वेध
- अभिजित लिखिते
Sanatan economy सनातन अर्थव्यवस्था मजबूत होत आहे. हा केवळ दावा नाही, तर ही बाब कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स अर्थात् कॅटने अलिकडेच दिलेल्या आकडेवारीतून सिद्ध झाली आहे. भारत उत्सवप्रिय आहे. सण-उत्सवांत देशातील नागरिक मोठ्या उत्साहात खरेदी करतात. त्याची मदत आर्थिक चक्र फिरण्यासाठी मिळते. मुळात सनातन अर्थव्यवस्था म्हणजे काय, असा प्रश्न उपस्थित होतो. या मंदिरांभोवती फिरणारे अर्थचक्र, सण-उत्सवांच्या काळात झालेली सर्व प्रकारची खरेदी, धार्मिक पर्यटनासारखे कितीतरी प्रकार या सनातन अर्थव्यवस्थेत येतात. देशात सनातन अर्थव्यवस्था वर्षाला 25 हजार कोटी रुपयांच्या वर व्यवसाय करीत आहे.
अॅडम स्मिथला आधुनिक काळातील अर्थव्यवस्थेचा जनक समजले जाते. म्हणजे हा 1776 ते 1848 दरम्यानचा काळ. त्यापूर्वी अॅरिस्टॉटल, प्लेटो यांच्या विचारांचा समावेश होतो. आधुनिक आर्थिक विचारांचा काळ हा 16 व्या शतकापासून ते 20 व्या शतकांपर्यंत म्हणजे 500 वर्षांचा काळ आहे. मात्र, पाश्चात्त्यांनी ज्या काळात बाळबोध अर्थव्यवस्थेची मांडणी केली त्याच्या किती तरी पूर्वी म्हणजे इसवी सन पूर्व 350 मध्ये कौटिल्याने 25 खंड सहा हजार श्लोकांचा समावेश असलेला कौटिलीय अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला होता. मुळात अर्थशास्त्र हे एक सामाजिक विज्ञान आहे; जे वस्तू आणि सेवांचे उत्पादन, वितरण आणि वापर यावर लक्ष केंद्रित करते आणि व्यक्ती, व्यवसाय, सरकार आणि राष्ट्रे संसाधनांचे वाटप करण्यासाठी करतात, त्या निवडींचे विश्लेषण करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने अर्थव्यवस्था वेगवान करण्यासाठी धोरणांमध्ये कितीतरी सकारात्मक बदल केले आहेत. बदलांचा परिणाम आता दिसून येत आहे. त्यामुळेच जागतिक पातळीवर Sanatan economy भारतीय अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर पोहोचली. कोरोना काळात अनेक देशांची अर्थव्यवस्था डळमळीत झाली असताना भारतीय अर्थव्यवस्थेने या महामारीचा झटका सहन केला आणि रुळावरून घसरली नाही. अर्थशास्त्रात दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. त्यातील पहिली म्हणजे सरकारद्वारे पैसे गोळा करण्याची म्हणजे महसूल प्राप्त करण्याची पद्धत कोणती आहे आणि तो खर्च करण्याची पद्धत कोणती आहे. या दोन्ही गोष्टींमध्ये एक तत्त्व समान आहे. ते म्हणजे प्रामाणिकता. महसूल गोळा करताना तो कोणत्याही अपहाराविना सरकारी तिजोरीत पूर्णपणे पोहोचला पाहिजे. म्हणजे सरकारच्या तिजोरीत पोहोचेपर्यंत त्यात गळती लागायला नको. खर्च करताना विशेेषतः लोककल्याणकारी योजनांवर खर्च केला जातानाही शेवटच्या घटकाला तो पूर्णपणे मिळणे आवश्यक आहे. यात गळती लागते. मधल्यामधे गहाळ होतो, त्यावेळी त्याला काळ्या पैशांचे स्वरूप येते आणि हा काळा पैसा अर्थव्यवस्थेत फिरत नाही. कुठे तरी साचलेला असतो. तो पडून असतो.
मोदी सरकारने अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचाही सकारात्मक वापर केला. या कालावधीत डिजिटल क्षेत्रात पुढे आणण्यासाठी सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. डिजिटल रुपया, यूपीआय, आयुष्मान भारत यासारख्या अनेक योजनांची घोषणा केली. यात यूपीआयने सर्वांत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यूपीआय अर्थात् युनिफाईड पेमेंट इंटरफेसचा वापर जवळपास प्रत्येक जण करायला लागला आहे. अगदी एक रुपयापासून यूपीआयवर व्यवहार करणे शक्य होते. आतापर्यंत लहान-सहान व्यवसाय म्हणजे केवळ रोखीचेच असा समज होता. यूपीआयने तो पूर्णतः बदलला आहे. लहान व्यावसायिकांचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय आता यूपीआयच्या माध्यमातून होतो. ऑक्टोबर महिन्यापर्यंत देशात 1,414 यूपीआय व्यवहारांच्या माध्यमातून 17.16 लाख कोटी रुपयांची उलाढाल झाली. हा आकडा निश्चितच लहान नाही. अजूनही काही प्रमाणात रोखीनेच व्यवहार होतात. त्यामुळे लहान व्यापार्यांची नेमकी उलाढाल यापेक्षा कितीतरी जास्त आहे. 2016 मध्ये ही डिजिटल पेमेंट पद्धत लाँच करण्यात आली, त्यावेळी विरोधक कुत्सितपणाने हसले होते. सरकारने सुरुवातीला जनधन खात्यांच्या माध्यमातून गरिबांची खाती उघडली. त्यानंतर ही डिजिटल पेमेंट पद्धत लाँच केली होती. या यूपीआयचा आज विस्तारलेला आवाका पाहता विरोधकांचे दात घशात गेले आहेत. यूपीआय पेमेंटमध्ये अनेक देशांनी रुची दाखवली आहे.
देशाच्या वेगाने वाढणार्या अर्थव्यवस्थेत Sanatan economy सनातन अर्थव्यवस्थेचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. हे स्पष्ट करणारी आकडेवारी समोर आली आहे. ही अर्थव्यवस्था जितकी विस्तारत जाईल, तितके देशाच्या विकासातही योगदान राहील हे निश्चित आहे.
- 9028055141