नागपूर-पुणे सुपरफास्ट सुरु

20 Nov 2023 10:29:12
नागपूर,
Nagpur-Pune Superfast प्रवाशांची गर्दी वाढल्याने मध्य रेल्वेने नागपूर ते पुणे ही विशेष वन वे स्पेशल सुपरफास्ट एक्स्प्रेस सुरू केली आहे. रविवारपासून या गाडीला सुरुवात झाल्याने अनेक प्रवाशांनी दिलासा व्यक्त केला आहे. या गाडीमुळे प्रवाशांना आरामदायक प्रवास करता येत आहे. दिवाळी दरम्यानच्या 8 दिवसात नागपूर पुणे - कोल्हापूर आणि नागपूर - मुंबई मार्गावर प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसून आली. दिवाळीचा पाडवा झाला तरी या मार्गावरची गर्दी कायम असल्याने मध्य रेल्वेला एकेरी रेल्वे सुरु करण्याशिवाय पर्याय नव्हता.


Nagpur-Pune Superfast 
 
ट्रॅव्हल्सचे दर वाढले
सर्वच मार्गावर प्रवासी संख्या वाढल्याने विमानाचे प्रवास भाडे वाढले आहे. खाजगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी सुध्दा दर वाढविले आहे. खासगी बस संचालकांनी विमानाच्या भाड्याशी स्पर्धा सुरु केली आहे. नागपूर ते पुणे मार्गावर धावणार्‍या सर्व रेल्वेगाडयांमध्ये आरक्षण फुल्ल असल्याने कोणत्याच ट्रेनमध्ये जागा शिल्लक नाही. Nagpur-Pune Superfast त्यामुळे आता एसटी महामंडळाच्या बसेमध्ये सुध्दा गर्दी वाढली आहे. खाजगी बसपेक्षा एसटीचे प्रवास भाडे कमी असल्याने एसटीतून प्रवास करणारे प्रवासी वाढले आहे. एसटी महामंडळाने नागपूर - पुणे मार्गावर 8 बसेस सुरू केल्या आहेत. बहुतांश प्रवाशांनी आरक्षण (अ‍ॅडव्हान्स बुकिंग) करून ठेवल्याने एकाही बसमध्ये जागा उपलब्ध नाही. येत्या दोन दिवसात ही परिस्थिती पूर्ववत होण्याची शक्यता एसटी महामंडळाने व्यक्त केली आहे.

रविवारपासून गाडी सुरू
मुख्यत: मध्य रेल्वेने नागपूर - पुणे वन वे स्पेशल सुपरफास्ट ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांचा प्रवास सुखकर झाला आहे. रविवारपासून ही गाडी सुरू झाल्याने 01166 क्रमांकाची या गाडीत गर्दीच गर्दी होती. नागपूर रेल्वेस्थानकावरून ही गाडी रविवारी रात्री 9.30 वाजता सुटेल्यानंतर दुसर्‍या दिवशी दुपारी 12.10 वाजता ती पुण्यात पोहोचेल. या गाडीला एकूण 22 कोच आहे. त्यात 11 कोच एसी टू टियर, 9 कोच एसी थ्री टियर आणि 2 जनरेटर व्हॅनचा समावेश आहे.
या स्थानकांवर गाडी थांबणार
नागपूर - पुणे रेल्वे मार्गावर असलेल्या अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर आणि दौंड मार्ग या रेल्वे स्थानकांवर ही गाडी थांबणार आहे.ही गाडी कधीपर्यंत चालविली जाणार आहे, हे मध्य रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले नाही. ही गाडी दिवाळीच्या 8 दिवसांपूर्वी सुरू करण्याची गरज होती. गर्दीतून प्रवास करीत असलेल्या प्रवाशांना यामुळे आरामात प्रवास करता आला असता. याशिवाय रेल्वेला अतिरिक्त महसूल मिळाला असता.
Powered By Sangraha 9.0