फेकाफेकीशी दोन हात

26 Nov 2023 06:00:00
- दीपक शिकारपूर
 
ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ
तंत्रज्ञानातील वेगवान प्रगती भूषणावह आणि भविष्यातील कामांचे बदलते स्वरूप आणि प्रारूप दाखवून देणारी असली तरी त्याचा वाढता Technology Misuse गैरवापर किती घातक परिणाम देऊ शकतो, हे एक ना अनेक उदाहरणांवरून समोर येत आहे. अलिकडेच चर्चित प्रकरणे याची साक्ष देण्यास पुरेशी आहेत, असे म्हणावे लागेल. अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडीओ प्रकरणी दिल्ली पोलिसांनी बिहारमधील एका 19 वर्षीय तरुणाची चौकशी केली असली तरी हे प्रकरण एवढ्यावर संपत नाही कारण हे शांत होत नाही तोपर्यंत अभिनेत्री काजोलशी संबंधित एक व्हिडीओ इंटरनेटवर समोर आला. हा देखील तंत्रज्ञानाच्या मदतीने बदललेला व्हिडीओ असून डीपफेकचा नमुना आहे. या व्हिडीओ क्लिपमध्ये काजोलचा चेहरा असणारी एक महिला कॅमेर्‍यासमोर कपडे बदलताना दिसली. म्हणजेच व्हिडीओमध्ये तंत्रज्ञानाच्या साहाय्याने काजोलचा चेहरा अगदी बेमालूमपणे वापरण्यात आला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर अनेक युजर्सने तेच सत्य असल्याचे समजून प्रतिक्रिया नोंदवण्यास सुरुवात केली. मात्र तथ्य तपासणार्‍या वेबसाईटकडून सत्य बाहेर आले आणि अलिकडच्या या वाढत्या धोक्याचे गांभीर्य पुन्हा एकदा समोर आले. टूल्सच्या मदतीने या व्हिडीओमध्ये बदल करण्यात आल्याचे संकेतस्थळांचे म्हणणे आहे. यात विविध साधनांचा वापर करून, व्हिडीओमध्ये दुसर्‍याचा चेहरा टाकला जातो. यामुळे दिशाभूल करणारा मजकूर तयार होतो आणि लोक गोंधळून जातात. यामुळे प्रतिमाहनन होतेच, खेरीज संबंधितांना अनेक प्रकारच्या ताणांचा सामना करावा लागू शकतो. ही बाब एखाद्याचे कौटुंबिक, सामाजिक आयुष्य धोक्यात आणू शकते.
 
 
deepfake-video
 
वास्तविक, सोशल मीडियावरील अभिनेत्री काजोलशी संबंधित बहुचर्चित असणारा हा व्हिडीओ रोझी ब्रीन या महिलेचा असून गेट रेडी विथ मी ट्रेंडमध्ये सामील होण्यासाठी तिने या वर्षी 5 जून रोजी तो टिकटॉकवर पोस्ट केला होता. Technology Misuse मात्र तिच्या व्हिडीओशी छेडछाड करण्यात आली आणि रोझीच्या चेहर्‍याच्या जागी काजोलचा चेहरा लावण्यात आला. धोकादायक बाब म्हणजे डीपफेक प्रकाराचा त्रास पंतप्रधान मोदींनाही सहन करावा लागला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये ते गरबा खेळताना दाखवले गेल्यामुळे या गोष्टीचे गांभीर्य वाढले. त्यामुळेच पंतप्रधान मोदींनी डीपफेकवर भाष्य करून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे सुतोवाच केले. लगोलग सरकारने डीपफेकबाबत नवीन सूचना जारी केल्या आहेत. खेरीज मीडियाने लोकांना या धोक्याबद्दल शिक्षित करण्याची गरजही पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे. काही आठवड्यांपूर्वी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूबसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला डीपफेक सामग्री काढून टाकण्याचे सूचित केले होते. तसे न केल्यास भारतीय कायद्यानुसार फौजदारी आणि न्यायालयीन कारवाई केली जाईल, असे स्पष्टपणे सांगितले. हा सर्व घटनाक्रम धोक्याचे गांभीर्य दाखवून देतो.
 
 
या पृष्ठभूमीवर Technology Misuse डीपफेक तंत्रज्ञान काय आहे हे जाणून घेणे गरजेचे ठरते. मुळात हे तंत्रज्ञान बनावट मीडिया तयार करण्यासाठी व्हिडीओ आणि इतर डिजिटल सामग्रीमध्ये चेहरे बदलण्यासाठी वापरले जाते. शिवाय, डीपफेक केवळ व्हिडीओंपुरते मर्यादित नाही तर या तंत्रज्ञानाचा वापर प्रतिमा, ऑडिओची खोटी नक्कल करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. आपल्याकडेच नाही तर जगभरच सोशल मीडियाचा वापर वाढू लागल्यावर काही समाजविघातक बाबी शिरणे अपरिहार्य होते. त्याप्रमाणे इथेही सायबर गुन्हेगार सक्रिय झाले. स्वतःचे खोटे प्रोफाईल ठेवून नोकरी, विवाह, प्रवास, व्यापार किंवा मैत्रीच्याही निमित्ताने लोकांना जाळ्यात ओढणे आणि पैसा किंवा वैयक्तिक पातळीवरील इतर गोष्टींमध्ये ठगवणे हादेखील एक मोठा व्यवसाय बनला असे म्हणावे लागेल. याचीच पुढील आवृत्ती म्हणजे फेक न्यूज आणि आता डीपफेक. फेक न्यूजला होक्स असेही नाव आहे. फेक न्यूज अर्थात खोट्या, संभ्रमित करणार्‍या बातम्या कोणत्याही प्रकारच्या असू शकतात. राजकारण आणि अर्थकारणापासून आज पृथ्वीवर सूर्याकडून कॉस्मिक रेजचा मारा होणार आहे तरी सावध राहावे, यापर्यंत काहीही यामध्ये असू शकते. अशा बातम्यांना मसाला व्हॅल्यू ऊर्फ टीआरपी जास्त असल्याने त्या सोशल मीडियावर अतिशय झपाट्याने पसरतात.
 
