तभा वृत्तसेवा
कारंजा (घा.),
Ashti Bazar Samiti : आष्टी व कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विभाजनाच्या हालचालीला सुरुवात झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आष्टी बाजार समिती काँग्रेस गटाचे सत्ता असल्याने सत्ताधार्याच्या पायाखालची वाळू घसरली आहे. आष्टी व कारंजा तालुक्यातील शेतमाल विक्रीच्या सोयीकरिता 3 जुलै 1975 मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती आष्टी स्थापना करण्यात आली. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात आष्टी तालुक्यातील 158 गावे असून त्यापैकी 70 रीठ आहे. कारंजा तालुक्यातील 121 गावे असून 18 गावे रीठ आहेत. दोन तालुका मिळून बाजार समिती असलेल्या आष्टी कृषी उत्पन्न बाजार समिती विभाजन करण्याच्या हालचालीला वेग आला आहे. आष्टी बाजार समितीचे विभाजन केल्यास कारंजा तालुक्यातील शेतकर्यांना वाहतूक खर्च कमी होईल. कारंजा व आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन होण्याची आवश्यकता निर्माण झाली असल्याचे आदेश संचालक मंडळाला प्राप्त झाले आहे.
आष्टी व Ashti Bazar Samiti कारंजा तालुक्यातील पेरणी क्षेत्र योग्य असून आष्टी तालुक्यात 1,52,000 क्विंटल उत्पन्न अपेक्षित आहे. कारंजा तालुक्यात 1,43,000 क्विंटल उत्पन्न अपेक्षित आहे. सद्यस्थितीत आष्टी-कारंजा बाजार समितीत होणारी सरासरी आवक लक्षात घेता दोन्ही बाजार समितीची आर्थिक परिस्थिती सक्षम राहील. एकत्रित बाजार समिती आस्थापना खर्च मागील वर्षी 48,31,131 एवढा असून विहित मर्यादित राहणार आहे. विभाजनानंतर हा खर्च दोन्ही बाजार समितीला प्रमाणात विभागला जाणार आहे. कारंजा बाजार समिती स्वतंत्र झाल्यास शेतकर्यांच्या अडीअडचणी कारंजा येथेच सोडविल्या जाणार असल्याने शेतमालाची आवकही अधिक वाढणार असून बाजार समिती स्वतंत्ररित्या सक्षम होण्यास पुरेसा वाव असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे.
कारंजा-आष्टी कृषी उत्पन्न बाजार समिती Ashti Bazar Samiti विभाजन करण्याचे आदेश देण्यात आले असून त्याबाबत नोटीस सभापती उपसभापती तसेच संचालक मंडळाला देण्यात आले आहे. याबाबत संचालक मंडळाला 30 दिवसाच्या आत अपील करण्याची तरतूद केल्याचे नोटीस मध्ये म्हटले आहे. 30 दिवसाच्या आत हरकती व सूचना जिल्हा उपनिबंधक कार्यालयास प्राप्त न झाल्यास तरतुदीनुसार विभाजन करण्यासंबंधी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल असे नोटीसमध्ये म्हटले आहे. कारंजा व आष्टी कृषी उत्पन्न बाजार समिती विभाजन सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना अनेकांना प्रशासक मंडळावर जाण्याची इच्छा व्यक्त केली जात आहे.
आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीवर पावणे दोन कोटीचे कर्ज असून या बाजार समितीचे विभाजन झाल्यास ते कर्ज कोण फेडणार हा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.