श्रीकांत इंगळहळीकर
ज्येष्ठ अभ्यासक
पावसाळ्यातला Nature blooming निसर्ग बघणे, अनुभवणे अपूर्व आनंददायी असते; त्याचप्रमाणे पावसाळ्यानंतरच्या विलक्षण देखण्या निसर्गामध्ये भटकंती करणेदेखील वेगळा आनंद देणारे असते. पावसाळ्यानंतरचे काही दिवस पायवाटा रानफुलांमध्ये हरवून जाण्याचे असतात. मात्र, कडक ऊन पडू लागले की, जमिनीतील ओल कमी होते आणि छोट्या वनस्पतींचा हंगाम संपतो. त्यानंतर म्हणजेच हिवाळा सुरू होताना वेली आणि झुडपे बहरू लागतात. नानाविध रंगांच्या फुलांनी फुलू लागतात. या पृष्ठभूमीवर आताही अशी अनेक फुले पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. पुढचे काही दिवस निसर्गामध्ये हा महोत्सव रंगलेला बघायला मिळेल. त्यामुळेच अभ्यासक आणि पर्यटकांनी ही पर्वणी साधायलाच हवी.
Nature blooming : सध्या कारवी बहरली आहे. ती काही वर्षांनी फुलत असल्यामुळे आकर्षण केंद्र असते. सगळीकडे कारवीचा बहर बघायला मिळत असल्याने डोंगरांवर पसरलेली निळी-जांभळी फुले लक्ष वेधून घेत आहेत. अलिकडच्या काळात बहरलेली कारवी दाखवणार्या महोत्सवांचे आयोजनही केले जाते. कारवीच्या सहलींना पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. आपल्याकडे सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये कारवी आढळत असून तिचा बहर आणखी महिनाभर बघायला मिळेल. या झाडावर भरपूर मधमाशा असल्यामुळे सहा-सात वा आठ वर्षांनी फुलणार्या कारवीचे महत्त्व नोंद घेण्याजोगे ठरते. कारवीचा बहर ओसरला की फुले मरतात आणि बिया तयार होतात. पुढच्या पावसाळ्यात बियांवर पाणी पडले की त्या तडकतात आणि वार्याने त्या दूर जाऊन रुजतात. अशा प्रकारे दुसरे चक्र सुरू होते. सह्याद्रीमध्ये कारवीच्या जवळपास दहा जाती बघायला मिळतात. त्या निरनिराळ्या जागी आणि निरनिराळ्या वेळी फुलतात. त्यामुळेच या दिवसातले हे वैभव आवर्जून बघायला हवे.
कारवीबरोबर सध्या डोंगरउतारांवर सोनकीदेखील बहरली आहे. Nature blooming साधारणपणे गुडघाभर उंचीच्या या पिवळी फुले मिरवणार्या वनस्पतीचे सौंदर्यही याच काळात मोहवून टाकते. ऐन भराच्या काळात डोंगर सोनकीच्या फुलांनी भरलेले दिसतात. खेरीज गुलाबी फुले असणारा तेरडाही फार सुंदर दिसतो. तेरडा आणि सोनकी साधारणपणे एकाच प्रदेशात आढळत असून या दोन वनस्पती जवळजवळ फुलत असल्यामुळे मनोहारी रंगसंगती बघायला मिळते. पिवळी सोनकी आणि गुलाबी तेरडा दृष्टी सुखावून जातो. अर्थातच हे निसर्गसौंदर्य बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी बघायला मिळते. काससारख्या काही भागांना भेट देणार्या पर्यटकांचा ओघ रोखण्यासाठी काही अप्रिय निर्णय घ्यावे लागल्याच्या बातम्याही आपण वाचतो. मात्र माझ्या मते, रानवनस्पती वा रानफुलांवर पर्यटनाचा फारसा परिणाम होत नाही. कारण तुडवल्यामुळे वा पर्यटकांच्या वाढत्या वावरामुळे वनस्पतींचे नुकसान होत नाही. इतकेच नव्हे, तर लहान मुलांनी फुलांचे गुच्छ तोडून घेतले तरी फारसे नुकसान होत नाही. याचे कारण ही फुले प्रचंड संख्येने आणि विविध भागांमध्ये फुलत असतात.