 
आधी उल्लेख केल्याप्रमाणे याचीच पुढची पायरी म्हणजे फेक व्हिडीओ. समाज माध्यमांमार्फत व्हायरल झालेल्या फोटो किंवा व्हिडीओवरून गैरसमज होऊन भांडणे, हिंसाचार, कोर्ट केसेस आणि अगदी दंगली उद्भवणे आता नवीन राहिलेले नाही. आपण पाहिलेला फोटो किंवा व्हिडीओ अस्सल आहे की मॉर्फिंग केलेला म्हणजे संगणकीय साधने वापरून सोयीस्कररीत्या कट-पेस्ट केलेला आहे, याची खात्री न करताच पाठिंबा किंवा विरोध करण्याच्या हालचाली सुरू केल्या जातात. सध्या काय सांगितलेय यापेक्षा कोणी सांगितलेय, याला महत्त्व आले आहे. हा बहुधा मानवी स्वभावच असावा, कारण फेक की रिअल याची खात्री करण्याची फुकट सुविधा देणारी अनेक अ‍ॅप्स हाताशी असतानाही आपण तसे न करता घातक आणि चुकीचे कृत्य करून मोकळे होतो. आपल्यातील Technology Misuse काहींमध्ये वर्णनावरून चित्र काढण्याचे कौशल्य असते. त्याचाच हा अधिक उच्च पातळीवरचा तांत्रिक आविष्कार आहे. सोशल मीडिया, विविध अ‍ॅप्स, ओटीटी; फार काय, टीव्हीवरदेखील दाखवली जाणारी दृश्ये किंवा प्रसंग त्यांच्या मूळ रूपात असतीलच याची कोणतीही खात्री प्रेक्षकांना मिळू शकणार नाही आणि हे घडायला पुढची पाच ते दहा वर्षे पुरेशी आहेत!
 
 
येत्या काही दशकांमध्ये हा प्रकार वाढत जाण्याचीच शक्यता आहे, कारण असे व्हिडीओ बनवण्यातला आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा सहभाग वेगाने वाढत असल्याने दाखवली जाणारी बाब खरी की खोटी हे ओळखणे जवळजवळ अशक्य बनणार आहे. उदा. एका फोटोमध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष ट्रम्प यांना अटक होताना, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन अश्रुधुरातून मार्ग काढत असताना दाखवण्यात आले आहेत. कदाचित वाचकांनी हे फोटो पाहिले असतील. खरे तर तुम्हाला हे प्रसंग पाहिल्याचे किंवा याबाबत वाचल्याचे आठवत नाही ना? नाहीच आठवणार; कारण असे काही घडलेलेच नाही! प्रत्यक्षात हे प्रसंग आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने संगणकावर बनवले आहेत. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर आधारित मिडजर्नी नावाच्या सॉफ्टवेअरचा वापर करून त्याला पुरवलेल्या मजकुरावरून (टेक्स्ट प्रॉम्प्ट) हे सॉफ्टवेअर प्रतिमा तयार करू शकते आणि त्या प्रतिमा इतक्या हुबेहूब असतात की खोट्या असल्याची कल्पनाही करू शकत नाही वा तशी शंकाही आपल्याला येत नाही.
 
 
Technology Misuse : सध्या चर्चेत असणार्‍या आणि अनेक क्षेत्रांमध्येे उलथापालथ घडवू शकणार्‍या चॅट जीपीटीचे उदाहरण घ्या. चॅट जीपीटी हे भाषेवर आधारित एक आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सॉफ्टवेअर आहे. त्याला भाषा आणि शब्दप्रयोगांमधील बारकावे तसेच छुपे अर्थही चांगलेच समजतात. त्यामुळेच चॅट जीपीटीसारख्या कृत्रिम बुद्धिमत्तेला तितक्याच दर्जेदार आणि अचूक ऑडिओ-व्हिडीओची जोड मिळाल्याने असे व्हिडीओ किंवा फोटो मूळचेच तसे आहेत की बनवलेले आहेत हे सांगणे दिवसेंदिवस कठीण होत जाणार आहे. परिणामी सत्य लपवणे, ते वेगळ्या रूपात दाखवणे किंवा स्वतःला सोयीचा असेल तेवढाच भाग सांगणेही सहजशक्य होईल. त्यामुळेच यासाठी सरकार आणि स्वयंसेवी संस्थांनी खरेपणा तपासण्यासाठी काही वेबसाईट्स तयार करणे आवश्यक आहे. तसेच सायबर कायदे बदलून त्यात फेक न्यूज, व्हिडीओचा प्रसार करणार्‍या व्यक्तींना आणि संस्थांना जबर शिक्षा व्हायला हवी. नीतिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान ही बाब शालेय, महाविद्यालयीन शिक्षणात अंतर्भूत करायची हीच वेळ आहे. त्यामुळे त्याकडेही लक्ष द्यायला हवे. हे झाले नाही तर तंत्रज्ञानाचा गैरवापर करणारे किती पुढची मजल गाठतील याची कल्पना आपण करू शकतो.
Powered By Sangraha 9.0