कानोसा
- अमोल पुसदकर
भारत हे प्राचीन राष्ट्र आहे. माणूस हा समाजशील प्राणी आहे. त्यामुळे विविध उद्देशांकरिता लोकांना एकत्र येण्याची आवश्यकता ही सातत्याने भासत राहिलेली आहे. प्राचीन काळामध्ये देवांनीसुद्धा एकत्र येऊन काम केले आणि आसुरी शक्तींचा नायनाट करण्यासाठी, त्यांच्यावर विजय मिळविण्यासाठी त्यांनी प्रयास केले. त्यामुळेच त्यांचे ब्रीदवाक्य होते ‘आम्ही सोबत चालूया, सोबत बोलूया, आमचे मन एक असावे.’ समाजामध्ये अनेक चांगले उद्देश घेऊन अनेकानेक संघटना काम करताना दिसतात. भारतामध्ये अनेक संन्याशी संप्रदायाचे आखाडे आहेत. ते प्राचीन काळापासून काम करीत आहेत. परंतु या सर्वांनी जसे आपला प्रचार व प्रसार वाढविण्याचे कार्य केले तसेच त्यांच्यामध्ये आम्हीच सर्वश्रेष्ठ कसे, हे सांगण्याची चढाओढ लागली आणि यातूनच स्पर्धा निर्माण झाली, वितुष्ट निर्माण झाले आणि मग त्या दोघांमधून विस्तव जाईनासा झाला. अशी परिस्थिती अनेक ठिकाणी निर्माण झाली. भारतामध्ये अनेक organization संघटना, संस्था काम करतात. अनेक वेळा समाजाच्या विविध समस्यांवर आधारित त्यांचे कार्य असते. परंतु प्रत्येक वेळेस आमचे कार्य कसे श्रेष्ठ आहे.
आम्हीच खरे समाजसेवी कसे हे सांगण्याची चढाओढ त्यांच्यात लागलेली दिसते. अनेक वेळा एकाच organization संघटनेसाठी काम करणारे अनेक कार्यकर्ते असतात. त्यांच्यामध्ये त्या सर्वांचे ध्येय जरी एकच असले, तरी मीच या संस्थेचा एकनिष्ठ सेवक कसा आहे, मीच संस्थेच्या ध्येयधोरणाप्रमाणे कसा वागतो, हे इतरांना सांगण्याची स्पर्धा लागलेली असते. यातूनच मी कसा अधिक चांगला; इतर कसे तसे नाहीत, त्यांचे कुठे चुकते, हे सांगण्यामध्ये त्यांचा दिवस संपत नसतो. नुकतेच एका ठिकाणी अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या समविचारी संस्थांचे दिवाळी मिलन झाले. त्यामध्ये अशा सर्व कार्यकर्त्यांच्या समोर काहीतरी विचार चिंतन प्रकट व्हावे हा उद्देश होता. हे सर्वच कार्यकर्ते विविध हिंदुत्ववादी संघटनांचे किंवा सनातन धर्मासाठी काम करणार्या संस्थांचे कार्यकर्ते होते. या देशाचे स्वातंत्र्य, आपला धर्म, आपली जीवन पद्धती हे सर्व टिकवून ठेवण्यासाठी हजारो वर्षांपासून लाखो लोकांनी प्रयास केले आणि त्यामुळेच हे सर्व टिकून राहू शकले. आजही अशाच पद्धतीचा उद्देश घेऊन अनेक संस्था व संघटना कार्य करताना आपल्याला दिसतात. या संस्था-संघटना जरी एकाच उद्देशाने काम करताना दिसतात तरी प्रत्येकाची कार्यपद्धती वेगळी आहे.
