भय इथले संपत नाही...!

    दिनांक :19-Nov-2023
Total Views |
विश्वसंचार
- मल्हार कृष्ण गोखले
काळ हा आपल्या ठरलेल्या गतीने चालतच असतो. तो कुणासाठी थांबत नाही की थबकत नाही. historical events आज उगवलेला ताजा दिवस उद्या जुना होऊन इतिहासात दाखल होतो. अखंड पुढे सरकणार्‍या या काळासोबतच मानवी जीवन, त्यातल्या घटना घडत राहतात. जन्म-मृत्यू, उत्कर्ष-अपकर्ष, उत्थान-पतन. इतिहास घडतच असतो, घडतच राहतो. पण इथूनच वादाला किंवा विचार विविधतेला सुरुवात होते. पाश्चिमात्य चिंतन म्हणतं की, इतिहास किंवा एकंदरीतच मानवी जीवन हे एखाद्या बाणाप्रमाणे सरळ रेषेत जातं. हा बाण कुठून सुटलाय आणि अखेर तो कुठे पोहोचणार आहे, हे माहीत नाही. पौर्वात्य किंवा हिंदू चिंतन म्हणतं की, नुसतं मानवीच नव्हे, तर एकंदर चराचर सृष्टीचंच जीवन हे चक्राकार गतीने चालतं. नुसता जन्म आणि मृत्यू नव्हे, तर जन्म-मृत्यू-पुन्हा जन्म; उत्थान-पतन-पुन्हा उत्थान; उत्कर्ष-अपकर्ष-पुन्हा उत्कर्ष असं हे चक्र अखंड चालूच असतं. त्याला रहाटगाडग्याची अतिशय सार्थ उपमा देण्यात आलेली आहे.
 
 
historical events
 
म्हणजेच इथे मुद्दा येतो historical events इतिहासातल्या घटनांचा अर्थ लावण्याचा, इंटरप्रिटेशन करण्याचा. आणि हे इंटरप्रिटेशन, हे योग्य अर्थ लावणं हे व्यक्ती, राज्य, राष्ट्र, धर्म, पक्ष यानुसार बदलतं. युरोपात वेगवेगळे राजे, सरदार, पोप मंडळी, त्यांच्या राजवटी, त्यांचे संघर्ष यांच्या हकिकती म्हणजेच इतिहास, अशी पारंपरिक रूढ समजूत होती. कार्ल मार्क्सने या समजुतीला हादरा देत आर्थिक दृष्टिकोनातून इतिहासाची नवी मांडणी केली. अवघं पश्चिमी विचारविश्व थक्क होऊन गेलं. नंतर सिग्मंड फ्रॉईड या मानसशास्त्रज्ञाने दुसरा थारेपालटी धक्का दिला. संपूर्ण मानवी वर्तन हे ‘काम’ या भावनेतून निर्माण होतं, नियंत्रित होतं. अशी मांडणी करून त्याने इतिहास मांडणीचा एक वेगळाच पैलू जगासमोर ठेवला. कार्ल युंग हा फ्रॉईडचा मित्र, शिष्य आणि वारसदार होता. त्याने आपली वेगळी मांडणी करून असं सिद्ध केलं की, कामभावनेपेक्षा अधिकार गाजवण्याची लालसा ही मोठी असते आणि तीच मानवी वर्तणूक घडवते, नियंत्रित करते. आपण जर मार्क्स, फ्रॉईड आणि युंग या तिघांचंही प्रतिपादन वाचलं तर आपल्याला तिघांचंही म्हणणं पटतं. धनसंपत्ती, काम आणि अधिकार गाजवण्याची इच्छा या सगळ्याच गोष्टी मानवी जीवनावर प्रभाव गाजवताना दिसतात आणि त्यातूनच इतिहास घडतो. मग इतिहासाचा कोणता अन्वयार्थ, कोणतं इंटरप्रिटेशन खरं मानायचं?
 
