आता घरीच उगवा कमी खर्चात फळ भाज्या

    दिनांक :18-Nov-2023
Total Views |

vegetables at home स्वत:च्या हाताने निरखून भाज्या तोडणे यासारखा दुसरा आनंद नसावा.अलीकडे मात्र जागेची कमतरता हा परसबागेसाठी मोठा मुद्दा आहे.तरी पण आपण तीन वेगवेगळ्या प्रकारे या प्रश्नांच उत्तर पाहूया.

१. ज्यांच्याकडे झाडे लावण्यासाठी अंगण स्वरुपात खुली जागा आहे

या प्रकारात ज्यांचे स्वतंत्र घर असून घराच्या भिंतीला परसबाग तयार करता येईल इतकी जागा असेल अश्या घरांचा समावेश करता येईल.जर अशी जागा असेल तर सर्वप्रथम ती जागा १५ ते २० सेमी खोरुन घेऊन जमीन भुसभुशीत करून घ्यावी. खडकाळ जमीनीच प्रमाण जास्त असेल तर त्यात काळी माती विकत आणून चांगली एकत्र घेऊन या.

 • जर जमीन काळी आणि पाणी धरून ठेवणारी असेल तर अश्या जमिनीत बारीक वाळू किंवा चांगले कुजलेले व सुकलेले शेणखत घालून घ्या.
 • आता आपले वाफे तयार झाले आहेत त्यामुळे बाजारातील कृषी सेवा केंद्रातून आवश्यक त्या भाजीपाल्याचे बियाणे घेऊन या.
 • आजकाल घरगुती वापरासाठी लहान आकाराचे बियाणे पाकिटे सहज मिळतात.

या बागेत आपण सर्व भाजीपाला लागवड दोन प्रकारे करू शकतो.

 
 
भाजी लागवड
 

पालेभाज्या लागवड - पालेभाज्या जसे पालक, चुका, मेथी, कोथिंबीर, चवळी यासारख्या कुठल्याही पालेभाज्या घेऊ शकतो.

 • यासाठी निवडलेल्या प्रत्येक पालेभाजीसाठी घरातील माणसे किती आहेत आणि एका वेळी ती भाजी किती लागते यानुसार किती क्षेत्र लागेल ते ओळखून तेवढी जागा आखून घ्या. चार मोठी माणस आणि दोन लहान मुलांसाठी ३ बाय ३ फुट एवढी जागा पुरेसी ठरते.
 • आता या आखून घेतलेल्या ३ बाय ३ फुट जागेचे दोन भाग करा.
 • यातील एका भागात या रविवारी लागवड करत असाल तर दुसर्या भागात पुढील रविवारी लागवड करा.
 • अश्याप्रकारे वापरानुसार आलटून पालटून हि जागा वापरा, जेणेकरून त्या भाजीचा सतत पुरवठा सुरु राहील.
 • पालेभाज्या तोडताना त्या खुडून घ्याव्यात म्हणजे खालच्या खोडाला परत फुटवे फुटून एक पिक मिळते. अश्या प्रकारे दोनदा पिक घेऊन झाले कि झाडे मुळापासून उपटून परत नव्याने लागवड करावी.

फळभाजी लागवड - यामध्ये टमाटे, भेंडी, वांगे, दोन्ही कोब्या, आणि विविध वेलवर्गीय भाज्या येतात.

 • यासाठी जागा असेल तर टमाटे, वांगे, भेंडी यासारख्या फळभाज्यांची किमान दहा झाडे एकत्र लावता येऊ शकतात किंवा जागा नसेल तर वरील पालेभाज्या च्या वाफ्यांच्या कडेला एक फुट अंतरावर एक झाड याप्रमाणे लागवड करता येऊ शकते.
 • यामध्ये टमाट्याच्या झाडांना आधार म्हणून एकतर दोरीने बांधून घेता येईल किंवा झाडाच्या दोन्ही बाजूला बांबूच्या बारीक काठ्या टोचून आधार देता येऊ शकतो.
 • फळभाजी लावतांना सुद्धा दहा झाडे लावायची असतील तर पाच या रविवारी तर पाच पुढील रविवारी लावावीत, जेणेकरून फळभाज्यांचा सतत पुरवठा सुरु राहील.
 • यात फक्त फुलकोबी किंवा पानकोबीची झाडे वारंवार लावावी लागतात कारण एकदा कोबी तोडणीला आली कि ते झाडच उपटून घ्यावे लागते. त्यामुळे एका झाडापासून एकदाच उत्पादन मिळू शकते व वारंवार किंवा लागेल तसी लागवड करावी लागते.
 • दुसरे असे कि ज्या हि वेलवर्गीय भाज्या आहेत त्यांच्या बिया भिंतीशेजारी लावाव्यात. वेलवर्गीय भाज्यांना आधाराची गरज असल्याने काठीचा आधार देऊन त्या वेलीना भिंतीवर किंवा एखाद्या फळझाडावर चढण्यास मदत करावी लागते. प्रत्येक भाजीची एक वेल देखील किमान दोन घरांना तर नक्कीच पुरेशी ठरते.