Nature blooming : एका कास पठाराबाबत बोलायचे तर तिथे ठरावीक दिवशीच लोक गर्दी करतात. खेरीज ठरावीक काळात फुललेला बहर बघण्यासाठी तिथे भेट देणार्यांची संख्या अधिक असते. मात्र प्रत्यक्षात पावसानंतरच नव्हे तर अगदी पहिल्या पावसापासून एप्रिल महिन्यापर्यंत हे पठार फुलत असते. फक्त त्यातील डोळ्यांना दिसणारा पूर्ण बहर पाऊस थांबल्यानंतर खर्या अर्थाने जाणवतो. निसर्गातील सौंदर्य शोधण्याची दृष्टी असणार्यांना तो उमगतो. मात्र, केवळ याच दिवसांमध्ये नव्हे तर कधीही या पठारावरील देखणेपण आकर्षित करत असते. रंगीबेरंगी फुलांनी भरलेली पठारे दिसत नसल्यामुळे आता कासला गर्दी नाही. पण म्हणून आता तिथे फुले नाहीत, असा त्याचा अर्थ होत नाही. तिथे 175 जातीच्या वनस्पती असल्याची नोंद आहे. अर्थातच आधी उल्लेख केल्याप्रमाणे ती वेगवेगळ्या वेळी फुलतात. उदाहरण द्यायचे तर इथे टोपली कारवी फुलते तेव्हा संपूर्ण पठारावर टोपल्या उलट्या टाकल्यासारखे दिसते. तिचे झुपके सर्वदूर दिसतात आणि संपूर्ण पठारावर या फुलांची निळाई पसरते. हे वैशिष्ट्यदेखील लक्षात घेण्यासारखे आहे.
सध्या दिवाळीनंतर वा एकूणच थंडीच्या हंगामात पर्यटनासाठी बाहेर पडणार्यांची मोठी संख्या असते. निसर्गप्रेमी दर्याखोर्यांमध्ये मनसोक्त भटकतात. या सगळ्यांनी भटकंतीत निसर्गाची हानी न करण्याची सगळी पथ्ये पाळायलाच हवीत. वनस्पती वाळायला लागण्यास सुरुवात होत असल्यामुळे एखादी जळकी काडी पडली तरी आग लागू शकते. यामुळे वनस्पतींचे फारसे नुकसान होत नाही, पण चरणार्या गुरांना फटका बसतो, हे लक्षात घ्यायला हवे. पठारावर फुलणारी कोणतीही वनस्पती बघितली तर त्यावर शेकडो बिया येत असतात. त्यातील निम्मी फुले तोडून नेली वा उपद्रवामुळे नाहीशी झाली तरी प्रचंड संख्येने बिया असल्यामुळे त्या वनस्पतीच्या अस्तित्वाला कोणताही धोका उत्पन्न होत नाही. मुळात बियांचा उद्देश नवीन वनस्पती उगवावी एवढाच नसून त्या किड्यांनी, पक्ष्यांनी वा बुरशीने खाव्यात, हेदेखील कारण असते. म्हणूनच तयार होणार्या एकूण बियांपैकी केवळ दहा टक्के नवीन झुडपे निर्माण होण्यासाठी उपयोगात येतात. उरलेल्या 90 टक्के बिया निसर्गातील घटकांसाठीच असतात.
