- प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
मुंबई,
Pradhan Mantri Matri Vandana Yojana : प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन मुंबईत करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये आठ लाखांहून अधिक मातांना तब्बल 321 कोटी रुपयांचे ऑनलाईन वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. राज्यातील प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतील 8 लाख 14 हजार मातांना 321 कोटी 57 लाख रुपयांचे ऑनलाईन वाटप या कार्यक्रमात करण्यात आले आणि योजनेची माहिती पुस्तिका, नवीन वेब पोर्टल आणि मोबाईल अॅपचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
नवरात्र संपल्यानंतर मातेला वंदन करण्याचा हा कार्यक्रम आहे. महिला या मातृशक्ती असून समाज, नवीन पिढी घडविण्याचे काम करीत असल्याने ती आदिशक्तीही आहे. केंद्र सरकारच्या मदतीने महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकार तत्पर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये महिलांना आरक्षण देऊन त्यांचा सन्मान केला आहे. ग्रामीण भागात लाखो महिलांच्या नावाने घरे करण्यासाठी पीएम आवास योजनेतील घरांवर महिलांची नावे देण्यात आली आहेत. नरेंद्र मोदी यांनी इतिहासात पहिल्यांदाच पोषण ट्रॅकर सुरू करून करोडो माता-मुलांना योग्य रीतीने पोषणाची सेवा मिळते किंवा नाही याची तपासणी सुरू केली असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
Pradhan Mantri Matri Vandana Yojana : गेल्या दीड वर्षात राज्य शासनानेही महिलांच्या कल्याणासाठी, त्यांना सक्षम करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही योजना राबवित असून, 1 एप्रिल 2023 नंतर गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना लखपती करणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त राज्यात नमो 11 कलमी कार्यक्रम राबवून महिला सशक्तीकरण अभियानातून 73 लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.