ओस्लो,
महिलांवरील अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात लढा देणार्या आणि सध्या कारागृहात असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या Nargis Mohammadi Nobel Peace नर्गिस मोहम्मदी यांना यावर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला. इराणमधील महिलांवर होणार्या अत्याचाराविरुद्ध दिलेला लढा आणि मानवाधिकारांसाठी केलेले अतुलनीय काम यासाठी नर्गिस मोहम्मदी यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्याचा निर्णय नोबेल निवड समितीने घेतला.
2019 मध्ये हिंसक आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या महिलांच्या स्मृती कार्यक‘मात सहभागी झाल्याबद्दल नर्गिस यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून त्या कारागृहात आहेत. विशेष म्हणजे, नर्गिस यांचा आयुष्यातील बराच काळ कारागृहात गेला आहे. इराण सरकारने त्यांना आतापर्यंत 13 वेळा अटक केली आहे. 2019 मध्ये कारागृहात डांबण्यापूर्वी त्या इराणमध्ये असलेल्या डिफेंडर्स ऑफ ह्युमन राईट्स सेंटरच्या उपाध्यक्ष होत्या. या केंद्राची स्थापना करणार्या शिरीन इबादी यांच्या त्या निकटच्या सहकारी मानल्या जातात. विशेष म्हणजे, शिरीन इबादी यांनादेखील याआधी शांततेचे नोबेल मिळाले आहे.
Nargis Mohammadi Nobel Peace नोबेल शांतता पुरस्कार अशा व्यक्ती आणि संस्थांना दिला जातो, जे त्यांच्या देशातील समाजातील गरजूंचे प्रतिनिधित्व करतात तसेच मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्याचा प्रचार करीत शांततेची शिकवण जगाला देतात. गेल्या वर्षी नोबेल शांतता पुरस्कार बेलारुसचे सामाजिक कार्यकर्ते अॅलेस बिलियात्स्की आणि रशियन मानवाधिकार संघटना मेमोरियल तसेच युक‘ेनियन मानवाधिकार संघटना सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज या दोन संस्थांना देण्यात आला होता. यावर्षी नोबेल शांतता पुरस्कारासाठी 351 उमेदवार होते, त्यात 259 व्यक्ती आणि 92 संस्थांचा समावेश होता.