अश्या स्वरुपाची पालेभाज्या , फळभाज्या व वेलवर्गीय एकत्रित लागवड करावी. सकाळचा एक तास व संध्याकाळचा एक तास बागेसाठी प्रकृतीसाठी सुद्धा फायदेशीर ठरतो.

. जी मंडळी शहरात फ्लॅट मध्ये राहते व ज्यांच्याकडे फक्त गॅलरी आहे vegetables at home

जी मंडळी शहरात फ्लॅट मध्ये राहते तसेच ज्यांच्याकडे टेरेस सुद्धा उपलब्ध नाही अशी मंडळी, त्यांनी ठरवलं तर त्यांच्या गॅलरीत देखील भाजीपाला लागवड करू शकतात.

 • यासाठी शक्यतो लोखंडी रॅक तयार केल्या तर उत्तम ठरते, जेणेकरून कमी जागेत एकावर एक अश्या पद्धतीने लागवड करता येऊ शकते.
 • गॅलरीत लागवड करताना आपल्याला फक्त प्लास्टिकच्या पसरट कुंड्यांचाच वापर कराव लागेल, कारण त्या वजनाने हलक्या व उचलखाचल करण्यास सोयीस्कर पडतात.
 • कुंड्यात माती भरताना माती, शेणखत, बारीक वाळू यांचा वापर करावा.
 • कुंडीत लागवड करतांना मात्र आपण शक्यतो फक्त पालेभाज्याच घेऊ शकतो. फार तर फळभाज्यांमध्ये टमाटे घेता येतील.
 • पालेभाज्या लावतांना एका पालेभाजीसाठी दोन कुंड्या पुरेश्या ठरतील.
 • कुंडीत पालेभाज्या लावतांना लागवड दाट करावी लागत असल्याने शक्यतो झाडे जास्त उंच वाढू न देता वेळीच तोडणी करावी. त्यामुळे कोवळा भाजीपाला मिळेल आणि झाडांमध्ये सुद्धा वाढीसाठी स्पर्धा होणार नाही.
 • कुंडीत सुद्धा एकदा लागवड केली कि दोन पिकं घेतल्यानंतर भाज्या मुळासकट उपटून घ्याव्यात आणि परत नव्याने लागवड करावी.
 • अश्या नव्याने लागवड केलेल्या कुंड्या लगेचच वापरात येणार नसल्याने त्या वरच्या रॅक वर ठेवाव्यात तर तोडणीला आलेल्या कुंड्या खालच्या रॅक मध्ये ठेवाव्यात, जेणेकरून तोडणी व देखभाल सोपी होईल.
 • फळभाज्या साठी वापरण्यात येणारी कुंडी मात्र उथळ न घेता खोल घ्यावी. तसेच एका कुंडीत जास्तीत जास्त दोन रोपे लावावीत, म्हणजे झाडांमध्ये प्रतिस्पर्धा होणार नाही.
 • गॅलरीत वेलवर्गीय झाडे लावता येणार नाहीत.

३. ज्यांच्याकडे लागवडीसाठी खाली अंगण नाही मात्र गच्चीवर मोकळी जागा आहे.

या प्रकारातील मंडळी सुद्धा इच्छा असेल तर भाजीपाला लागवड करू शकतात.

 • गच्चीवर भाजीपाला लागवड करताना सुरुवातीला गरजेनुसार विटांचा मोठा चौकोन करून त्यात माती भरा.
 • माती थेट गच्चीवर पण टाकता येते किंवा त्याखाली काळ्या रंगाचे प्लास्टिक आच्छादन सुद्धा वापरता येते.
 • माती भरताना त्यात शेणखत जास्त मिसळा कारण झाडांची मुळे खोलवर जाऊ शकत नाहीत आणि ती पोषणासाठी केवळ माती आणि त्यातील घटकांवर अवलंबून असतात.
 • या वाफ्यांची उंची तीन विटा एकमेकांवर रचल्यानंतरची असेल तर लांबी आपल्या मर्जीनुसार घेता येते.
 • वाफ्याची रुंदी हि आपला हात पुरेल एवढी असावी, म्हणजेच कामे करताना अडचण येणार नाही.
 • अश्याच प्रकारे आपण पसरट ट्रे सुद्धा वापरू शकतो किंवा लाकडी बॉक्सेस सुद्धा बनवू शकतो किंवा साखरेच्या गोण्यात माती भरून सुद्धा लागवड करू शकतो.
 • या वाफ्यांची खोली कमी असल्यामुळे यामध्ये ज्या भाज्यांची मुळे खोल जातात असा भाजीपाला घेता येत नाही. त्यामुळे यात पालक, मेथी, कोथिंबीर, चुका, कांदा, लसून यासारख्या पालेभाज्या घेता येतील.
 • या पद्धतीत सुद्धा वेलवर्गीय वनस्पती लावता येणार नाहीत.

