सरबजोत, ईशा, दिव्या देणार आव्हान

    दिनांक :20-Nov-2023
Total Views |
दोहा,
ISSF World Cup : भारताचा सरबजोतसिंह पुरुष आणि ईशा सिंह व दिव्या टीएस महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत मंगळवारी येथे प्रतिष्ठेच्या आयएसएसएफ फायनलच्या पहिल्या दिवशी आव्हान देतील. या वार्षिक स्पर्धेत 12 सदस्यीय संघ भारताचे प्रतिनिधित्व करीत आहे. कोरोना महामारी दरम्यान आणि नंतर कार्यक्रमाशी संबंधित समस्यांमुळे चार वर्षांनी ही स्पर्धा आयोजित केली जात आहे.
 
ISSF World Cup
 
विश्वचषक फायनल ISSF World Cup ही 15 सर्वोच्च आंतरराष्ट्रीय नेमबाजांमधील शूट-आऊट स्पर्धा आहे आणि याचे आयोजन रायफल, पिस्तूल आणि शॉटगन श्रेणींतील 12 ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये केले जाते. लुसैल शुटींग रेंज येथे ही स्पर्धा होणार आहे. प्रशिक्षक समरेश जंग यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धापूर्व प्रशिक्षणानंतर सरबजोत म्हणाला, ‘ही एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे जी चार वर्षांनंतर आयोजित केली जात आहे जिथे वर्षातील सर्वोत्तम नेमबाज एकमेकांशी स्पर्धा करतात. त्यामुळे साहजिकच मला स्पर्धेत चांगली कामगिरी करायची आहे’.
 
 
सरबजोतला जागतिक क्रमवारीत अव्वल नेमबाज ISSF World Cup आणि टोकियो ऑलिम्पिकचा रौप्यपदक विजेता सर्बियाचा डॅमीर मिकेक, गतविजेता चीनचा बोवेन झेंग, तुर्कीचा अनुभवी इस्माईल केल्स आणि पाच वेळचा ऑलिम्पियन स्लोव्हाकियाचा जुराज तुझिन्स्की यांचे कडवे आव्हान असेल. महिलांच्या एअर पिस्तुलमध्ये ईशा आणि दिव्याला जागतिक क्रमवारीत अव्वल नेमबाज आणि रिओ ऑलिम्पिक चॅम्पियन ग्रीसची अ‍ॅना कोराकाकी, टोकियो ऑलिम्पिकची सुवर्णपदक विजेती आणि गतविजेती चीनची जियांग रेन्क्सिन आणि सर्बियाची अनुभवी झोरोना अरुनोविक या नेमबाजांचे आव्हान असेल. या स्पर्धेत 12 देशांचे 179 नेमबाज सहभागी होत आहेत.