तभा वृत्तसेवा
दर्यापूर,
Cotton crop : कापूस पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या तथा याच पिकावर आर्थिक भिस्त असणार्या दर्यापूर तालुक्यातील शेतकर्यांचे कापूस पीक अखेरच्या घटका मोजत आहे. या भागात यंदाचे पाऊसमान अतिशय कमी स्वरूपात असल्याने सुरूवातीपासूनच पिकाची स्थिती कमजोर राहिली आहे. हवमानाचा अंदाजही फोल ठरला. पावसाने कायम दडी मारल्याने आता आशा मावळल्या आहेत.
कपाशी पिकाची Cotton crop सद्य स्थिती अतिशय दयनीय झाली असून पिकांनी अक्षरशः माना खाली टाकल्या आहेत. शेत शिवारात भेगा पडू लागल्याने जमिनीतील ओल संपत आल्याची सूचना मिळाली आहे. या स्थितीत उत्पादन कमालीचे घटणार असल्याचे शेती तज्ञ सांगत आहेत. सदर पिकावर अवलंबुन असणार्या शेतकर्यांचे आर्थिक कंबरडे मोडणार आहे. कापूस पिकाची अशी स्थिती असताना बाजारात या पिकाला केवळ 7500 रु. भाव मिळत आहे. पुढील काळात भाव वाधारतील या भोळ्या आशेवर शेतकरी आहेत. दर्यापूर तालुका कोरडवाहू असून येथील शेतीला पाणी देण्याची व्यवस्था नाही. खारपान पट्टा असल्याने येथे जमिनीतील पाणी खारे आहे. ते शेतीच्या उपयोगाचे नाही. दिवसेंदिवस पाऊस लहरी होत चालला असून शेती व्यवसाय कसा करावा या विवंचनेत येथील शेतकरी आला आहे. अशा स्थितीतही काही शेतकर्यांनी संरक्षित ओलीत करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र त्याचाही फारसा परिणाम कपाशी पिकावर झालेला दिसून येत नाही.
बाजार समितीचे माजी सभापती बाबाराव बरवट या संदर्भात म्हणाले, Cotton crop कपाशी तूर व हरभरा या पिकांची स्थिती संपल्या गत झाली आहे. सोयाबीनचे पीकही हातातून गेले आहे. अशा स्थितीत शासनाने दर्यापूर तालुक्यातील शेतकर्यांना शक्य तेवढी मदत करणे अपेक्षित आहे. ओलिताच्या व्यवस्थेसाठी प्रयत्न व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भाजपाचे पदाधिकारी अॅड. भूषण खंडारे म्हणाले, दर्यापूर तालुक्यातील पिकांची स्थिती आर्थिक पातळीच्या खाली आली आहे. यंदा उत्पन्न अतिशय कमी येणार असल्याचे चित्र शेत शिवारात दिसू लागले आहे. शेतकरी पुढील काळात आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता आहे. सरकारने यासाठी विशेष प्रयत्न करावे अशी आमची मागणी आहे.
55 हजार हेक्टरवर कपाशीची लागवड
दर्यापूर तालुक्यात एकूण पेरणी योग्य असलेल्या 75 हजार 612 हेक्टर जमिनीपैकी एकंदरीत 55 हजार हेक्टर जमिनीवर Cotton crop कापूस पिकाची लागवड आहे. उर्वरित जमिनीवर तूर, सोयाबीन व हरभरा पिकाची लागवड आहे. या पिकांनाही कमी पावसाचा फटका बसला असून त्याचेही उत्पन्न कमालीचे घटणार असल्याचे भाकीत वर्तवण्यात येत आहे. यातील केवळ पाच टक्के शेतकर्यांनी संरक्षित ओलीत करण्याचा प्रयत्न केला आहे
कपाशी पिकाची स्थिती हलाखीची
दर्यापूर तालुक्यातील कपाशीसह इतर पिकांची सद्यस्थिती व अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यात आला आहे. दर्यापूर मधील महसूल विभाग, जिल्हा परिषद विभाग व कृषी विभाग यांच्या माध्यमातून प्रत्येक मंडळात चार प्लॉट पिकांची लागवड करण्यात आली आहे. त्यातून निघणार्या पिकांची सरासरी काढल्यानंतर त्याचाही अहवाल शासनाला पाठवण्यात येईल. Cotton crop सद्यस्थितीत कपाशी व तूर पिकाची स्थिती अतिशय हलाखीची असल्याचे निदर्शनास आले आहे.
-राजकुमार आडगोकार, तालुका कृषी अधिकारी, दर्यापूर
शेतीसाठी विशेष प्रयत्न गरजेचे
महागाईच्या काळात शेती खर्च परवडणारा नाही. इतर व्यवसायाला वाव नसल्याने शेतकरी शेतीवरच अवलंबून आहेत. यंदाच्या पाऊसमानाने शेतीला पार उध्वस्त करून टाकले आहे. Cotton crop कपाशी पिकाची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. यंदा उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट येणार असल्याचे दिसत आहे. शेतकरी व शेतीला वाचवण्यासाठी दर्यापूर तालुक्यात विशेष प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे.
-अमोल पाटील धर्माळे, संचालक खरेदी विक्री संघ, दर्यापूर