प्रत्येकाचे कार्यकर्ते वेगळे आहेत आणि त्यांच्यामध्ये स्वतःच्या संघटनेबद्दलचा अभिनिवेशसुद्धा असतो. परंतु, अशा सर्व संघटनांचे कार्यकर्ते जर कधी ना कधी वर्षातून एकत्र आले, त्यांनी आपल्या सगळ्यांचे ध्येय काय आहे, आपण कशासाठी कार्य करतो आहोत याचा विचार केला. आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील, नगरातील असा कोणता भाग आहे की, ज्या भागांमध्ये कोणत्याही समविचारी संस्थेचे कार्य नाही याचा शोध घेतला तर सर्वच भागांमध्ये कोणत्या ना कोणत्या organization संघटनेचे कार्य पोहोचेल व त्यातून सनातन धर्माचे जे कार्य सुरू आहे त्याला बळकटी येऊ शकेल. बरेचदा असे दिसते की, एखाद्या विशिष्ट भागामध्ये जो भाग सुपीक समजला जातो अशाच भागामध्ये खूप सार्या संघटना काम करताना दिसतात. त्यामुळे कचरा कमी आणि झाडणारे जास्त अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होते. जेथे कोणाचेच काम नाही अशा ठिकाणी काही विधर्मी शक्ती जाऊन आपले पाय तर पसरवीत नाही ना हे बघितले पाहिजे. प्रत्येक संस्थेचा वर्षातून एखादा मोठा उत्सव किंवा कार्यक्रम असतो. त्याच वेळेला जर इतरांचे काही कार्यक्रम ठरलेले नसतील तर इतर सर्व संस्था त्या संस्थेच्या पदाधिकार्यांना तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लागणारी मदत, व्यवस्था, धनसंग्रह, कार्यकर्त्यांचा पुरवठा अशा अनेक कामांमध्ये मदत करू शकतात. यातून तो कार्यक्रम मोठा होईल व त्याचा समाजावर चांगला प्रभाव पडेल. अनेक वर्षांपूर्वी नागपूरमध्ये गायत्री परिवाराचा एक खूप मोठा यज्ञ आयोजित केला गेला होता. त्यावेळेस नागपुरातील अनेक स्वयंसेवी संघटनांनी या व्यवस्थेमध्ये आपले कार्यकर्ते पाठवून तो यज्ञ चांगल्या प्रमाणात साकार करून दाखविला होता. परस्पर समन्वयाचे हे उत्तम उदाहरण होते.
आता विविध राज्यातील निवडणुकांचे निकाल येणे सुरू होतील. निवडणुका आल्या म्हणजे काही ठरावीक राजकीय पक्ष समाजाला जातिपातीमध्ये विभागून आपले राजकारण करण्याचे काम करतात. पाच वर्ष स्वतःच्या जातीकरिता कुठलेही काम न करणारा नेता हा रातोरात त्या जातीचा एकमात्र नेता होऊन जातो. मी अमुक जातीचा आहे म्हणून या जातीतील सर्वच लोकांनी मला मतदान केले पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका घेतो. अशा परिस्थितीमध्ये राजकीय पक्षांचे काम करणार्या कार्यकर्त्यांमध्ये अनेक वेळा दुही माजल्याचे दिसून येते. मागच्या एका लोकसभा निवडणुकीमध्ये असेच चित्र पाहायला मिळाले. एका नेत्याने केलेले जातीय आवाहन इतर सर्वच पक्षांमध्ये काम करणार्या कार्यकर्त्यांना भावले व परस्परांचा राजकीय विरोध बाजूला ठेवून केवळ आपल्या जातीसाठी एकत्र आल्याचे दिसले. लोकशाही, विकास, पक्षनिष्ठा, पक्षाची ध्येयधोरणे इत्यादी सर्वच गोष्टी मग गौण झाल्या.
वर्षानुवर्षे काम करणारे शेकडो कार्यकर्ते जर अशा एका जातीय आवाहनाला बळी पडून रातोरात पक्षाच्या विरुद्ध काम करायला तयार होत असतील तर ही निश्चितच चिंतेची बाब आहे. यासाठी कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण व त्यांच्या पक्केपणावर भर दिला गेला पाहिजे. असे चित्र निर्माण होणे हे कुठल्याही राजकीय पक्षाकरिता धोक्याचेच आहे. संस्था सामाजिक असो किंवा राजकीय; त्या संस्थेकरिता काम करणारा जो कार्यकर्ता आहे या कार्यकर्त्याला त्या संस्थेचे ध्येय, उद्दिष्ट, कार्यप्रणाली व्यवस्थित माहिती असावी व त्याचे तो पालन करणारा असला पाहिजे. असे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये योग्य समन्वय असणे आवश्यक आहे. अनेक संस्थांमध्ये वर्षानुवर्षे काम करणारे कार्यकर्ते असतात. अनेक वेळा नवीन लोकांना संधी म्हणून नवीन लोकांना जबाबदारी दिली जाते. परंतु जे जुने कार्यकर्ते आहेत ज्यांना कार्यपद्धतीची माहिती आहे, ज्यांची निष्ठा वादातीत आहे, अशा जुन्या कार्यकर्त्यांना योग्य काम दिले गेले पाहिजे व त्यांच्याशी समन्वय साधला गेला पाहिजे. ‘गरज सरो व वैद्य मरो’ अशा पद्धतीची भूमिका नसावी. सर्वच कार्यकर्ते नवीन असतील तर ती organization संघटना जुन्या लोकांच्या तपश्चर्येवर कशी उभी झाली हे त्यांना माहिती राहणार नाही व त्याची त्यांना किंमतही राहणार नाही. त्यामुळे समन्वय साधला जाणार नाही व संस्था-संघटना मोठी होऊ शकणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. थोडक्यात काय तर समन्वय हा शरीर, मन, बुद्धी, संस्था, संघटना सर्वांसाठीच आवश्यक आहे.
- 9552535813
(लेखक प्रसिद्ध वक्ते, सामाजिक व राजकीय विचारक आहेत.)