 
12 मे 1666 या दिवशी शिवाजी महाराज आग्र्याला औरंगजेबाच्या दरबारात गेले. त्यांनी औरंगजेबाला नजराणा दिला आणि त्रिवार मुजरा केला. मग औरंगजेबाच्या कैदेतून सुटका करून घेत ते 12 सप्टेंबर 1666 या दिवशी हिंदवी स्वराज्यात परतले. परंतु पुन्हा युद्ध सुरू न करता त्यांनी 3 एप्रिल 1667 या दिवशी पुरंदरचा तह म्हणजेच शरणागतीचा करार कायम केला. त्याबद्दल औरंगजेबाने त्यांना दख्खनचा सुभेदार शहाजादा मुअब्जम याच्यामार्फत खुशीपत्र पाठवून ‘राजा’ हा किताब दिला. त्या पत्राची तारीख आहे 9 मार्च 1668. historical events आता या सगळ्या घटनाक्रमाचा अन्वयार्थ- इंटरप्रिटेशन कसा लावायचा, हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. पण डावे विचारवंत तो अन्वयार्थ कसा लावतात माहित्येय? ‘देव-देश-धर्म यांचे वैरी असणार्‍या सुलतानांसमोर मस्तक झुकवणार नाही, अशी प्रतिज्ञा केली होती ना तुमच्या शिवाजी महाराजांनी? मग कसा मुजरा केला औरंगजेबाला? आणि कैदेत पडावं लागलं तरी पुन्हा नामुष्कीचा तह कायम केला? आणि छत्रपती म्हणून स्वतःला राज्याभिषेक करवून घेण्यापूर्वीच त्यांना औरंगजेबाने राजा ही पदवी दिली होती. मग कशाला राज्याभिषेक केला?’ आता या अन्वयार्थाला, या युक्तिवादाला काय म्हणणार? विचारवंतांचा आचरटपणा? नव्हे, हा आचरटपणा नाही, ही चक्क लबाडी आहे. शिवाजी महाराजाचं मोठेपण त्यांना मान्यच करायचं नाहीये. ही लबाडी, हा ‘इंटेलेक्चुअल’ अहंकार किंवा घमेंड ही अलिकडच्या डाव्या विचारवंतांचीच मिरासदारी आहे, असंही नव्हे. प्राचीन भारतीय साहित्यातही याची उदाहरणं आहेत. द्वारकेत आलेल्या मारुतीला यादव म्हणतात, ‘‘बायको रावणाने पळवून नेली म्हणून वृक्ष-पाषणांना मिठ्या मारून मुळुमुळु रडणारा तो दाशरथी राम तुझा स्वामी ना? तो कसला महाधनुर्धर? आम्हाला नको त्याचं कौतुक सांगू.’’ युद्धाअगोदर शेवटचा प्रयत्न म्हणून शिष्टाईसाठी कृष्ण पांडवांचा दूत म्हणून कौरवांकडे जातो. दुर्योधन त्याच्या स्वागतासाठी जंगी मेजवानी ठरवतो. कृष्ण त्याला नकार देऊन विदुराकडे भोजनाला जातो. तेव्हा संतापलेला दुर्योधन त्याला म्हणतो, ‘‘गोकुळातल्या गवळ्यांच्या घरचं दही-दूध लोणी चोेरून खाणारा चोर तू. तुला आम्हा राजेलोकांचं अन्न कसं आवडणार? तू त्या दासीपुत्र विदुराघरीच जेव.’’ रामाने वृक्ष-पाषाणांना मिठ्या मारून शोक करणं आणि कृष्णाने दही-दूध चोरणं या घटनांचं इंटरप्रिटेशन, ते करणार्‍यांच्या सोयीनुसार कसं बदललं पहा. मारुतीच्या थपडेने थोबाड फुटल्यावर यादवांनी आणि कृष्णाच्या विराट शक्तीच्या दर्शनानंतर दुर्योधनाने, पुन्हा आपापलं इंटरप्रिटेशन बदललं, ही पुढची आणखीनच गंमत.
 
