उन्मादी मानसिकता

    दिनांक :15-Nov-2023
Total Views |
वेध
- विजय निचकवडे
इतिहासापासून धडा घेत शिकण्याची आमची तयारीच नसते. ही तयारी आम्ही दाखविली असती, तर कदाचित अनेक वाईट घटना टाळण्यात आम्हाला यश नक्की आले असते. पण इतिहास हा केवळ वाचण्यासाठी किंवा गोष्टी, भाषणांमध्ये सांगण्यासाठी असल्याचा समज असल्याने आजही आम्ही या बाबतीत फार गंभीर नाही. या गंभीर नसण्याचेच ‘गंभीर’ परिणाम कधीतरी भोगावे लागतात. आता दोन दिवसांपूर्वी मालेगावातील एका चित्रपटगृहात झालेला प्रकार उन्मादापेक्षा काही वेगळा नव्हता. या मानसिकतेतून केवळ क्षणिक आनंद मिळू शकेल, पण अनेकांच्या आनंदी आयुष्याला क्षणात संपविण्यासह हीच mentality मानसिकता जबाबदार असते, याचा विसर पडल्यानेच आज चित्रपटगृहात आतषबाजी करण्याची हिंमत होते, हेच विकृतपणाचे आहे.
 
 
pataka
 
इतिहासाचा विषय एवढ्यासाठीच की, 13 जून 1997 साली दिल्लीच्या उपहार चित्रपटगृहात अशीच एक आगीची घटना घडली. ‘बॉर्डर’ चित्रपटाचे सादरीकरण सुरू असताना लागलेल्या आगीत 59 निष्पापांना जीव गमवावे लागले होते तर 103 जणांना गंभीर दुखापत झाली होती. विजेच्या उपकरणांच्या तपासणीकडे दुर्लक्ष झाल्याने ही घटना घडल्याचे सांगितले गेले होते. या घटनेत एका दाम्पत्याच्या दोन्ही मुलांना जीव गमवावा लागला होता; ज्याच्या न्यायाच्या प्रतीक्षेत ते कुटुंब वर्षानुवर्ष झगडत राहिले. उपहार चित्रपटगृहाचा इतिहास डोळ्यापुढे आहे. केवळ चित्रपटगृहातच नव्हे, तर आगीच्या घटनांनी जिथे जीव वाचविले जातात, अशा रुग्णांलयांमध्येही अनेकांचे प्राण घेतले आहेत. भंडारा शहरातील जिल्हा रुग्णालयाच्या आगीत 11 बालकांचा गेलेला बळी अजूनही लोक विसरले नाहीत. मग जिथे लोकांच्या जिवाशी खेळ होण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी उन्माद आणि हुल्लडबाजी करून मिळणार्‍या आनंदात धन्यता मानणार्‍यांची mentality मानसिकता काय असेल, याची कल्पना केली जाऊ शकते.
 
 
‘टायगर-3’ चित्रपटाच्या सादरीकरणाच्या वेळी मालेगावातील चित्रपटगृहात जो काही आतषबाजीचा जीवघेणा गोंधळ घातला गेला, तो नक्कीच विचार करण्यास भाग पाडणारा आहे. ज्या कलावंतांचे आपण खूप मोठे चाहते आहोत, हे सांगण्यासाठी हा सर्व प्रकार झाला, त्यालाही अशा अतिउत्साही प्रेक्षक चाहत्यांना ‘उन्माद करू नका’ सांगण्याची वेळ येत असेल तर विचार व्हायलाच हवा. चित्रपट सुरू झाल्यानंतर आवडता कलाकार पडद्यावर येताच उडालेले फटाके कदाचित कुणाचे तरी आयुष्यही संपवू शकले असते. चित्रपटगृहातील पडदा जळून आग लागली असती, तेथील वातानुकूलित यंत्र बंद होऊन फटाक्याच्या दूषित धुरामुळे कुणाचे जीवही जाऊ शकले असते. सुदैवाने हे झाले नाही. पण भीतीने अनेकांनी सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी पळ काढलाच. यात कुणाचा जीव गेला असता, तर याची जबाबदारी कुणी घेतली असती. एरवी चित्रपटगृहात साधे चिप्सचे पॅकेट नेले जाऊ देत नाही. सुरक्षेच्या नावाने सर्व काही बाहेर टाकण्यास सांगितले जाते. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात फटाके आत गेले कसे, हा प्रश्नच आहे. चित्रपटगृहातील सुरक्षेचे तीनतेरा वाजले, हेच यातून सिद्ध होते किंवा हे सर्व करण्यासाठी अप्रत्यक्षरीत्या चित्रपटगृह व्यवस्थापनाचा पाठिंबा तर नाही ना, असा प्रश्न निर्माण होतो. कदाचित या सर्व प्रकारातून प्रसिद्धी होईल, अशीही mentality मानसिकता या मागे असल्यास नवल वाटू नये.
 
 
हा प्रकार पुढे आला आणि चर्चा सुरू झाल्या. पण या चर्चांमधून खरेच काही पदरी पडणार आहे का? कारण पाठीशी कितीही अनुभव असले, तरी त्याकडे दुर्लक्ष करून मनात येईल, तेच करण्याची विकृत mentality मानसिकता आज बळावत आहे. उपहार चित्रपटगृहात इतके जीव गेले. पण सिनेमागृहात फटाके जाळताना एकाच्याही मनात त्या प्रसंगाची आठवण येऊन करीत असलेला प्रकार चुकीचा आहे, हे वाटू नये. केवळ आपल्या आसुरी आनंदासाठी नाहक अनेकांना वेठीस धरण्याची वृत्तीच अनेकदा घातक ठरते. सुदैवाने कुणालाही काही इजा झाली नाही. पण झाली असती तर पुन्हा एकदा इतिहासात मालेगाव चित्रपटगृह अग्नी तांडव असा उल्लेख नक्कीच राहिला असता. आनंद घ्यायलाच हवा, आपल्या आवडत्या व्यक्तीविषयी व्यक्तही व्हायला हवे; पण हे करताना सर्व प्रकारचे भानही ठेवले गेले पाहिजे. नाहीतर ज्यांना दाखविण्यासाठी आपण हे करतो, ते तुमचे सर्वाधिक आवडते कलाकारही अशा वागण्याने लज्जित होतील, यात शंका नाही. 
 
- 9763713417