वाशीम बडनेरा रेल्वे मार्गाच्या निधी उपलब्धतेसाठी प्रयत्न करणार
खा. भावनाताई गवळी यांची माहिती
दिनांक :04-Oct-2023
Total Views |
वाशीम,
Washim Badnera विदर्भ मराठवाडा दरम्यान रेल्वे दळणवळणाच्या सर्वात सोईचा व कमी खर्चाचा ठरणार्या बडनेरा वाशीम रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण कामकाज पुर्ण झाले आहे. आता हा रेल्वे मार्ग लवकरात लवकर पुर्ण व्हावा यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेवून ४० टक्के निधी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. या करीता मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस व अजित पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती खा. भावनाताई गवळी यांनी दिली.
दळवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या जलसंधारण व दळवळणाच्या विशेष बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीला जिल्हाधिकारी भुवनेश्वरी, भारत सरकार राष्ट्रीय महामार्ग व जलसंधारण समिती सदस्य व्हि. डी. पाटील, वाशीम — बडनेरा रेल्वे मार्ग कृती समिती अध्यक्ष सचिन कुळकर्णी यांच्यासह आदींची उपस्थिती होती. याबैठकीत नितीन गडकरी यांनी वाशीम जिल्ह्यामध्ये दळवळणाच्या कक्षांचे विस्तारीकरण करुन जलसंधारणाला प्राधान्य देण्याची अपेक्षा व्यक्त केली. तेव्हा खा. भावनाताई गवळी यांनी सांगीतले की, नितीनजी गडकरी यांच्या सहकार्यातून वाशीम जिल्ह्यात जलसंधारण व रस्ते निर्मीतीचे कामे मोठ्या प्रमाणात झाले आहे. वाशीम यवतमाळ लोकसभा मतदार संघात दळणवळणाच्या सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी मी सातत्याने प्रयत्न करीत आहे. वर्धा नांदेड, अचलपूर यवतमाळ म्हणजेच शकुंतला व वाशीम बडनेरा Washim Badnera रेल्वे मार्ग व्हावा यासाठी रेल्वे बोर्ड, रेल्वे मंत्रालय व केंद्र सरकार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. यामधील वर्धा नांदेड रेल्वे मार्गाचे काम सुरू झाले आहे. तसेच वाशीम, बडनेरा या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचा समावेश सन २००८, ०९ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आला होता. त्यानुसार रेल्वेच्या सर्व्हेक्षण विभागाने या रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण करुन सदर अहवाल १६ जून २०१० रोजी रेल्वे बोर्डाला सादर केला होता. मात्र, त्यानंतरच्या काळात या रेल्वे मार्गासंदर्भात अपेक्षित कामकाज झाले नाही.
शिवसेना भाजप युती सरकारने सन २०१५ मध्ये मागासलेल्या व आकांक्षित जिल्ह्याचा विकास करण्याचे धोरण निश्चीत केले होते. त्यानुसार देशातील १०० आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत वाशिमसह महाराष्ट्रातील ४ जिल्ह्याचा समावेश झाला. त्यामुळे या जिल्ह्यात शिक्षण,आरोग्य, दळवळण व रोजगार निर्मीती करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनातून एक नियोजनबध्द कार्यक्रम निश्चीत करण्यात आला होता. त्याचाच एक भाग म्हणून पुन्हा आपण केलेल्या मागणी वरुन केंद्र सरकारने सन २०१५ च्या रेल्वे अर्थसंकल्पात बडनेरा - वाशिम रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला नव्याने मंजुरात दिली होती. मध्य रेल्वेने सन २०१६, १७ मध्ये या रेल्वे मार्गाच्या सर्व्हेक्षणाचे काम होती घेतले होते. सर्व्हेक्षणाचे कामकाज लवकर पुर्ण व्हावे यासाठी ना. नितीन गडकरी साहेब, कृती समिती व आपण प्रयत्न केले आहेत. त्यामुळे आता सदर सर्व्हेक्षणाचे कामकाज कुठल्याही त्रुटीविना पुर्ण झाले आहे. आता या रेल्वे मार्गाच्या मंजुरीसाठी राज्य शासनाने ४० टक्के निधीचा वाटा उचलने आवश्यक आहे. म्हणून प्रशासन व कृती समिती यांची बैठक घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस व अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहे. त्याच प्रमाणे या रेल्वे मार्गाला लवकरात लवकर मंजुरात मिळावी या करीता केंद्रीय रेल्वेमंत्री आश्वीनी वैष्णव यांची सुध्दा भेट घेणार आहे. असे देखील खा. भावनाताई गवळी यांनी या बैठकित बोलतांना सांगितले.