 
महाराष्ट्राच्या वर्तमान historical events इतिहासातसुद्धा आपल्याला या अन्वयार्थ वैचित्र्याची गंमत बघायला मिळते. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना बरोबर घेऊन सरकार बनवलं. काही काळाने त्यांनी अजित पवार यांना बरोबर घेऊन सरकार बळकट बनवलं. आता वेगवेगळे गट या घटनाक्रमाचा अन्वयार्थ कसा लावतात पहा- एक गट उबाठा सरकार गेलं आणि एकनाथ शिंद्यांसारखा निष्ठावंत फुटला म्हणून दुःखी आहे. फडणवीसांनी हे घडवून आणलं म्हणून त्यांच्यावर संतप्त आहे. दुसरा गट शरद पवारांचं घरच फुटलं म्हणून दुःखी आणि फडणवीसांवर संतप्त आहे. तिसरा गट वेगळ्याच दुःखात आहे. कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणारे, तुरुंगाची हवा खाऊन आलेले लोक फडणवीसांनी बरोबर घेऊन महाराष्ट्राच्या ‘शुचिर्भूत’ राजकारणाला अवकळा आणली म्हणूून ते नाराज आहेत. चौथ्या गटातल्या लोकांना राजकीय युद्धनीती समजते. ते म्हणतात. अरे, प्रतिस्पर्धी पक्षांचे दोन मोठे सेनापतीच फोडून त्यांना आपल्याकडे वळवून आणि त्यायोगे त्या पक्षनेत्यांना पार नबळे (दुबळेपेक्षाही नबळे हा शब्द जास्त टोचतो) करून टाकून फडणवीसांनी भलतंच जबरदस्त राजकारण साधलं आहे. पाचव्या गटातल्या लोकांना आंतरराष्ट्रीय राजकारण समजतं. (म्हणजे आपल्याला समजतं, असं त्यांना स्वतःला वाटतं.) ते म्हणतात, उबाठा हे काही कामाचे नाहीत असं पाहिल्यावर स्वतः शरद पवारांनीच हा सगळा बनाव घडवून आणून सरकार चालू ठेवलं आहे. अगदी रोज आपल्या समोर घडणार्‍या घटनांची, किती ही इंटरप्रिटेशन्स! यातलं कुठलं खरं, हे 2024 च्या निवडणुकांनंतर कळेल.
 
 
असो. तर historical events इतिहासाचा आर्थिक अन्वयार्थ, कामुक अन्वयार्थ, अधिकार गाजवण्याच्या हौशीचा अन्वयार्थ यानंतर आता भीतीचा अन्वयार्थ मांडण्यात आलेला आहे. लंडनच्या रॉयल हिस्टॉरिकल सोसायटीचा एक विद्वान रॉबर्ट पेकहॅम याने ‘फिअर : अ‍ॅन आल्टर्नेटिव्ह हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड’ या साडेचारशे पानी ग्रंथाद्वारे विविध प्रकारच्या भयांमुळे इतिहास कसा घडत गेला, याचं विवेचन केलं आहे. लिहिणारा माणूस हा युरेपियन ख्रिश्चन आहे म्हटल्यावर तो सर्वात प्रथम चेटकिणींचा संहार या विषयावर उतरणार, हे ओघानेच आलं.
 
 
इसवी सन 1450 साली युरोपीय ख्रिश्चन लोकांचे जे सर्वोच्च धर्मगुरू पोप महाशय त्यांना अचानक साक्षात्कार झाला की, युरोप खंडात सर्वत्र जे साथीचे रोग, बालमृत्यू, दुष्काळ, लढाया इत्यादी संकटांमुळे लोक मरत आहेत त्यासाठी चेटूक, जारण-मारण, जादू इत्यादी काळ्या तांत्रिक विद्या आहेत. या गोष्टी चेटकिणी करतात. झालं. आले पोपच्या मना तिथे कुणाचे चालेना! पोप महाशयांनी आदेश दिला, चेटकिणींना जाळून ठार मारा. सन 1450 ते 1750 या 300 वर्षांच्या काळात युरोपभरात किमान 35 हजार ते 50 हजार चेटकिणींना जाळून मारण्यात आलं. त्या खरोखरच चेटूक करीत होत्या का? यापैकी बहुसंख्य स्त्रिया निरपराध होत्या. त्या म्हातार्‍या होत्या, जवळचं असं कुणीच नसल्यामुळे एकट्या राहात होत्या, गरीब होत्या आणि कदाचित या सर्वच कारणांनी दिसायला ओंगळ दिसत होत्या. हाच त्यांचा अपराध ठरला. त्यांना जाळणार्‍या लोकांना हे जाणवलं नसेल असं नव्हे, पण रोगराईची भीती जास्त प्रबळ ठरली. 50 हजार वृद्ध स्त्रियांना चेटकिणी ठरवून ठार मारणं, हा युरोपच्या कथित प्रागतिक इतिहासातला मोठाच काळा डाग आहे.
 
