तभा वृत्तसेवा
अमरावती,
ShivPratishthan Hindustan : रिद्धपूर येथे 20 नोव्हेंबर रोजी गावातील एका समाजकंटकाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा फोटो समाजमाध्यमावर टाकल्यानंतर त्याचे पडसाद गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात उमटत आहे. गुरूवार 23 नोव्हेंबर रोजी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी राजकमल चौकात शिवरायाच्या मुर्तीला दुग्धाभिषेक करून समाजात तेढ निर्माण करणार्यांच्या मानसिकतेचा कडक शब्दात निषेध केला.
श्री शिवप्रतिष्ठानने ShivPratishthan Hindustan रिद्धपूर घटनेच्या अनुषंगाने बंदचे आवाहन केले होते. मात्र, पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सर्वांना विश्वासात घेऊन दोषी व्यक्तीवर कठोर कारवाईचे ठोस आश्वासन दिल्याने बंदचे आवाहन मागे घेण्यात आले. तरी देखील कित्येक दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने आपली प्रतिष्ठान जिहादी वृत्तींचा विरोध म्हणून बंद ठेवली होती. राजकमल चौकात महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करताना विविध हिंदुत्ववादी संघटनांचे प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते. शिवरायांचा गगनभेदी जयघोष यावेळी झाला. अॅड. प्रशांत देशपांडे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. हिंदुत्ववाद्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही त्यांनी दिली. त्यानंतर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहचले. तेथे जिल्हाधिकारी यांना निवेदन देत सर्व जिहादीवृत्तींचा बंदोबस्त करावा व पुन्हा कधी असे कृत्य अमरावती जिल्ह्यात होणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी केली.