आता फळझाडांच्या बाबतीत बोलूया.

फळझाडे आपण गलारीत किंवा गच्चीवर घेऊ शकत नाही, त्यामुळे खाली अंगणात किती जागा आहे त्यानुसार फळझाडे लावता येतील. काही फळझाडे अशी ....

पपई - पपई चे झाड जास्त उंच वाढत नाही तसेच त्याचे मुळे देखील जास्त खोल जात नसल्याने आपण पपई चे किमान दोन तीन झाडं नक्कीच लावू शकतो.

यासाठी नर्सरीतून चांगल्या जातीची मादी झाडे आणून लावावीत. पपई ची फारशी विशेष काळजी घ्यावी लागत नसल्याने हे झाड लगेच वाढीस लागते व फळ धरते. झाडाला पपई एका वर्षात येते व एकदा फळ तोडून झाले कि परत येते, मात्र दोन वर्षे झाले कि फळांच प्रमाण कमी होते त्यामुळे झाड उपटून टाकावे लागते.

आंबा - अलीकडे आंब्याच्या नवीन संकरित बुटक्या जाती विकसित झाल्या आहेत ज्या फारतर १० फुट उंच वाढतात व त्यांचा फैलाव सुद्धा जुन्या देशी झाडांच्या मानाने फारच कमी आहे. आम्रपाली, दशहरी, नीलम, मल्लिका या सारख्या जाती फारच कमी जागा व्यापतात व चौथ्या वर्षापासून फळे द्यायला सुरुवात करतात. त्यामुळे आंबा सुद्धा चांगला पर्याय आहे.

पेरू - अलीकडे पेरू बाबत लोकं जागरूक झाली आहेत. त्यामुळे संकरित पेरू सुद्धा कमी जागेत येणारं व वर्षातून दोनदा फळे देणारं झाड म्हणून चांगला पर्याय आहे. पेरूची छाटणी केल्यास झाडाचा घेराव सुद्धा फार कमी होतो.

सीताफळ - हे माझ्या आवडीचं फळ असून माझ्या अंगणात होतं मात्र वय झाल्यामुळे काढावं लागलं त्यामुळे सीताफळ हा माझा आवडता पर्याय असेल. सीताफळ देखील फारसं उंच वाढत नसल्याने व मुळे देखील फारशी खोल जात नसल्याने उपद्रवी ठरत नाहीत.

काही सामाईक सूचना

१. परसबागेला पाणी देतांना शक्यतो झारीचा वापर करावा. नळी किंवा मग्ग्याने पाणी देवू नये,

२. खते देण्यासाठी चांगले कुजलेले शेणखत किंवा गांडूळखत वापरावे.

३. शक्यतो रासायनिक खते न वापरलेलीच बरी. पण वापरणं अपरिहार्य असेल तर प्रमाणशीर वापरा.

४. स्वयंपाकघरातील खरकटे, भाज्यांचे देठ, सांडपाणी थेट झाडांच्या मुळांशी न घालता ते एकत्र करून एका खोल खड्ड्यात टाका व त्याला कुजू द्या आणि कुजल्या नंतरच त्याचा खत म्हणून वापर करा.

५. नासलेले दुध, दही, ताक असे पदार्थ चुकुनही मुळांभोवती घालू नका.

६. महिन्यातून एकदा जमीन हलक्या हाताने भुसभुशीत करून घ्या.

७. भाज्या खुडताना त्या अंगठा व तर्जनी चा वापर करून न ओढता तोडा, जेणेकरून मुळाना इजा होणार नाही.

८. उन्हाळ्यात झाडांना सावलीची सोय करा व दोनदा पाणी घाला

९. घरच्या घरी बियाणे मिळवण्यासाठी प्रत्येक भाजीचे एखादे फळ परिपक्व होऊन सुके पर्यत तोडू नका. सुकल्या नंतर त्यातील बिया काढून उन्हात वाळवून जतन करून ठेवा.