकसंख्या असलेले ३७५ कुटुंब संख्येचे हे गाव. पाटगावचे क्षेत्रफळ १ हजार ५८.७३ हेक्टर आहे. पूर्वीपासूनच मध हा त्याच्या शुद्धतेसाठी आणि आरोग्यदायी गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे. पाटगाव अंतर्गत शिवडाव, अंतुर्ली, मठगाव, भारमलवाडी, डेळे, चांदमवाडी, मानी, तळी, भटवाडी या परिसरात मधमाशा पालन उद्योग केला जातो. पाटगाव परिसरात वर्षभरात साधारण ८ ते १० टन मध उत्पादन होते. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या संकल्पनेतून आता (Honey Village Patgaon) ‘मधाचे गाव पाटगाव' ही नाविन्यपूर्ण संकल्पना याठिकाणी राबविण्यात येत आहे.
पर्यावरणपूरक शाश्वत विकास- पाटगावमध्ये पाटगावसह पाच ग्रामपंचायती एकत्र येवून याठिकाणी तयार होणाऱ्या शुद्ध व नैसर्गिक मधाची निर्मिती करण्यात येत आहे. सामुहिक सुविधा केंद्र व कृषी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून या भागाचा विकास साधण्यात येत असून मधाच्या थीमवर गावाचे सुशोभीकरण होत आहे. याठिकाणी माहिती केंद्र, बी-ब्रीडिंग प्रशिक्षण, मधमाशा पुरक व औषधी गुणधर्म असलेली वृक्षलागवड करण्यात येत आहे. (Honey Village Patgaon) बी- ब्रीडींगमधून मधमाशांची संख्या वाढवून परागीभवनाची वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पर्यावरणपूरक शाश्वत विकासाला प्राधान्य देत दिवसेंदिवस कमी होणारी मधमाशांची संख्या वाढवण्यासाठी पाटगाव मधाचे गाव ब्रँड तयार करुन मधाला योग्य बाजारभाव मिळवून देवून मध उत्पादकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न होत आहेत.
आजूबाजूची गावे होणार स्वयंपूर्ण- पाटगाव परिसरात मधमाशा पालनासाठी नैसर्गिक परिस्थिती अनुकुल आहे. (Honey Village Patgaon) मधाच्या गावाला भेट देणाऱ्या पर्यटक, शालेय विद्यार्थी सहलींना मार्गदर्शनाकरीता भुदरगड तालुक्यात प्रवेशापासून ते मधाच्या गावात पोहोचेपर्यंत व गावाच्या वेशीवर दिशादर्शक फलक तसेच गावात मधाच्या गावाचा आकर्षक लोगो तर मधपाळांच्या घरावरही नोंदणीकृत लोगो, फलक लावण्यात आले आहेत. अधिकाधिक मध उत्पादकांना प्रशिक्षण देणे, मधपाळांना मधपेट्या देण्यासह आवश्यक कर्ज पुरवठा होण्यासाठी प्रयत्न होत आहेत. पाटगावसह शिवडाव, अंतुर्ली, मठगाव, तांब्याची वाडी या ग्रामपंचायती अंतर्गत गावांमध्ये मधपाळ तयार करुन येथील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. ‘पाटगाव मध उत्पादक शेतकरी कंपनी’च्या माध्यमातून मध उत्पादक, विक्रेत्यांसह महिलांनाही रोजगार उपलब्ध करुन देत मध निर्मिती व विक्री उद्योग व पर्यटनपूरक उद्योगांतून पाटगावबरोबरच आजूबाजूच्या गावांना स्वयंपूर्ण होण्यासाठी चालना देण्यात येत आहे.
मधाचे संकलन, प्रक्रीया, ब्रॅन्डीग, पॅकेजिंग व मार्केटिंग- पाटगाव परिसरातील 250 मधपाळांना कौशल्यांचे राष्ट्रीय प्रमाणीकरण व सुलभ पतपुरवठा होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच 100 मधपाळांना बी-ब्रीडिंगचे प्रशिक्षण देवून पेटी वाटपातून उत्पन्नाची संधी देण्यात येणार आहे. मध उत्पादक शेतकरी कंपनीमध्ये सहभागी पाटगाव व आजूबाजूच्या पाच ग्रामपंचायतीतील मधपाळांकडून मध उत्पादन करण्यात येत आहे. या मधपाळांना मंडळामार्फत प्रशिक्षण देऊन सेंद्रिय मध संकलन करण्यासाठी स्टेनलेस स्टील भांडी पुरविण्यात येणार आहेत. (Honey Village Patgaon) मध संकलनानंतर पाटगाव येथे प्रक्रीया युनिट उभारुन प्रक्रिया झालेल्या मधाचे लेबलिंग, पॅकेजिंग व ब्रँडींग करुन तो मार्केटींगसाठी उपलब्ध होईल.
भविष्यातील नियोजन -
गावातील नोंदणीकृत मधपाळांकडून मध संकलन करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गावाला भेट देणाऱ्या पर्यटकांना मधाची अद्ययावत माहिती उपलब्ध करुन देणे, स्थानिक पातळीवर मधपाळांना मधाची शुध्दता व गुणवत्ता तपासणीसाठी पर्यटकांना लाईव्ह डेमो उपलब्ध करुन देणे. मध तपासणीसाठी प्रयोगशाळा, प्रोसेसिंग व पॅकेजिंग सुविधा, ब्रॅन्डींग करुन स्थानिक पातळीवर सीएफसी केंद्रा मार्फत विक्री केंद्र उभारणे, (Honey Village Patgaon) मधाचे गाव जागतिक नकाशावर येण्यासाठी चांगले रस्ते, दिशा दर्शक फलक लावणे व नकाशा रेखांकन करुन घेणे. मध आणि मधाचे उपयोग व उत्पादने याबाबत साहित्य पुस्तके, सीडी विक्रीसाठी उपलब्ध करुन देणे, मध व मधाची उप उत्पादने तयार करण्यासाठी फॅकल्टीची निवड करून मधपाळांना मधाची उत्पादने तयार करण्याचे प्रशिक्षण देणे व तयार झालेला माल सीएफसी केंद्र, खादी व ग्रामोद्योग मंडळा मार्फत विक्री करणे. गाव पातळीवर तयार झालेल्या मालाचे पॅकेजिंग, बॅन्डींगसाठी मार्गदर्शन करणे. मध संकलन व विक्रीसाठी ने आण करण्यासाठी वाहन व्यवस्था करणे आदी सुविधाही उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने नियोजन करण्यात येत आहे.
पाटगावमध्ये उत्तम दर्जाच्या मधाचे उत्पादन, प्रक्रिया आणि मार्केटिंग बरोबरच सामूहिक सुविधा केंद्राच्या माध्यमातून मध प्रक्रिया केंद्र, प्रयोगशाळा, प्रशिक्षण व माहिती दालन करण्यात आले आहे. प्रशासन आणि खादी व ग्रामोद्योग विभागाच्या वतीने पाटगावमधील मधपाळांना मध उत्पादन व विक्रीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येत आहे. या (Honey Village Patgaon) ठिकाणी माहिती केंद्र, सेल्फी पॉईंट, दिशादर्शक फलक तसेच होम स्टे, हॉटेल, अन्न प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून पर्यटन पूरक व्यवसायांना चालना देण्यात येत असून यामुळे पाटगावचा ‘मध’ जगभरात पोहोचेल व यातून रोजगार निर्मिती होवून या डोंगराळ भागातील गावे आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल.