लाईन ऑफ कंट्रोलजवळ ‘बॉर्डर टुरिझम’मुळेकाश्मीरमधील पर्यटनात वेगाने वाढ

    दिनांक :19-Nov-2023
Total Views |
राष्ट्ररक्षा
- ब्रिगेडियर हेमंत महाजन
1.88 कोटी पर्यटकांनी काश्मीरला 2022 मध्ये दिली भेट
Jammu and Kashmir Tourism : जम्मू-काश्मीरच्या दहशतवादाचे कंबरडे मोडल्यामुळे राज्यांमध्ये पर्यटन हा अतिशय मोठा व्यवसाय बनलेला आहे. 2022 मध्ये 1.88 कोटी पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली; जे गेल्या 75 वर्षांतील सर्वात मोठे रेकॉर्ड होते. बहुतेक पर्यटक हे श्रीनगर, गुलमार्ग, पहेलगाम आणि लडाखला भेट देण्यात उत्सुक असतात. गुलमार्गमध्ये असलेले अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स आणि लडाख म्युझिकल फेस्टिव्हलला पर्यटकांनी मोठी दाद दिली आहे. अमरनाथ यात्रेत चार लाखांहून जास्त पर्यटकांनी अमरनाथला भेट दिली. काश्मीरमधील तीन विमानतळे जम्मू, श्रीनगर आणि लेह एअरपोर्ट्सवर रोज 90 ते 95 विमानांच्या फ्लाईट्स लॅण्ड होत आहे. काश्मीरच्या डोंगराळ भागामध्ये मोठ्या प्रमाणात नद्यांवर पूल आणि डोंगरातून बोगदे निर्माण केल्यामुळे रस्ता वाहतूक अतिशय उत्कृष्ट दर्जाची आणि वेगवान झालेली आहे. यामुळे पर्यटन अतिशय सोपे झालेले आहे. याशिवाय रेल्वेमध्ये अनेक सुधारणा झालेल्या आहेत. आता रेल्वेने उद्धमपूरपर्यंत पोहोचता येते. येत्या डिसेंबरमध्ये काश्मीर खोर्‍याकरिता चिनाब नदीवर बांधलेला पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. यामुळे दिल्ली ते श्रीनगर हे अंतर रेल्वेने 12 तासात अत्यंत वेगाने करता येईल. येणार्‍या काळामध्ये पर्यटन अजून वाढेल. हे सगळे घडले कारण, काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था अत्यंत मजबूत झाली आहे. काश्मीरच्या 50 ते 60 टक्के लोकसंख्येला टुरिझममुळे डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट फायदा होतो.
 
 
shikara_mobile
 
लाईन ऑफ कंट्रोलजवळ बॉर्डर टुरिझम सुरू
Jammu and Kashmir Tourism : जम्मू-काश्मीरच्या सीमेवरील भागात पर्यटन वाढविणे आव्हानात्मक होते. कारण या भागात एलओसीवर सतत पाकिस्तानचे फायरिंग सुरू असते. येथे मोठी शस्त्रे म्हणजे तोफखाना वगैरे वापरला जात होता. याशिवाय दहशतवाद्यांची अविरत घुसखोरी असल्यामुळे वेळोवेळी इथे दहशतवाद्यांच्या आपल्या सैन्याबरोबर चकमकी चालू असायच्या. त्यामुळे हा भाग अशांत समजला जायचा आणि इकडे पर्यटन शक्य नव्हते. परंतु, आता सुरक्षा व्यवस्था मजबूत झाल्यामुळे आणि या भागांमध्ये रस्ते वाहतूक सुधारल्यामुळे इथे पर्यटन वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला. यामध्ये भारतीय सैन्याची मदत अत्यंत महत्त्वाची होती. जम्मू-काश्मीरच्या सीमेवरील भागांमध्ये पुंछ, राजौरी, तंगदार, कुपवारा, उरी, गुरेज आदी स्थाने सुंदर आणि ऐतिहासिक आहेत. जम्मू-काश्मीरच्या सीमावरील भागांमध्ये नैसर्गिक सौंदर्य आहे. ऐतिहासिक स्थळे, प्राचीन मंदिरे, पारंपरिक सांस्कृतिक वारसा आणि अन्य सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मुळे येथे सापडतात. त्यामुळे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पर्यटन अस्तित्वात आले आहे. भारतीय सैन्याच्या मदतीने लाईन ऑफ कंट्रोलजवळ उरी, गुरेज, पुंछ आणि राजुरी जिल्ह्यामध्ये बॉर्डर टुरिझम पर्यटन सुरू झाले आहे. तिथे अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. याशिवाय युद्धभूमीला भेट देण्यासाठी काही कार्यक्रम विकसित करण्यात आलेले आहे. सीमेवरील भागात भारतीय सैन्य 25 हजार कोटी रुपये खर्च करून, 60 हजार किलोमीटर एवढ्या लांब ऑप्टिकल फायबर केबल टाकत आहे. यामुळे 133 सीमा भागात असलेल्या गावांना मोबाईल कम्युनिकेशन मिळेल आणि ते देशाच्या इतर भागांशी जोडले जातील. हा कार्यक्रम जरी भारत सरकारचा असला, तरी या कार्यक्रमांमध्ये भारतीय सेना ही लीड एजन्सी आहे. यामुळे या भागात डायरेक्ट आणि इनडायरेक्ट रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. स्थानिकांसह पर्यटकांना या भागात नेटची सुविधा मिळत आहे.
 
 
जम्मू-काश्मीरच्या सीमेवरील भागामध्ये पर्यटन वाढविण्यासाठी केलेल्या उपाययोजना
या भागामध्ये पर्यटन सुविधांचा विकास केला गेला. यामध्ये हॉटेल, रेस्टॉरंट, पर्यटन मार्गदर्शक, वाहतूक व्यवस्था इत्यादींचा समावेश होतो. Jammu and Kashmir Tourism या भागातील पर्यटनस्थळांची माहिती व्यापकपणे पोहोचविण्यासाठी प्रचार आणि प्रसार मोहिमा राबविल्या गेल्या. यासाठी सोशल मीडिया, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर केला. या भागासाठी पर्यटन उत्पादने विकसित केली गेली. यामध्ये साहसी पर्यटन, ग्रामीण पर्यटन, धार्मिक पर्यटन, साहसी पर्यटन इत्यादींचा समावेश आहे.
 
 
भारतीय सैन्यामुळे सीमेवरील भागात पर्यटन कसे वाढले?
सैन्याच्या मदतीने लाईन ऑफ कंट्रोलजवळ बॉर्डर टुरिझम सुरू झाले आहे. या पर्यटन कार्यक्रमामध्ये पर्यटकांना लाईन ऑफ कंट्रोल (LoC) जवळील पर्यटन स्थळांना भेट देता येते. याशिवाय युद्धभूमीला भेट देण्यासाठीही काही कार्यक्रम विकसित करण्यात आले आहेत. भारतीय सैन्याने सीमेवरील भागातील अनेक पर्यटन स्थळांची निर्मिती केली आहे. यामध्ये स्मारक, संग्रहालये आणि इतर सुविधा तसेच संस्कृती आणि इतिहास यांचा समावेश आहे. सैन्य पर्यटन यामुळे या भागातील पर्यटनाला चालना मिळाली आहे. या कार्यक्रमामुळे पर्यटकांना या भागातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांचा अनुभव घेता येत आहे.
 
 
होम स्टे अजून जास्त लोकप्रिय करण्याकरिता काय करावे?
होम स्टेची गुणवत्ता सुधारण्यासाठी नियमन करण्यात आले पाहिजे. या नियमांमध्ये निवास, अन्न, स्वच्छता इत्यादींचा समावेश होतो. या भागातील स्थानिक लोकांमध्ये होम स्टेला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. Jammu and Kashmir Tourism यामुळे पर्यटकांना स्थानिक संस्कृतीचा अनुभव घेता येईल. होम स्टे मालकांना पर्यटन क्षेत्रातील कौशल्ये शिकविण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. होम स्टेसाठी प्रोत्साहन योजना आखल्या जाऊ शकतात. या योजनांमध्ये कर सवलत, अनुदान इत्यादींचा समावेश होऊ शकतो. होम स्टेचे अजून जास्त ऑनलाईन मार्केटिंग करणे आवश्यक आहे. यासाठी सोशल मीडिया, वेबसाईट आणि इतर माध्यमांचा वापर केला जाऊ शकतो. यामुळे होम स्टे व्यवसायाला चालना मिळेल. होम स्टे अजून जास्त लोकप्रिय करण्यासाठी स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रम, लोककला आणि लोकसंग्रहालये आयोजित करणे आवश्यक आहे. स्थानिक खाद्य पदार्थ आणि वस्त्रे, त्यांची विशेषता आपल्या पर्यटकांसाठी दर्शनीय बनू शकतात. स्थानीय सांस्कृतिक संपत्तीची उत्कृष्टता दाखवून स्थानीय विविधतेत वाढ केली जाऊ शकते. स्थानीय वस्त्र, संगीत आणि विशेष आचारविचारांचे प्रदर्शन केले जाऊ शकते. पर्यटकांना सुखाचे निवास मिळण्यासाठी आकर्षक हॉटेल आणि रिसॉर्ट विकसित केलेले जाऊ शकतात.
 
 
सीमेवरील भागात पर्यटन वाढीसाठी अजून काय करावे?
या भागामध्ये पर्यटन सुविधांचा अजून विकास करणे आवश्यक आहे. यामध्ये हॉटेल, रेस्टॉरंट, पर्यटन मार्गदर्शक, वाहतूक व्यवस्था इत्यादींचा समावेश होतो. या भागातील पर्यटन स्थळांचा प्रचार आणि प्रसार देशभर करणे आवश्यक आहे. यासाठी विविध माध्यमांचा वापर केला जाऊ शकतो. पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढविणे गरजेचे असून यामुळे पर्यटन सुविधांमध्ये सुधारणा होईल आणि पर्यटनाचा विस्तार होईल. Jammu and Kashmir Tourism यासाठी पर्यटन व्यवसायाशी संबंधित संस्था आणि संघटनांना प्रोत्साहन दिले पाहिजे. सीमेवरील भागातील पर्यटनाचे नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी पर्यटन धोरण आणि विकास आराखडा तयार केला पाहिजे. या गोष्टींचा विचार केल्यास जम्मू-काश्मीरच्या सीमेवरील भागातील पर्यटनात आणखी वाढ होऊ शकते. या भागात सैन्यामुळे सुरक्षा व्यवस्था सुधारली आहे. सैनिकांनी स्थानीय जनतेला आपले बनवले आहे आणि स्थानीय आरोग्य यंत्रणाची मदत केली आहे. भारतीय सैन्यामुळे येथील पर्यटन वाढले आहे. बॉर्डर टुरिझम पर्यटनमुळे लाखो नोकर्‍या निर्माण झाल्यामुळे त्याचा लाभ सीमेच्या भागातल्या आणि इतर दुर्गम भागातल्या जनतेला मिळत आहे. एकेकाळी काश्मीरमध्ये असलेल्या नैसर्गिक सौंदर्यामुळे भारतीय चित्रपटांचे शूटिंग काश्मीरमध्ये व्हायला पाहिजे. परंतु ते थांबले होते. आता या शूटिंगचे पुनर्जीवन होत आहे आणि आतापर्यंत 400 वेगवेगळ्या सिनेमा प्रॉडक्शन हाऊसला काश्मीरमध्ये शूटिंग करण्याकरिता परवानगी मिळालेली आहे. सतत केल्या जाणार्‍या प्रयत्नांमुळे काश्मिरात 2023 मध्ये येणार्‍या पर्यटकांची संख्या 2 कोटी 50 लाखांहून जास्त होण्याची शक्यता आहे. थोडक्यात काश्मीरची नंदनवनाकडे वाटचाल सुरू झालेली आहे आणि या वाटचालीमध्ये भारतीय सैन्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती आणि येणार्‍या काळात पण राहणार आहे.
- 9096701253 
(लेखक संरक्षणविषयक तज्ज्ञ आहेत.)