ग्राहकांनो गॅस सिलिंडरचे वजन तपासून घ्या

07 Oct 2023 20:19:01
गोंदिया, 
Gas cylinder : गॅस सिलिंडर घेताना त्याचे वजन करूनच घ्यावे, अन्यथा तुम्हालाही दोन ते अडीच किलोगॅम कमी वजनाचा गॅस सिलिंडर देऊन तुमची फसगत होऊ शकते. असाच प्रकार शहरातील श्रीनगरात उघडकीस आला आहे. कमी गॅसचे सिलिंडर वितरीत करणार्‍या गॅस एजेंसी मालक व वाहनचालकावर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अरविंद एचपी गॅस एजन्सीचे मालक अरविंद नागदेवे (49) रा. गणेशनगर व वाहनचालक मधू राजाराम माहुरे (35) रा. गौतमनगर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
 
Gas cylinder
 
येथील तहसील कार्यालयात पुरवठा विभागात कार्यरत लिपिक सतीश नाईक (34) यांनी गुरुवार 5 ऑक्टोबर रोजी घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची तपासणी करून वजन केले असता निर्धारीत वजनापेक्षा दोन ते अडीच किलोगॅम गॅस कमी असल्याचे दिसून आले. अरविंद नागदेवे यांनी टाटाएस क्रमांक एमएच 35 एजे 1273 या वाहनाला भाड्याने घेऊन त्यात एचपी कंपनीचे गॅस सिलिंडर वाटप करण्याचे काम करीत होते. श्रीनगरातील हरीश भावनानी यांच्या घरी दिलेल्या Gas cylinder गॅस सिलिंडरची पाहणी केली असता कंपनीचे वजनाप्रमाणे 31.40 किलोग्रॅम वजन असणे अपेक्षित होते. परंतु सिलिंडरचे वजन 2.30 किलोग्रॅम वजन कमी होते. अनिल अग्रवाल यांच्या घरी दिलेल्या गॅस सिलिंडरची मोजणी केली असता 31.50 किलोग्रॅम वजन अपेक्षित होते, कंपनीच्या वजनाप्रमाणे 2.60 किलोग्रॅम वजन कमी होते. या प्रकरणात 2 लाख रुपये किमतीचे वाहन, 6600 रुपये किमतीचे गॅस भरलेले दोन सिलिंडर, 81400 रुपये किमतीचे 37 रिकामे सिलिंडर असा 2 लाख 88 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. सतीश नाईक यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी आरोपींवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम 3, 7 सहकलम 5 तरल पेट्रोलियम आदेश 2009 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
 
ग्राहकांनी Gas cylinder गॅस सिलिंडरचा वजन करूनच तो घ्यावा, हा ग्राहकाचा अधिकार आहे. निर्धारीत वजनापेक्षा कमी वजन असल्यास 07182-236153 क्रमांकावर संपर्क साधून तक्रार करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0