 
historical events : या अगोदर म्हणजे 14 व्या शतकाच्या मध्यावर युरोप आणि युरोपलगतचा आशिया खंड या भागावर ‘ब्लॅक डेथ’चं भयानक संकट कोसळलं होतं. सन 1346 ते 1363 या काळात ब्लॅक डेथ किंवा आजच्या वैज्ञानिक भाषेत ब्युथॉनिक प्लेग या रोगाने किमान 20 कोटी माणसं मेली. कमालीच्या भयभीत झालेल्या युरोपीय समाजात कुणीतरी अफवा सोडली. हे सगळं ज्यू लोक, फेरीवाले आणि परदेशी प्रवासी यांच्यामुळे होत आहे. झालं. घाबरलेल्या लोकांनी मिळतील त्या नि तेवढ्या ज्यूंना, फेरीवाल्यांना, परदेशी लोकांना जाळून मारलं. सगळ्यात भीषण कत्तल म्हणजे जर्मनीतल्या स्ट्रासबर्गच्या बिशपने संपूर्ण स्ट्रासबर्ग शहरातल्या काही हजार ज्यूंना जाळून मारलं. हे सगळं खरंच भीतीमुळे झालं का? मग ज्या ज्यूंनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला त्यांना आणि तरुण नि सुंदर बायांना वेचून बाजूला काढण्यात आलं, ते का?
 
 
लेखक रॉबर्ट पेकहॅम कोरोना महामारी कालखंडात हाँगकाँगमध्ये होता. त्यामुळे समाजातल्या सामुदायिक भीतीचा उपयोग धूर्त राजकारणी लोक कसे स्वार्थासाठी करतात, तेही त्याला बघायला मिळालं. चीनच्या मध्यवर्ती सरकार विरोधात हाँगकाँगमध्ये जनमत हळूहळू संघटित होऊ लागलं होतं. कोरोना महामारीच्या भयाचा उपयोग करून चीन सरकारने त्या आंदोलनातली हवाच काढून टाकली.
 
 
historical events : 1989 साली इराणच्या अयातुल्ला खोमेनीने लेखक सलमान रश्दीला ठार करण्याचा फतवा जारी केला. या घटनेला 33 वर्षे उलटल्यावर म्हणजे 2022 साली एका अतिरेक्याने न्यूयॉर्कमध्ये रश्दीवर सुरीहल्ला केला. रश्दी बचावला. पण 2015 मध्ये चार्ली हेब्दो या फ्रेंच वृत्तपत्रातले पत्रकार असे सुदैवी ठरले नाहीत. प्रेषिताची टिंगल केली म्हणून दोन अतिरेकी मुसलमानांनी चार्ली हेब्दोच्या कार्यालयात घुसून 12 पत्रकारांना ठार मारलं. या भीतीने जगभरचे सगळे पत्रकार, लेखक, विनोदकार कुणाचीही थट्टा करताना बिचकतात. पण लेखकाला याचंही आश्चर्य वाटतं की, जनमानस किती पटकन विसरतं. रशियातल्या किमान 2 कोटी लोकांना ठार मारणार्‍या स्टॅलिनच्या पाशवी राजवटीचा आजच्या तरुण रशियन पिढीला पार विसर पडला आहे.
 
- 7208555458 
(लेखक प्रसिद्ध स्तंभलेखक आहेत.)