या वनस्पतींची मुळे जमिनीत दडलेली असतात. काही वनस्पतींना कांद्यासारखे तर काहींना बटाट्यासारखे कंद असतात. त्यामुळे वनस्पती तोडली, जाळली तरी जमिनीतील मुळांना कोणत्याही प्रकारे हानी पोहोचत नाही. उलटपक्षी, एखाद्या वनस्पतीचा हंगाम संपल्यानंतर स्थानिकांकडून शुष्क भाग पेटवण्यास उशीर झाला वा वणवा लागला नाही तर दुसर्या वनस्पतींच्या फुलण्याचा काळ अगदी महिनाभरही पुढे गेलेला दिसतो. दुसरा मुद्दा म्हणजे आधी उल्लेख केल्याप्रमाणे वनस्पतींवर फुलणारी पाने आणि फुले गुरांनी खाण्यासाठीच असतात. गुरांनी चरण्यासाठी ती अत्यंत उपयोगी असतात. किंबहुना, विशिष्ट प्रकारच्या वनस्पतींची पाने आणि फुले खाल्ल्यामुळे गाई-म्हशींच्या दुधाचे प्रमाण वाढते. हे ठाऊक असल्यामुळे स्थानिक मंडळी गुरांना अशा वनस्पती मुबलक प्रमाणात उपलब्ध असणार्या ठिकाणी चरण्यास नेतात. त्यामुळेच पठारांवरील वनस्पती संपदा जतन करण्यासाठी तिथे गुरांच्या चरण्यास बंदी आणण्यासारखे प्रकार अयोग्य आहेत, असे माझे स्पष्ट मत आहे. कारण यामुळे Nature blooming निसर्गचक्रच बदलून जातो. मानवाच्या या हस्तक्षेपामुळे तणवनस्पती वाढू लागतात आणि नैसर्गिक समतोल ढासळू लागतो. त्यामुळेच पठारांवर कुंपण घालणे, पर्यटकांना तिथे येण्यास मज्जाव करणे यासारखे प्रकार चुकीचे आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
खेरीज इथे आपण विचार करायला हवा की, म्हशीच्या वा गाई-बैलाच्या पायांचे वजन कितीतरी जास्त असते. त्या तुलनेत माणसाच्या पावलांचे वा अगदी गाडीचे वजनही त्यापेक्षा कमीच असते. त्यामुळेच माणसाने त्या परिसरात चालण्याचा वा तुडवण्याचा कोणताही चुकीचा परिणाम कोणत्याही पठारावर होत नाही. हे सगळे निसर्गचक्राप्रमाणेच अव्याहत सुरू राहते. अर्थात पर्यटकांनी हवे तसे वर्तन करावे, असा याचा अर्थ होत नाही. त्यांची मानसिकता Nature blooming निसर्गस्नेहीच असायला हवी. त्यांनी तिथे प्लॅस्टिक कचरा वाढवणे, अयोग्य वागणुकीतून निसर्गाला हानी पोहोचविणे अजिबातच अपेक्षित नाही. अशा कोणत्याही ठिकाणी फिरायला गेल्यानंतर लोकांनी सर्वप्रथम तेथील निसर्गसौंदर्याचा मान राखायला हवा. कारण हेच तेथील महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असते. कासचा विचार केला तर दुर्मिळ वनस्पतींप्रमाणेच अफाट निसर्गसौंदर्यामुळेच या भागाला युनेस्कोचे हेरिटेज स्टेटस मिळाले आहे. म्हणूनच त्याची कदर करणे ही आपली जबाबदारी आहे.
आताचा हा हंगाम पुढील दोन-तीन महिने सुरू राहील. या काळात वनस्पतींबरोबर पक्षी निरीक्षणदेखील विशेष आनंद देऊन जाते. आता आपल्याकडे स्थलांतरित पक्षी येण्यास सुरुवात झाली आहे. आपल्याकडे येणार्या या पक्ष्यांचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे उत्तर भारतातून इथे आलेले स्थानिक स्थलांतरित पक्षी असतात तर दुसरे खंडांतर करून आलेले पक्षी असतात. या पक्ष्यांचा मुक्काम काही दिवसांसाठीच असतो. प्रामुख्याने मुबलक प्रमाणात बिया, किडे असणार्या भागात त्यांचा संचार आणि मुक्काम असतो. त्यामुळेच या भागांमध्ये त्यांना पाहण्याची तसेच निरीक्षण आणि अभ्यासाची संधी खूप मोठ्या प्रमाणात असते. इच्छुकांनी ती साधायलाच हवी.